चलो, मंगळ! (ढिंग टांग!) 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 नोव्हेंबर 2018

स्थळ : इलिसियम प्लानिशियाचे मैदान, मंगळ ग्रह. 
वेळ : मंगळ प्रमाण वेळेनुसार सकाळी 11 वाजून 52 मिनिटे 17 सेकंदांची. 
वातावरण : तंग! 
हवा : विरळ! 
पात्रे : सरळ! 

प्रधान मंगळसेवक इडोम अर्दनेरान योगासने करण्याच्या आटोकाट प्रयत्नात आहेत. मंगळावर गुरुत्वाकर्षण कमी असल्याने मयुरासन घातले की ते मोडायला बराच वेळ लागतो...त्या खटाटोपात ते असतानाच मं.ज.पा.चे अध्यक्ष टिमाभाई हाहस प्रविष्ट होतात. त्यांच्या छातीवर कमळाचे चिन्ह आहे!! आणि हो, मंगळावर भाईचे "भाई'च राहाते, उल्टे होत नाही!! अब आगे... 

टिमाभाई : (पंजाचा उलटा पापलेट छातीशी नेऊन) प्रधानसेवकांचा विजय असो!! 
इडोमभाई : (अडकलेला श्‍वास सोडण्याच्या अंदाधुंद खटपटीत) ऱ्हुहहहह....!! फुफ...फुकफुकफुक...फिस्स्स!! 
टिमाभाई : (चेहऱ्यावर चिंतेचे जाळे...) आत्ताच हाती आलेल्या वृत्तानुसार आपल्या इलिसियम प्लानिशिया प्रांतात पृथ्वीवरून आलेलं एक अंतराळयान लॅंड झालं आहे! 
इडोमभाई : (जमिनीवर लॅंड होत) अरे देवा! कुणी पृथ्वीवासी आले आहेत का? 

टिमाभाई : (मान हलवत) नुसताच एक हात बाहेर आलाय त्या यानातून! मोटारीची काच पुसल्यासारखा हलतोय!! 
इडोमभाई : (काळजीच्या सुरात) कॉंग्रेसवाले इथे पोचले तर..! 
टिमाभाई : (ओठ काढून खांदे उडवत) तसं वाटत तरी नाही!! आपल्या गुप्तचर खात्याचे प्रमुख तिजा लावोद ह्यांनी कळवलंय की ते मानवरहित यान आहे-इनसाइट नावाचं! "नासा'नं पाठवलंय ते इथं!! त्याच्यावर इंग्रजीत "इलेक्‍ट्रॉनिक व्हेइकल टु द मार्स' असं लिहिलंय! 

इडोमभाई : (बुचकळ्यात पडत) ते इथं काय खोदकाम करणार? 
टिमाभाई : (डोळे मिटून) चोक्‍कस! खोदकामच!! मंगळभूमीवर प्रचंड प्रमाणात बर्फ आहे असं त्यांना कळलंय! (आणखी धक्‍का देत) बर्फ भरपूर असल्याने मंगळावर ड्राय डे नाही, असा तिथे काही लोकांचा गैरसमज झालाय!! 

इडोमभाई : (तंद्रीत) सत्यानासा!!...आय मीन- 
टिमाभाई : (चपळाईने विषय बदलत) हे तर काहीच नाही!! आपल्याकडे डायरेक्‍ट सोड्याच्या विहिरी आहेत, हे त्यांना कळलं तर मेलोच म्हणून समजा!! 
इडोमभाई : (कपाळावर हात मारत) गुप्तचर खातं काय करतंय आपलं? त्या तिजा लावोदसाहेबांना म्हणावं, ताबडतोब पृथ्वीवर सर्जिकल स्ट्राइक करा! 
टिमाभाई : (संकोचून) तसा केला होता आपण सर्जिकल स्ट्राइक! पण... 

इडोमभाई : (उतावळेपणाने) पण काय, टिमाभाई? 
टिमाभाई : (शांतपणे) आपले लोक तिकडे गेले, त्या दिवशी नेमकी पृथ्वीवर गटारी अमावस्या होती!! इडोमभाई : (विषय बदलत) त्या इनसाइट अंतराळयानावर लक्ष ठेवा! पाहिजे तर त्याचं टायर पंक्‍चर करून ठेवा! पण फार माहिती गोळा करू देऊ नका! ते अंतराळयान मंगळभूमीवर हिंडता फिरता कामा नये!! 
टिमाभाई : (थंडपणाने) त्या इनसाइट यानाला टायर नाहीत! पंक्‍चर कसं करणार? पलीकडच्या बर्फाळ नदीच्या किनाऱ्यापर्यंत ते जाईल, असा आपल्या गुप्तचर खात्याचा अंदाज आहे!! कारण तशी पत्रकं त्या यानानं इकडे तिकडे फेकलेली आढळली!! 

इडोमभाई : (हादरून) कसली पत्रकं? 
टिमाभाई : (संभ्रमावस्थेत) त्याच्यावर काहीतरी सांकेतिक भाषेत लिहिलेलं आहे! त्याचं भाषांतर आपण केलंय, पण त्याचा अर्थ लागत नाही!! 
इडोमभाई : (घाईघाईने) मला सांगा, मी लावतो अर्थ!! 
टिमाभाई : (दाढी खाजवत पत्रक दाखवून) हे बघा, ह्या, पत्रकात म्हटलंय की, ""आधी मंगळ मग चंगळ, पहले मंदिर फिर सरकार!!'' 

इडोमभाई : (किंचित स्मित करत) असं? मग डोण्ट वरी! ही पृथ्वीवासीयांची भेट आहे असं समजा! "इलेक्‍ट्रॉनिक व्हेइकल टु द मार्स' म्हंजे दुसरं तिसरं काहीही नसून आपलं "ईव्हीएम' आहे, ईव्हीएम! हाहा!! 

-ब्रिटिश नंदी 

Web Title: Pune Edition Editorial Article Dhing Tang