आठवले तसे..! (ढिंग टांग !)

Pune Edition Editorial Article on Dhing Tang
Pune Edition Editorial Article on Dhing Tang

हल्ली पेट्रोल-डिझेलच्या किमतींचा इतका भडका उडाला आहे की विचारता सोय नाही. ह्या दरवाढीमुळेच आम्ही भलतेच चिंतित व त्रस्त व अस्वस्थ झालो आहो. हेच का ते अच्छे दिन? ह्याचसाठी का आम्ही तुम्हाला निवडून दिले? वास्तविक इंधनाचे दर इतके वाढवून ठेवण्याचे कारणच आम्हाला समजू शकत नाही. आहे तेच पेट्रोल कमी किमतीत विकले तर असे काय मोठे होणार आहे? काय क्रावे? ह्याला काही उपाय आहे की नाही? इंधनाची दरवाढ कमी करण्याची जादूची कांडी कोणाकडे आहे? अशा विचारांनी आम्हास भंडावून सोडले होते. 

"थोडं कमी किमतीत विकता का?'' अशा वाटाघाटी आम्ही पेट्रोल पंपावर जाऊन करणार होतो. पण त्या पंपवाल्याच्या हातातील पेट्रोलचे नळकांडे भलतेच भारी होते!! शिवाय पंपावर पाटी लिहिली होती की "पाश्‍शे रुपयांचे पेट्रोल कानात दोन थेंब घालून मिळेल!'' परत आलो!! इंधन दरवाढीच्या विरोधात आम्ही "सकाळ"मध्ये पत्रेदेखील लिहिली. "सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय?' अशा मथळ्याचा कडक शब्दात टीका करणारा लेखही पाठवला. परंतु संपादकांनी "तुमचे डोके ठिकाणावर आहे काय?' अशा आशयाच्या मथळ्याचे उत्तर पाठवले! गप्प बसलो!! विरोधकाच्या "भारत बंद'मध्ये सहभागी होण्यासाठी कामास दांडी मारण्याचाही बेत केला होता, परंतु कामधंदाच नसल्याने दांडी मारण्याचा योगच आला नाही. अशा परिस्थितीत माणसाने करावे तरी काय? 

तेवढ्यात आठवले की "जे न देखे रवी ते देखे कवी"!! ह्या उक्‍तीनुसार आम्ही कविश्रेष्ठांना गाठले. त्यांच्या दिव्य दृष्टीला इंधन दरवाढीवरला उपाय नक्‍कीच दिसला असणार. नोस्ट्राडामस नामक एका ग्रीक द्रष्ट्याने जगाची भविष्यवाणी लिहून ठेवली आहे. त्याची भाकिते खरी ठरतात असे ऐकले होते. हा भविष्यवाला नेमका आहे तरी कोण? ह्याचा शोध घेतला असता तो एक शंभर नंबरी कवी निघाला!! त्याने त्याची भाकिते कवितेत लिहून ठेवली असल्याने त्याचा कस्साही अर्थ लागतो. अखेरचा उपाय म्हणून आम्हाला कविश्रेष्ठांकडे जाणे भाग होते. 
""कविराज, ह्या इंधनाचे काय करायचे?'' आम्ही विचारले. त्यावर कविराजांनी अंगठा तोंडाकडे नेऊन "प्या!' अशी खूण केली. (कविलोकांचे हे असे असते!!) अर्थात आम्ही हट्‌ट सोडला नाही. 
""तुम्हाला काहीच कसे वाटत नाही इंधन दरवाढीचे?'' आम्ही पाय हापटत निषेधाच्या सुरात सवाल केला. त्यावर कविराज जाकीट सावर उभे राहिले. त्यांनी घसा खाकरला... 

"मंत्री म्हणून आम्हाला मिळते 
सगळेच पेट्रोल फुकट 
करू नका तुम्ही उगाच 
कॉंग्रेसवाल्यांसारखी कटकट 

आम्ही म्हटले नाही कधी 
उगाचच "स्वबळ! स्वबळ!' 
म्हणून मोदीजींनी आमच्या घरी 
बसवला आहे पेट्रोलचा नळ! 

...आम्ही ऐकून च्याट पडलो! काव्याचा पंप सुरू झाल्याचे पाहून आम्ही पळ काढणार, एवढ्यात कविश्रेष्ठांनी आमचे बखोट धरले. म्हणाले- 
""देऊ नका तुम्ही आम्हाला 
बुरे दिनांची जंत्री! 
कारण आम्ही आता आहोत 
केंद्रात मंत्री!'' 

...आम्ही हतबुद्ध झालो! ह्यावर काय बोलावे, ते कळेना! कविता ऐकून झाल्यावर छातीचा कोट करून आम्ही अखेर पेट्रोल पंपावर गेलो. पंपधारी पंपसेवकाने पंपबंदूक खांद्यावर टाकून आम्हाला ऐकवले- 
ज्यांना होते कविता सटासट 
त्यांनाच मिळते पेट्रोल फुकट! 
...तात्पर्य : कविता करा, आणि पेट्रोल भरा!! 

- ब्रिटिश नंदी 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com