ऑपरेशन कालवा ! (ढिंग टांग!) 

ऑपरेशन कालवा ! (ढिंग टांग!) 

डिअरम डिअर होम्मिनिष्टर मा. ना. नानानासाहेब, (यक "ना' जादा पडला हाहे. सॉरी!) ह्यांसी म. पो. कॉ. बबन फुलपगार (भक्‍कल नं 1212) पेशल ब्रांच, उमर अडतीस, वजन अडतीस, कदकाठी अदमासे पाच फू. पाच इंच ह्याचा साल्युट आनि दंडवत! लेटर लिहिन्याचे कारन कां की रोजी 27 माहे सप्टेंबर 2018 ला (पुन्यात) मुठा कालवा फुटला. कालवा फुटून फार कालवाकालव जाहाली. पुन्यात हाहाहाकार उडाला.

(पुन्न यक "हा' जादा पडला. सॉरी!) रस्तोरस्ती पानी पानी झाले. शेकडो सौंसार भिजले. ऐन पावसकाळात पानी नाही, आनि पावसकाळ संपतानी मायंदाळ पानी अशी सिच्युशन झाली. साहेब, "सत्यं शिवं सुदरं' सिनेमात (झीनत अमान! आटवली?) क्‍लायमॅक्‍सला धरन फुटून मानसे व्हाहून गेली. कालवा फुटल्याचे दु:ख हाहेच, पन तो विदाऊट झीनत अमान फुटला ह्याकडे मेहेरबान सरकारने लक्ष धिले पाह्यजे. 

कालवा कां फुटला? हा खरा सवाल हाहे. पान का सडले? घोडा का अडला? बाईल का पळाली? ह्याचे जे उत्तर हाहे, तेच कालवा कां फुटला ह्याचेही उत्तर हाहे. - न फिरविल्यामुळे! कालव्याची फिरवाफिरव याने की मेंटेनन्स गेली अनेक वर्शे कोनी केलाच नव्हता, ह्याकडेही मेहेरबान सरकारने लक्ष धिले पाह्यजे. माझा रिपोर्ट आपनांस साधर करीत हाहे. कालवा फुटन्याची तीन इंपॉर्टंट कारने : 

1. कुकर : एक मानूस खच्चून वरडला तर ज्यास्त त्रास होत नाही. पन एकाच वेळेला शंभर मानसे खच्चून वरडली तर त्याला बोंबाबोंब असे म्हनतात. एकाच टायमाला शंभर घड्याळाचे टोले पडले तरी बेकार ध्वनिलहरी निर्मान होऊन पडझड होते, असे विज्ञान सांगते. त्या धुर्दैवी दिवशी अदमासे अकराच्या सुमारास कुकरच्या शिट्ट्या घरोघरी वाजू लागल्याने कालवा फुटल्याचे निष्पण्ण झाले. डीजे वाजवल्यामुळे घराच्या काचा फुटल्याच्या घटणा घडल्या हाहेत, त्याच चालीवर हे निष्पण्ण काढन्यात आले हाहे. परंतु, अधिक चवकशी केली असता हे खरे नाही असे दिसूण आले. 

2. ढोलताशा इफेक्‍ट : डीजेवर बंदी आल्याकारनाने गणेशोत्सवात ढोलताशेवाल्यांची चलती होती. एकेका मिरवनुकीत डझनांच्या रेटमध्ये ढोलताशेवाले कामाला होते. परिनामी ध्वनिप्रदूषन वाढून कालव्याला तडे गेले, असे बोलले जाते. पन आवाज वाढल्यामुळे कालव्याच्या भिंताडाला तडे गेले, हे म्हनने खोटे हाहे. पुन्यातली मानसे सारखी बोलत असतात. त्याच्या आवाजापुढे ढोलताशे काहीच नाही! 

3. रॅट्‌टेररिझम ऊर्फ उंदरांचा दहशतवाद : हे कारन करेक्‍ट असावे. उंदरांच्या स्लीपिंग सेलमध्ये खबरेगिरी केली असता असे कळाले, की उंदरांच्या एका अतिरेकी गटाने सदर कालवाफुटीची जबाबदारी घेतली असून, भविश्‍यात असे अनेक घातपात घडविन्याचा त्यांचा इरादा हाहे. उंदरांच्याच एका अतिरेकी संघटनेने कालवा आतून पोखरला. त्यांना खेकड्यांनी साथ दिली असे कळते.

मध्यंतरी मंत्रालयात मिनिटाला पंच्याऐंशी उंदिर मारन्याची कामगिरी करन्यात आली होती. त्या संहाराला उत्तर म्हनून सदर अट्याक करन्यात आल्याचे कळते. गणेशोत्सव संपल्या संपल्या घरोघरी चिंबोऱ्या, कुर्ल्यांची कालवणे चुलीवर चढली. गटारी अमुशेनंतर खेकड्यांची संख्या झपाट्याने खालावत गेल्याने त्यांनी चिडून उंदरांना सहकार्य केले, आणि कालवाफुटीचा कट रचला असे कळते. 

...मुन्शिपाल्टीच्या लोकांची हलगर्जी, भ्रष्टाचार, दुर्लक्ष अशी मानवी कारने सपशेल झूट असून, कालवे तपासने हे मुन्शिपाल्टीचे कामच नाही. ते पाटबंधारेभाऊ महाजनांचे हाहे, ह्याचीही नोंद मेहेरबान सरकारने घ्यावी. तसेच पाटबंधारेभाऊंचे हे काम नसून, त्यांचे काम निवडनुका जिंकन्याचे हाहे, ह्याचीही नोंद घ्यावी. इति. आपला आज्ञाधारक. बबन फुलपगार. 

- ब्रिटिश नंदी 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com