उदारमतवादी राष्ट्रनेता 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 17 ऑगस्ट 2018

जनसंघाचा वारसा लाभलेला भारतीय जनता पक्ष देशाची सत्ता सांभाळू शकतो, राज्यघटनेतील मूल्यांशी बांधिलकी दाखवून कारभार करतो, हे सिद्ध करून दाखवित याविषयीच्या शंका-कुशंकांना वाजपेयींनी चोख प्रत्युत्तर तर दिलेच; शिवाय आपल्या कारभारशैलीची छापही उमटविली.

भारताच्या राजकारणातील समन्वयाचा, संवादाचा स्वर क्षीण होत असताना अटलबिहारी वाजपेयींचे आपल्यात नुसते असणेदेखील दिलासादायक होते; पण आता तो आधारही नाहीसा झाला आहे. त्यांच्या जाण्याने देशाच्या राजकीय इतिहासातील एका देदीप्यमान अध्यायाची सांगता झाली आहे. वसाहतींच्या जोखडातून मुक्त झालेल्या देशांमध्ये संसदीय लोकशाही रुजणे, ही केवढी अभूतपूर्व घटना आहे, हे अनेक शेजारी देशांची स्थिती पाहताना प्रकर्षाने जाणवते. भारतासारख्या विशाल, खंडप्राय देशात समर्थ विरोधी पक्ष उभा राहणे आणि प्रयत्नपूर्वक जनाधार वाढवून त्याने सत्तेवर येणे, याचे महत्त्व त्यामुळेच अनन्यसाधारण. या परिवर्तनाचे नायकत्व अटलबिहारी वाजपेयींकडे जाते. कॉंग्रेसच्या बाहेरचा खराखुरा विरोधी पक्ष या नात्याने भारतीय जनता पक्षाला 1996, 98 आणि 99 मध्ये सत्ता मिळाली आणि 13 दिवस, 13 महिने आणि पाच वर्षे अशा क्रमाने मिळालेल्या या सत्तेचे सुकाणू सांभाळले ते वाजपेयी यांनी. 

जनसंघाचा वारसा लाभलेला भारतीय जनता पक्ष देशाची सत्ता सांभाळू शकतो, राज्यघटनेतील मूल्यांशी बांधिलकी दाखवून कारभार करतो, हे सिद्ध करून दाखवित याविषयीच्या शंका-कुशंकांना वाजपेयींनी चोख प्रत्युत्तर तर दिलेच; शिवाय आपल्या कारभारशैलीची छापही उमटविली. विरोधक सत्तेवर आले म्हणजे पूर्वसुरींनी घालून दिलेली सगळीच घडी विस्कटून टाकायची, अशा घातक प्रवृत्तीचा संसर्ग वाजपेयींना कधीही झाला नाही, त्यामुळेच पंडित नेहरूंनी परराष्ट्र धोरणातील अलिप्ततावादाची स्वीकारलेली दिशा वाजपेयींनी शिरोधार्य मानली. जागतिक दबाव झुगारून अणुचाचणी करण्याचा त्यांचा धाडसी निर्णय केवळ भारतीय उपखंडातीलच नव्हे तर जागतिक पातळीवर राजकीय, आर्थिक आणि सामरिक समीकरणे बदलणारा ठरला. काश्‍मीरचा प्रश्‍न सोडविण्यासाठी "जम्हूरियत, इन्सानियत, काश्‍मीरियत'चा जो विचार त्यांनी मांडला, त्याचा आधार आजही राज्यकर्त्यांकडून तर घेतला जातोच; पण विशेष म्हणजे जम्मू-काश्‍मीरमध्येही अनेकांकडून घेतला जातो. खुल्या आर्थिक धोरणाची नांदी नरसिंहराव-मनमोहनसिंग यांनी केली, तीच वाट चोखाळत अटलजींनी अर्थव्यवस्था सक्षम करण्याचा प्रयत्न केला. प्रसंगी स्वकियांचा विरोध पत्करून आर्थिक सुधारणा पुढे नेल्या. 

