esakal | नेमेचि न येवो दुष्काळ! (अग्रलेख)
sakal

बोलून बातमी शोधा

नेमेचि न येवो दुष्काळ! (अग्रलेख)

महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यात हंडाभर पाण्यासाठी लोकांना वणवण भटकंती करावी लागत आहे. हे संकट पुन्हापुन्हा उद्‌भवत असल्याने त्यावरील उपायांसाठी सर्व आघाड्यांवर प्रयत्न करावे लागतील. निवडणुकीच्या धामधुमीत या आव्हानाकडे दुर्लक्ष नको. 

नेमेचि न येवो दुष्काळ! (अग्रलेख)

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

सध्या सर्वत्र लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. आश्‍वासनांचा अक्षरशः पाऊस पडत आहे; तर वास्तवात मात्र पाण्याअभावी घशाला कोरड पडण्याची स्थिती निर्माण झाली आहे. हा अंतर्विरोध दिवसेंदिवस तीव्र होताना जाणवत असल्याने त्याची गांभीर्याने दखल घ्यायला हवी. वास्तविक या प्रश्‍नाची चर्चा उन्हाची भट्टी तापल्यानंतर करायची, असा जो नेम पडून गेला आहे, तोच मुळात बदलायची गरज आहे. वर्षभर या प्रश्‍नाच्या बाबतीत जागरूकता दाखविली तरच परिस्थिती थोडीफार सुसह्य करण्यात यश येईल.

मराठवाड्यात एक प्रचारसभा सुरू असताना पाणी आल्याची खबर मिळताच सगळे श्रोते सभा सोडून पाणी भरण्यासाठी घराकडे धाव घेऊ लागल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. या प्रसंगातून सर्वच पक्षांच्या नेत्यांनी धडा घ्यायला हवा. सर्वसामान्यांच्या जगण्याचे मूलभूत प्रश्‍न आणि चर्चेतील प्रचारविषय यांतील दरी कमी करणे आवश्‍यक आहे. सध्या महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यात हंडाभर पाण्यासाठी लोकांना वणवण भटकंती करावी लागत आहे. कोरड्याठाक पडलेल्या विहिरी, आटलेले जलसाठे आणि हंडाभर पाण्यासाठी रखरखत्या उन्हात रानोमाळ पायपीट करणारे लोक, तर कुठे टॅंकरभोवती मिळेल ती भांडी घेऊन पाण्यासाठी लोकांचा पडलेला गराडा, असे विदारक चित्र पाहायला मिळत आहे.

दरवर्षी हजारो गावांमध्ये टॅंकरने पाणीपुरवठा होतो. त्यात सरकारी टॅंकर, टॅंकरची संख्या नाममात्र असते. खासगी टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचे प्रमाण फार मोठे आहे. टॅंकरद्वारे पाणीपुरवठा होणाऱ्या गावामधील लोकांना पिण्यासाठी पाणी पुरविले जाते. ग्रामीण भागातील शेती आणि इतर गरजांसाठी पाणी मिळत नाही. सध्याची पाणीटंचाई आणि येणारा मॉन्सून कसा असेल, याविषयीची धाकधूक यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. मराठवाडा, विदर्भासह पश्‍चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली, नगर जिल्ह्यांमधील अनेक गावांत विदारक अशी परिस्थिती आहे.

मराठवाड्यातील दोन हजार गावांतील 35 लाख लोकांना टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो. मराठवाड्यातील काही भागांत पाण्याचा प्रश्‍न सुटत नसल्याने स्थलांतराचे प्रमाण वाढले आहे. मराठवाड्यातील 872 प्रकल्पांत केवळ चार टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. 51 प्रकल्प कोरडेठाक पडले. 11 मोठ्या प्रकल्पातील पाणीसाठ्यात जेमतेम चार टक्के इतकेच शिल्लक साठा आहे. विदर्भातील वर्धा, अमरावती, अकोला या तीन जिल्ह्यांत पाण्याचा प्रश्‍न अत्यंत गंभीर बनला आहे. मराठवाडालगतच्या बुलडाणा आणि वाशीम जिल्ह्यातील परिस्थिती त्यापेक्षाही भयकंर आहे. पाळीवच नव्हे, तर वन्य प्राण्यांवरही अन्न पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. काही ठिकाणी पाण्याच्या शोधात निघालेल्या बिबट्यांनी शेतकऱ्यांवर हल्ले केले आहेत. 

गेल्या काही वर्षांत दुष्काळी स्थितीमुळे पाणी साठविण्यासाठी जलसंधारणाची मोठी कामे झाली. राज्य सरकारच्या जलयुक्त शिवारांचा कामाचा त्यात समावेश आहे. स्वयंसेवी संस्था आणि लोकसहभागातूनही काही ठिकाणी कामे करण्यात आली. चांगला पाऊस न झाल्याने पदरी निराशाच झाली. तरीही अशी कामे सुरू ठेवण्याला पर्याय नाही. पाणी हे जीवन आहे. पाण्यावरून संघर्ष होऊ लागले आहेत. माणूस अन्नावाचून काही काळ का होईना जिवंत राहू शकतो. मात्र, पाण्याशिवाय तो राहू शकत नाही; परंतु या पाण्याचे महत्त्व ओळखायला आपण अजूनही कमी पडलो आहोत. पर्जन्यमानात वाढ होण्यासाठी, पाण्याची साठवणक्षमता वाढवण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागणार आहेत.

"नेमेचि येतो पावसाळा' या म्हणीप्रमाणे आता "नेमेचि येतो दुष्काळ' अशी अवस्था झाली आहे. मात्र, संकट आल्यानंतर जागे होण्यापेक्षा कायमस्वरूपी उपायांवर सरकार आणि प्रशासनाने गांभीर्याने विचार करायला हवा. पावसाचे प्रमाण वाढवण्यासाठी वृक्षतोड थांबवून वृक्षारोपणाला चालना द्यायला हवी. ती झाडे जगवण्यासाठीही प्रयत्न करावे लागतील. स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने लोकसहभागातून गाळ काढण्याची कामे केली जातात. त्याला गती देऊन त्याला चळवळीचे स्वरूप द्यावे लागेल. गाव तलाव, पाझर तलाव, मोठे प्रकल्प बांधण्यात आले. त्यांची साठवणक्षमता वाढवावी लागेल. यासाठी गाळ काढण्याचे काम युद्धपातळीवर हाती घ्यावे लागणार आहे. पाणी वापरताना आपण अजिबात काळजी घेत नाही; विशेषत: महानगरांमध्ये पाण्याचा बेसुमार वापर होतो.

एकूणच पाणी वापरासंदर्भातील काटकसर करण्याची सवय सर्वांनीच लावून घ्यावी लागणार आहे. मोठ्या शहरांमध्ये नव्याने बांधकाम करताना स्वच्छतागृहे व बाथरूममधील पाण्याची होणारी नासाडी थांबवण्यासाठी नव्या तंत्रज्ञानाची आवश्‍यकता आहे. पाण्याचा जागरूकतेने वापर करण्यासाठी अनेक संस्था दृकश्राव्य माध्यमातून प्रयत्न करीत आहेत, ही चांगलीच गोष्ट आहे. हे प्रयत्न चालूच ठेवायला हवेत. पाण्याच्या बाबतीतील बेफिकिरी आपला घात करण्याआधी आमूलाग्र सुधारणांच्या दिशेने तातडीने पावले टाकायला हवीत. 

loading image
go to top