फत्ते ! (ढिंग टांग!) 

Pune Edition Editorial Article on Dhing Tang Fatte
Pune Edition Editorial Article on Dhing Tang Fatte

""राजे, जिंकलंत! अखेर सत्याचा विजय झाला...,'' मुजरा घालत आम्ही घाईघाईने सुखवार्ता राजियांच्या कानावर घातली. वार्ता कानावर घालून आम्ही डोळे मिटून उभे राहिलो. वाटले होते, एखादे सोन्याचे कडे आपल्या अंगावर भिर्कावले जाईल!! पण कसचे कसचे!! त्याऐवजी ""कायाय?'' अशी रागीट चौकशी तेवढी झाली. चूक आमचीच होती. ऐन झोपेच्या टायमाला कुणी असे आर्डाओर्डा करीत आले तरी माणसाची खिट्‌टी अंमळ सटकतेच. 

""काय कटकट आहे?'' डोईवरील उशी आणखीनच दाबून राजियांनी विचारले. आम्ही कटकट सांगितली. 
""मल्टिप्लेक्‍सवाल्यांनी अखेर दाती तृण धरिले! सफेत रुमालात हात बांधोन शरणागत आले!! राजियांच्या आदेशापुढति त्यांनी शस्त्र खालतें ठेविले...राजियांचा विजय असो!!,'' आम्ही वीरश्रीपूर्ण आवाजीत आनंदवार्ता कानी घातली. 
"" नेमकं झालंय काय?'' उशीखालून राजे. 

""शंभर-दीडशे रुपयांना वडे आणि समोसे विकणाऱ्या, घरची भाजी-चपाती आवारात आणू न देणाऱ्या मोगल मल्टिप्लेक्‍स-मॉलवाल्यांची जुलमी राजवट चारी मुंड्या चीत जाहली असून यापुढती राजे म्हणतील तैसेचि होईल, असा शरणागत पवित्रा गनिमाने घेतला असल्याने मराठी माणसाचे छाताड अभिमानाने फुगून छातीवरील बंद तटातटा तुटोन पुरुषार्थाची परिसीमा...'' आमचे वाक्‍य पुरे होऊ शकले नाही. राजियांनी त्यांच्या मस्तकावरील उशी आमच्या दिशेने तोफगोळ्यासारखी फेकली होती. त्या आघाताने आमच्या जिव्हेवर नृत्य करणाऱ्या शब्दसुंदरीने तात्काळ "टाइम प्लीज' घेतला. 
""नीट बैजवार भाषेत सांगा...काय झालं?,'' राजे अत्यंत संयमी खर्जात विचारते झाले. 

""सामान्य मराठी रयतेला आता घरची भाजी-भाकरी, फोडणीची पोळी-भात, तिखटमिठाचा हळदयुक्‍त सांजा, उप्पीट, साबुदाणा खिचडी, रताळ्याचा कीस, फ्लावर-बटाटा भाजी आदी सुग्रास पदार्थ मल्टिप्लेक्‍सात उजळ माथ्याने नेता येणार आहेत! मॉल मालकांनी आपला आदेश अखेर मानला...,'' आम्ही विजयी मुद्रेने म्हणालो. ""शाब्बास रे पठ्‌ठे! ह्याला म्हंटात लढवय्यांची फौज!!,'' ताडकन पांघरूण दूर फेकत राजे उभे राहिले. सद्‌गदित होऊन म्हणाले, ""हेच तर स्वप्न पाहिलं होतं मी महाराष्ट्राचं! जीन्स घालून ट्रॅक्‍टर चालवणारा तरुण शेतकरी हातात भाजी-भाकरीचा डबा घेऊन "मल्टिप्लेक्‍स'मध्ये "धडक' सिनेमा बघायला चालला आहे! बघता बघता तो चटणी-भाकरी किंवा वांग्याच्या भरिताचा फन्ना उडवतो आहे...मल्टिप्लेक्‍सवाला त्याला अदबीने "एमारपी'मध्ये मिळणारी पाण्याची बाटली देऊ करीत आहे...व्वा! माझं स्वप्न साकार होताना बघून हृदय कसं भरून आलं आहे...'' 

""तुमच्यासारखा द्रष्टा नेता नसता, तर काय झालं असतं आमचं राजे? एव्हाना आम्ही अडीचशे रुपयांचे पॉपकॉर्न खात जुलूम सहन करत बसलो असतो! राजेसाहेब न होत, तो हालत होत सबकी...फ्रामफ्रीश...फीक फीक..!,'' कृतज्ञतेने आम्ही म्हणालो. कृतज्ञ होताना आमच्या डोळ्यांत हमेशा पाणी येते. ते आतल्या बाजूने नाकात उतरते आणि विनाकारण शिंका येतात. वाक्‍याच्या शेवटला ध्वनी आम्ही अंगरख्याला शिंकरते नाक पुसल्याचा होता. 

""शी:!! हेच...हेच तुमचं आम्हाला आवडत नाही! मल्टिप्लेक्‍सच्या आलिशान खुर्च्यांना तुम्ही हेच पुसता!'' राजे अचानक खवळले. आम्ही नकारार्थी मान हलवली. "छे हो, असं काय म्हंटा?' ह्या अर्थाने. पण राजियांसमोर आम्ही पामराने काय बोलावे? 

""वडे-समोश्‍यांचा रेटही वट्‌ट वीस रुपयांनी कमी करुन साठेक रुपयात स्वस्त वडापाव देण्याचं मॉलमालकांनी जाहीर केलं आहे! सॅटर्डे-संडेला मात्र रेट कमी होणार नाही, असं ते म्हणतात...,'' आम्ही माहिती दिली. ती ऐकून राजे क्रुद्ध झाले. मग धोरणीपणाने त्यांनी गनिमी कावा शिकवला. म्हणाले : ""अस्सा चावटपणा करतायत ते? अच्छाऽऽ...मग तुम्ही आत्ता अंगरख्यात नाक खुपसून जे केलंत, तेच धोरण मल्टिप्लेक्‍सात चालू ठेवा...कळलं?' ...कधी एकदा पडसे होते आहे, आणि मल्टिप्लेक्‍सात जातो आहे, असे झाले आहे! 

-ब्रिटिश नंदी 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com