रस्तेबांधणीच्या महाप्रकल्पांना प्राधान्य देत, दूरसंचाराचे जाळे विस्तारत, आर्थिक विकास दराचा आलेख उंचावत, जागतिक पातळीवर आत्मविश्‍वासाची ध्वजा फडकावत त्यांनी पंतप्रधानपदाची कारकीर्द पार पाडली. कडव्या राष्ट्रवादातून मिळणाऱ्या लोकप्रियेतचा मोह दूर सारून पाकिस्तानशी चर्चेसाठी पुढाकार घेणारे वाजपेयीच होते. ही वाटचाल सोपी नव्हती. कारण राष्ट्रीय लोकशाही आघाडीची मोट त्यांना सांभाळायची होती. ते त्यांना शक्‍य झाले ते त्यांच्या समावेशक नेतृत्वामुळे. विविध राजकीय पक्षांना एकत्र घेऊन सरकार चालविण्याचा आघाडी सरकारचा पहिला यशस्वी प्रयोगदेखील अटलजींच्या नावावर नोंदला गेला. त्यांची अंतर्मुख वृत्ती आणि राजकारणात चुकत-शिकत पुढे जाण्याची त्यांची शैली या यशामागे होती. 1996 मध्ये पक्षाला 161 जागा मिळाल्या खऱ्या; पण भाजपला मित्रपक्ष मिळू शकले नाहीत. ते का मिळत नाहीत, या प्रश्‍नाने त्यांना अस्वस्थ केले. दोन प्रयत्नांनंतर तिसऱ्यांदा 1999मध्ये त्यांना पाच वर्षांसाठी देशाचा कारभार करण्यासाठी संधी मिळाली, ती केवळ देशभरातील पक्षाच्या विस्तारामुळे नव्हे तर वाजपेयींच्या परिणत होत गेलेल्या राजकीय शैलीमुळेदेखील. विशिष्ट विचारसरणीचा संस्कार घेऊन राजकारणात उतरलेल्या नेत्याच्या व्यक्तिमत्त्वात अशी लवचिकता आणि समावेशकता आढळणे हे निःसंशय मोठी बाब होती. मुळात सत्तेसाठी सत्ता हे वाजपेयींचे ध्येय कधीच नव्हते. समर्थ भारत साकारण्याचे स्वप्न घेऊन संघाला आयुष्य समर्पित केल्यानंतर सरसंघचालकांचा आदेश म्हणून ते जनसंघात आले आणि मग अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत पक्षाचा विचार पोचविण्यासाठी आणि कार्यकर्त्यांचे जाळे वाढविण्यासाठी अपार मेहनत घेत राहिले. 

पक्षाचा प्रसार करण्यासाठी सायकलवर टांग मारून ते घरोघरी जात. कार्यकर्त्यांच्या हृदयात स्थान मिळवित. त्यांची ही निष्ठा आणि गुणसंपदा या जोरावर त्यांना लोकसभेत प्रवेश करता आला आणि त्यांनी या संधीचे सोने केले. पहिल्या लोकसभेत जनसंघाचा दोन, तीन खासदारांचा छोटा गट असला तरी वाजपेयींचा व्यासंग आणि तळमळ यामुळे त्यांनी तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरूंचे लक्ष वेधून घेतले. परराष्ट्र धोरणावरची त्यांची भाषणे नेहरू लक्षपूर्वक ऐकत. चीनने 1962मध्ये भारतावर वार केला, त्याआधी काही वर्षे सातत्याने ड्रॅगनच्या बेमुर्वत विस्तारवादी हालचालींकडे देशाचे आणि सरकारचे लक्ष कोणी वेधले असेल तर ते वाजपेयींनी. हा राष्ट्रवादी जागर संसदेत आणि संसदेबाहेरही त्यांनी अखंड चालू ठेवला. आणीबाणीच्या काळात इतर विरोधकांच्या बरोबर एकाधिकारशाहीच्या विरोधातील संघर्षात वाजपेयी, अडवानी, नानाजी देशमुख आदींनी बजावलेली कामगिरी सर्वज्ञात आहे. एकात्मता, संरक्षण आणि विकास ही वाजपेयींच्या राष्ट्रवादी विचारांची त्रिसूत्री होती. विश्‍वधर्माशी सहर्ष तादात्म्य होण्यास आसुसलेले असे त्यांचे "हिंदुत्व' होते. तरीही जातीय, संकुचित अशा शेलक्‍या विशेषणांचा आहेर त्यांना दिला जाई. कविमनाचा हा नेता अशावेळी सात्त्विक संतापाने उसळून उठे. 

