पाड सिंहासने उन्मत्त ही पालथी..! (ढिंग टांग!)

सोमवार, 8 एप्रिल 2019

"नुसता उच्छाद मांडला आहे, ह्या जोडगोळीने!'' साहेब म्हणाले. त्यांचा रोख दिल्लीत ठाण मांडोन बसलेल्या नमोजी आणि शाहजी ह्यांच्या जुलमी जोडीकडे होता, हे उघड होते.

नेमकी तीथ सांगावयाची तर विकारीनाम संवत्सरे श्रीशके 1941 चैत्र शुद्ध प्रतिपदा. पाडव्याच्या शुभमुहूर्तावर श्रीखंडाचे यथेच्छ जेऊन तेथल्या तेथे आडवारलेल्या इतिहास पुरुषाला अंमळ डोळा लागत असतानाच अचानक भूकंप जाहल्याप्रमाणे सकल प्रिथिमी आंदोळिली. उत्तर ध्रुवापासोन दक्षिण ध्रुवापरेंत कडाकडा भूमी दुभंगोन दो शकले जाहल्याचा भास झाला. आभाळ कोसळत्ये की धरणी दुभंगत्ये, ऐसी स्थिती. भितऱ्या सशाप्रमाणे "आभाळ पडल्ये, आभाळ पडल्ये' ऐसी हाकाटी करोन अवघी सृष्टी डोकीवर घेण्याची अनिवार उबळ इतिहासपुरुषाला आली होती, परंतु तेवढा वेळच नव्हता. 

इतिहासपुरुष दचकून उठून बसला. येवढे काय घडले असावे? त्याची नजर आपसूक शिवाजी पार्कावर केंद्रित झाली. वाटले होते, तस्सेच घडले! येवढा मोठा आवाज कोठून येणार? साक्षात साहेब क्रोधाने डरकाळत होते. शिवाजी पार्कावरील स्फोटक सभेत इंजिनाच्या शिट्‌टीचा गगनभेदी आवाज घुमत होता. साहेबांचे अमोघ वाग्बाण दिल्लीतील सत्ताधाऱ्यांची गाळण उडवीत होते. इतिहासपुरुष लक्ष देऊन ऐकू लागला... 

"ते काही नाही! आधी लाथा घाला ह्या निमकहरामांच्या ****!,'' एका दिशेने बोट रोखत, क्रुद्ध नजरेने अंगार ओकत साहेब गर्जले. बेसावध इतिहासपुरुष सावरून बसला. बचावासाठी डोईची उशी त्याने मागल्या बाजूस ढालीप्रमाणे धरिली. बराच वेळ काही घडले नाही. साहेबांनी दाखविलेल्या बोटाच्या दिशेने त्याने पाहियले. त्या दिशेलाही कुठलाच अवयव नव्हता की काही नव्हते. लाथा घालाव्या तरी कशा आणि कोठे? सारे बुचकळ्यात पडले. 

"नुसता उच्छाद मांडला आहे, ह्या जोडगोळीने!'' साहेब म्हणाले. त्यांचा रोख दिल्लीत ठाण मांडोन बसलेल्या नमोजी आणि शाहजी ह्यांच्या जुलमी जोडीकडे होता, हे उघड होते. हल्ली साहेबांनी ह्या जोडगोळीला धारेवर धरोन सळो की पळो करोन सोडिले आहे, ह्यावर इतिहासपुरुषाने बखरीतील अनेक पाने खर्ची घातली होती. 

"ह्या जोडगोळीने चालविलेल्या फेकाफेकीने रयत बेजार झाली असून, सर्वत्र जुलमाचा रामराम सुरू आहे. रयतेसाठी आमचे काळीज तुटत्ये...!'' साहेब कळकळीने म्हणाले. त्यांच्या आवाजीतली कळकळ खरोखर जबर्दस्त होती. आता काही नमोजी-शाहजीचे काही खरे नाही!! त्यांनी बऱ्या बोलाने चंबूगबाळे आवरून अहमदाबादेच्या खाऊगल्लीत पकोड्यांचा ष्टॉल टाकावा का? ऐसा विचार इतिहासपुरुषाने केला. इतिहासपुरुषाला भविष्यदेखील दिसते बरे!! 

"म्हातारी मेल्याचे दु:ख नाही, पण काळ सोकावेल त्याचे काय?'' हा सवाल इतिहासपुरुषाला विचारावासा वाटत होता. पण तो काही बोलला नाही. तरीही... 
""तेच म्हणतो मी... काळ सोकावला तरी चालेल, म्हातारी मेलीच पाहिजे!'' मनातले ओळखून जणू साहेबांनी उत्तर दिले. कम्मालच झाली! केवढा हा मनकवडा माणूस!! इतिहासपुरुषाने मनोमन दाद दिली. 
तेवढ्यात, ते घडले... प्रचंड महास्फोटाने भूमंडळ थरथरले. इतिहासपुरुष लिहिता लिहिता लेखणीसकट बसल्याजागी कोसळला. 

"गेले काही दिवस वातावरण बदललं आहे. जरा सर्दी झाली आहे! एखादी शिंकबिंक आली तर समजून घ्या... काय?'' रुमाल नाकाला लावत साहेबांनी खुलासा केला, तेव्हा स्फोटाच्या आवाजाचा इतिहासपुरुषाला उलगडा झाला. त्याच्या मनातील शिंका फिटली. हात्तिच्या! 

'आमचा स्वभावच थोडा शिंकेखोर!'' साहेब पुन्हा म्हणाले. त्यांच्या ह्या थोर विनोदाप्रीत्यर्थ सारे एकजुटीने हंसले!! 
""पाड सिंहासने उन्मत्त ही पालथी...'' ऐसा गजर करून साहेबांनी त्वेषाने शेजारी ठेवलेल्या दोन खुर्च्यांवर लाथ उगारली. तेवढ्यात त्यांच्या चेहऱ्यात बदल झाला. डोळे गपकन मिटले. गालफडे वर आली. नाक आभाळाशी समांतर जाहले. आणि... 
सिंहासने उलथण्यापूर्वीच माशी शिंकली! असो.