गांधीनगर दिग्विजय! (बखरीतले एक पान...) (ढिंग टांग!)

गांधीनगर दिग्विजय! (बखरीतले एक पान...) (ढिंग टांग!)

मजल दरमजल करीत उधोजीराजांची फौज गांधीनगराच्या वेशीपास पोचली. नेमकी तिथ सांगावयाची तर फाल्गुन कृ. दशमी श्रीशके 1940. टळटळीत दुपार होती. गुर्जर प्रांतातली उन्हे फार कडवी. ती "मी मी' नव्हे, तर "हूं हूं' म्हणताती! प्रंतु, गांधीनगरचा सरदार (अफझुल्ल्या) खानाने शीलबंद लखोटा धाडून "शिकवा' केला होता. त्याणे लिहिले होते : ""ऐ, शान-ए दख्खन, शेर-ए- सह्याद्री, बाश्‍शा-ई- बांदरा, बहोत दिन हुए गले नहीं मिले... कभी तो पधारो हमारे गुजराथ में,'' खानाच्या खलित्यातील खलमजकुरावर खलबतखान्यात खरोखर खल करून खळखळ न करता उधोजीराजांनी मोजक्‍या फौजफाट्यासह प्रात:काळी गुजराथकडे प्रस्थान केले होते व ते येथे येवोन ठेपले होते. वेशीवरच खानभेटीसाठी बहारदार शामियाना उभारण्यात आला होता. फाफडा, ढोकळ्याचे सुगंध आसमंतात दर्वळत होते. 

...नगरप्रवेशाच्या मुहूर्ताची वेळ अजून दूर होती. घटकाभर थांबोन उधोजीराजांनी घोड्यावरूनच नगरात सांगावा धाडला. (खुलासा : राजे घोड्यावर होते, सांगावा अन्य वाहनाने धाडला गेला. ) सांकेतिक सांगावा घेऊन दूत दौडत गांधीनगराचा पातशाही सरदार अफझुल्ल्या खानाकडे जावोन पोचला. 
बांधिल्या नशिबाने सह्याद्रीच्या 
दऱ्याखोऱ्यांमध्ये खुशहाल हिंडणा 
ऱ्या पटाइत वाघांच्या फौजेची 
चावळ ऐकून गुर्जर प्रांतातील 
समस्त बेन-बांधव बांधव, अन्य 
रहिवासी, त्यांच्या अंगणात सडे, 
दारावर तोरणे-गुढ्या लावीत आहेत? 
रहाट रिकामे, विहिरी कोरड्या 
पोहऱ्यात पाणी कुठून यावे? 
चमत्काराच्या प्रतीक्षेत न राहता 
लाल गुलालाची उधळण करीत 
आत्ताच्या आत्ता येथे यावे, 
हे मित्राचे वचन आहे... 

....दूताची बोळवण करोन खानाने खलित्यातील मजकूर नीट वाचुनु लागलीच भेटीची वेळ ठरवुनु टाकिली. सांकेतिक मजकुरातील ओळींचे पहिले अक्षर जोडत गेले असता त्यास निरोप मिळाला तो असा : "बांदऱ्याचा सरदार पोचला आहे!' 
...इकडे खानभेटीची जय्यत तयारी सुरू जाहली. राजियांनी सुस्नात होवोन आपल्या पाईकांस यथोचित सूचना दिल्या. ""राजे, सील करा अंगाला!'' कुणीतरी सूचना केली. त्याकडे दुर्लक्ष करत राजियांनी तळहाती दही घेतले व तोंड आंबट केले. चूक दह्याची होती. 

"'आओ, आओ, दोस्त, गले मिलो...'' दोन्ही हात पसरोन खान म्हणाला. दहा पावले चालोन जात उधोजीराजे बिनदिक्‍कत त्यांच्या मिठीत शिरले आणि...आणि काळ थांबला. शामियान्याच्या कापडावरली पाल चुकचुकली. देवदूतांचे हात थबकले. आता काय होणार? जगदंब जगदंब. 

...मिठीतून शिताफीने सुटका करून घेत उधोजीराजांनी खानापुढे कमळाचे फूल धरले आणि गालातल्या गालात हसत ते पुटपुटले... 

"इतिहास गेला इतिहासात...दरवेळी त्याची पुनरावृत्ती होत नै काई!!,'' गडगडून हसत खानाने प्रेमभराने त्यांच्या मुखी ढोकळ्याचा घास भरवला. 
एणेप्रमाणे ही ऐतिहासिक भेट पार पडली. इत्यलम. 

- ब्रिटिश नंदी 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com