"धर्मनिरपेक्षता आमच्या रक्तातच कशी मुरलेली आहे', हे सांगताना दांभिक सेक्‍युलरांचा बुरखा फाडायला ते कचरत नसत. दिमाखदार वक्तृत्वाची देन त्यांना लाभली होती. पण "वक्तृत्व वाग्‌विभवही तुज अर्पियेले.. ' अशी भावना त्यामागे होती. लाखालाखाच्या सभा त्यांनी जिंकल्या त्या अमोघ वक्तृत्वाच्या जोरावर. हिंदी भाषा त्यांना वश होती. तिच्यातले सारे माधुर्य त्यांच्या वाक्‍यावाक्‍यातून वाहत असे. काही क्षणांतच ते सभा अक्षरशः ताब्यात घेत आणि मग आवेशात केलेली सुरुवात, वाक्‍याचे मर्म ठसविण्यासाठी झेपावणारे हात, विशिष्ट शब्दांवर दिलेला जोर आणि मग गाभ्याच्या मुद्याला हात घालत सम गाठणे. हळूहळू मोठा आकार घेत लाट किनाऱ्यावर धडकावी, तसा एकेक मुद्दा थेट श्रोत्यांच्या मनाचा ठाव घेत त्यांना विचारौघाने चिंब करून टाकत असे. विलक्षण बोलका "पॉज' हे त्यांचे खास वैशिष्ट्य. तो त्यांनी घेतला, की आता ते पुढे काय बोलणार, याची उत्कंठा तयार होई. पण हे क्षण त्यांच्या देहबोलीने अधिकच अर्थपूर्ण बनत. त्यामुळे त्यांच्या वक्तृत्व मैफलीत अनोखा रंग लाभे. 

गेल्या नऊ वर्षांतला त्यांचा आजार आणि अंथरुणाला खिळून राहणे हा मात्र नियतीने त्यांच्या आयुष्यातच आणलेला एक भयंकर "पॉज' होता. तोही आता संपला आणि हे अटलपर्व संपले. पण आर्थिक-सामाजिक समता आणि राष्ट्रवाद या परस्परविरोधी प्रेरणा नाहीत, याचा पडताळा देणारे वाजपेयी, जनता पक्ष फुटल्यानंतर पुन्हा जनसंघाकडे न वळता भाजपची स्थापना हा केवळ नाममात्र बदल नाही, याची प्रचिती देणारे वाजपेयी, राजकारणात प्रतिस्पर्धी आणि विरोधक असतात; मात्र शत्रू नसतात, हे आचरणातून दाखवून देणारे वाजपेयी ही त्यांची रूपे कधीच विस्मृतीत जाणार नाहीत. राजकारण हे सज्जन लोकांचे क्षेत्रच नाही, असा समज बाळगणाऱ्यांचा प्रतिवाद करण्यासाठी फार सायासांची गरज नाही; वाजपेयीनामाचा उच्चार पुरेसा आहे.

Web Title: Pune Edition Editorial Article on Atalbihari Vajpayee