असुनी खास मॉलक घरचा! (ढिंग टांग!) 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 जुलै 2018

"तुमच्यासाठी आम्ही रेट खाली आणतो, साहेब! तुम्ही सांगाल तसं करतो, पण अब्रूसारख्या नाजूक आमच्या कांचा सांभाळा, साहेब! एक वेळ माफी करा!'' निकराला आलेला एक मॉलक गुडघ्यावर बैसोन म्हणाला. 

"लाज नाही वाटत?'' राजे कडाडले. समोर बसलेले मल्टिप्लेक्‍स मालकांचे शिष्टमंडळ दचक दचक दचकले. शिवाजी पार्कावरील सहस्त्र कबुतरे बहात्तर तोफांचा आवाज झाल्यासारखी अस्मानात उडाली. पुन्हा वळचणीला बसली. यंत्रातल्या मक्‍याच्या लाह्यांसारखे शब्द राजियांच्या मुखातून तडातडा फुटत होते. एवढ्या लाह्यांचे किमान दीड हजार रुपयांचे पॉपकॉर्न झाले असते, असा स्वार्थी विचार एका मॉलकाच्या मनात चमकून गेला... 

"अडीचशे रुपयाला पॉपकॉर्न? मक्‍याच्या लाह्या? अरे लाह्या वाटल्या पाहिजेत लाह्याऽऽ...,'' "लाजा वाटल्या पाहिजेत, लाजा'चे रुपांतर संतापाच्या भरात लाह्यांसारखे झाले, हा केवळ तापमानाचा परिणाम होता. होय, राजे खवळले की उभा महाराष्ट्र भट्‌टीसारखा पेटतो, हे तर सर्वविदित आहे. 
""दोनशे रुपयांना समोसे? दीडशे रुपयांना बटाटेवडा? अरे, उद्या पन्नास रुपयांना लिंबूसरबत विकाल!!'' हातातल्या मेनूकार्डावर नजर टाकत राजे गुरगुरले. 

"पाणी...पन्नासच्या नोटेला पाण्याची बाटली भेटते, साहेब! लिंबूसरबताला एकशेवीस रुपये चार्ज करावे लागतील!'' शिष्टमंडळातला एक मॉलक चाचरत म्हणाला. "हल्ली महागाई किती वाढली आहे, साहेब! लिंबू आता साठ रुपयाला भेटतं, वर दहा रुपये जीएसटी बोला किती झाले?' अशा आशयाचे उद्‌गार आपसांत निघाले. किमती ऐकून राजियांनी कांदा मागवला! 
तुम्हाला सहा-सहा महिने शेपूच्या भाजीवर ठेवलं पाहिजे रे...तीच तुम्हाला शिक्षा!'' राजे स्वत:शीच पुटपुटले. दालनात येरझारा घालत त्यांनी काही एक विचार केला. दोन-तीनदा मूठ कपाळावर हापटली.

"जगदंब, जगदंब' अशी पुटपूट केली. तीन-चारदा मान हलवली. एवढा वेळ मॉल-मालकांचे शिष्टमंडळ माना खाली घालून बसले होते. त्यातील एक-दोघांना मॉलमधल्या एअरकंडिशनच्या थंडीत जी प्रबळ भावना होते, ती झाली. तथापि, करंगळी दाखवण्याचे धैर्य त्यांस होईना. असो. 

"रयतेला नागवताना जनाची नाही, तर मनाची तरी लाज बाळगावी! अरे, ती बिचारी सामान्य रयत...काडी काडी जमा करोन प्रपंच रेटताना त्यांच्या नाकीनऊ येताती! त्यांच्या किडूक मिडूक संसाराची काडीदेखील तुम्ही लुटतां? तो पहा, गरीब बिचारा मॉलचा ग्राहक त्याचा तुम्ही अपमान करता?,'' दाराकडे बोट दावून राजे ओरडले. साऱ्या मॉलकांनी एकसमयावच्छेदे दरवाजाकडे पाहिले. कुणीही नव्हते... 

"मॉलमध्ये येणाऱ्या गरीब मराठी माणसाची तुम्ही झडती घेता! खिशातल्या तंबाकूच्या पुड्या काढोनी घेतां! इंटरवलच्या अंधारात त्यांस गंडवोन महागडा माल गळ्यात मारितां? चार धडें चौमार्गी टाकावींत ऐसी तुमची लायकी! आम्ही म्हणोन तुम्हांस इतुकी वर्षे सहन केले...परंतु, आता तुमची गय नाही...तुमच्या समोश्‍यापेक्षा तुमच्या मॉलच्या कांचा अधिक महागामोलाच्या आहेती, हे बरे जाणोन असा...'' राजियांनी सज्जड दम भरतांच मॉलकांना विविध ठिकाणाहून घामाच्या धारा लागल्या. वस्त्रे ओली जाहली. सर्वच धारा घामाच्या होत्या, ऐसे खातरीने सांगता आले नसते! पण असो!! 

"तुमच्यासाठी आम्ही रेट खाली आणतो, साहेब! तुम्ही सांगाल तसं करतो, पण अब्रूसारख्या नाजूक आमच्या कांचा सांभाळा, साहेब! एक वेळ माफी करा!'' निकराला आलेला एक मॉलक गुडघ्यावर बैसोन म्हणाला. 

"ठीक तर...मक्‍याच्या लाह्या, पाणी, वडे आणि सामोसे ह्यांचे रेट पन्नासच्या आसपास ठेवा, बाकी कसलेही रेट वाढवलेत तरी आम्ही काही म्हणणार नाही. ओके? रेट कमी करेपर्यंत आम्हास तुम्ही तोंडदेखील दावू नका...चले जाव!'' मॉलकांना एकगठ्‌ठा अभय देत, गर्रकन मान वळवत राजे म्हणाले. बैठक संपली. 
...

"तिकीट का रेट बढा देंगे यार, क्‍या फर्क पडता है?'' असे नंतर एक "मोकळा' झालेला मॉलक दुसऱ्या मॉलकाला टाळी देताना सांगत होता, आणि मराठी चित्रपट निर्मात्यांचे एक शिष्टमंडळ राजियांच्या भेटीसाठी बाहेर ताटकळत होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune Edition Editorial Article on Dhing Tang