काढता का कडी? (ढिंग टांग!)

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 जुलै 2018

स्थळ : मातोश्री महाल, वांद्रे बुद्रुक. 
वेळ : अटीतटीची. 
प्रसंग : झटापटीचा. 
पात्रे : कटोविकटीची. 

सकल सौभाग्यवती सालंकृत पैठणीअवगुंठित कमळाबाई अंत:पुरात रागेरागे येरझारा घालत आहेत. मधूनच बंद दाराकडे पाहत आहेत. दाराशी दबक्‍या पावलाने साक्षात उधोजीराजे येतात. अब आगे... 

उधोजीराजे : (नाजूकपणे कडी वाजवत)...कडी! 
कमळाबाई : (बंद दाराकडे पाहत) हुं:!! 
उधोजीराजे : (मिशीवर बोट फिरवत) आम्ही आलो आहोत...काढता ना कडी? 
कमळाबाई : (फणकारून) मुळीच्च नाही!...तुम्ही जा!! 
उधोजीराजे : (गालातल्या गालात हसत) एक्‍माणूस रागावलंय वाटतं...कडी काढा कडी! 
कमळाबाई : (भिंतीवरल्या दिव्याकडे बघत) हे पहा, आमच्या खोलीत दिवा आहे, आणि.... 
उधोजीराजे : (मान हलवत) तुमच्या खोलीत दिवा आहे आणि त्यात तेल नाही...वीज आहे! ठाऊकाय आम्हाला! कडी काढा!! 
कमळाबाई : (धाडकन दार उघडत) या एकदाचे! या म्हटलं तर येत नाही नि येऊ नका म्हटलं तर अपरात्री स्वारी दारात हजर! हे काय वागणं झालं? 

उधोजीराजे : (दाराच्या चौकटीला धडकत) ओय ओय ओय! अहो, दाराला थोडी उंची ठेवत जा! एखाद्याचा कपाळमोक्ष व्हायचा!! 
कमळाबाई : (चिडून) आमचाच झालाय कपाळमोक्ष! कुठून तुमच्या नादी लागलो आणि हा असा संसार नशिबी आला!! आमचं कौतुक ऱ्हायलं बाजूला, घरावर तुळशीपत्र ठेवायला निघालात!! 
उधोजीराजे : (गंभीरपणाने) आम्ही का मौजमजेखातर घरावर तुळशीपत्र ठेवतो? मराठी रयतेसाठी आम्हाला हे सारं करावं लागतं! मराठी माणसाच्या हितासाठी आम्ही कुणाचाही गळा धरू शकतो! आमचं सारं आयुष्यच मुळी ह्या मराठी माणसांसाठी आहे...कळलं? 

कमळाबाई : (दुप्पट फणकारून) दिवसभर घाल घाल शिव्या घालायच्या, आणि रात्री गोंडा घोळत यायचं...हेच का तुमचं मराठीप्रेम? शोभतं का हे? 
उधोजीराजे : (नमतं घेत) बाईसाहेब, दिल खट्‌टा करू नका! त्यात इतकं रागवायला काय झालं? 
कमळाबाई : (पदर घट्ट ताणत) आम्ही निकम्मे आहोत नं? आमचा कारभार उफराटा आहे नं? आम्ही फक्‍त फेकाफेक करतो नं? आम्ही विश्‍वासास पात्रदिखील नाही नं? आमच्याशी काडीमोड घेण्यासाठी तुम्ही उतावीळ आहात नं? तुम्हाला वेगळा घरोबा करायचा आहे नं? तुम्हाला... 

उधोजीराजे : (कानात बोटे घालत) पुरे पुरे पुरे! अहो, राजकारण आणि संसार म्हटलं की भांड्याला भांडं लागायचंच! आता उदाहरणार्थ आम्ही एखाद्याला म्हटलं की "गेलास मसणात!' तर तो इसम खरंच तिथं जाऊन पडतो का? नाही...तसंच आहे हे! 
कमळाबाई : (मुसमुसत) एवढा काळजीकाट्यानं, मेहनतीनं आम्ही नाणारचा प्रकल्प आणला! लाखो कोकणीबांधवांना रोजगार, बख्खळ पैका, रुंद रस्ते...किती छान स्वप्न दाखवलं आम्ही! पण तुम्हाला त्याची काही चाड नाही! तुम्हाला तुमचे कोकणातले माड हवेत!! हु:!! 
उधोजीराजे : (गुळमुळीतपणे) अहो, हवंय कशाला ते नाणारचं विकतचं दुखणं? 

कमळाबाई : (तोंडाचा पट्टा सोडत) "नाणार होणार' असं आम्ही तरी कुठे म्हटलंय अजून? घोषणा केली म्हणून काऽऽही होत नाही! तसे आम्ही पंध्रा लाखसुद्धा देणार होतो नं आपल्या जनतेला? काही झालं का तसं? राम मंदिर बांधू म्हणून सांगितलं होतं, कुठं बांधलं? 
उधोजीराजे : (कमरेवर हात ठेवत) वा रे वा! त्या अरबस्तानातल्या लोकांसोबत करार-मदार करून मोकळे होता आणि वर अशी मखलाशी करता? कुठं फेडाल पापं? 

कमळाबाई : (निर्धारानं) आमच्या पापाचं आम्ही बघून घेऊ! आधी तुमचा फायनल विचार सांगा! एकत्र राहायचंय की जायचंय? 
उधोजीराजे : (मखलाशी करत) आमचं हे थोडं तुमच्यासारखंच आहे...आम्ही नुसती घोषणा केली म्हणून काऽऽही होत नाही, बाईसाहेब! कळलं? लावा कडी!! जय महाराष्ट्र. 

-ब्रिटिश नंदी 

Web Title: Pune Edition Editorial Article on Dhing Tang