दंड ! (ढिंग टांग !)

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 13 ऑगस्ट 2018

सरडोक्‍याप्रमाणे रंग बदलताती. परंतु, आज तो धोका नव्हता. राजियांचे घोडदळ गडाच्या पायट्याशी पार्क केलेले! त्यांचा दाणापाणी बैजवार चाललेले.

नेमकी तिथी सांगावयाची तर विलंबी संवत्सरातील 1940व्या शकामधली दिव्यांची आवस होती. "कृष्णकुंज'गडावर शांतता नांदत होती, (त्यामुळे) पायथ्याशी वसलेल्या पार्काडात सारे काही आलबेल होते. रस्त्यावरील वर्दळ सुरक्षितपणे सुरू होती. माणसे आरामात रस्ते क्रॉस करीत होती. राजियांचे घोडदळ निघाले की तेथे धावाधाव होई. घोडदळ निघाले की तेथील रस्त्यांवरील सिग्नल घाबरून उघडझाप करताती.

सरडोक्‍याप्रमाणे रंग बदलताती. परंतु, आज तो धोका नव्हता. राजियांचे घोडदळ गडाच्या पायट्याशी पार्क केलेले! त्यांचा दाणापाणी बैजवार चाललेले. उप्पर बालेकिल्ल्यात खुद्‌द राजे रात्रीचा दिवस करोन गानकोकिळेचे चरित्र सिद्ध करण्याच्या कामात गढोन गेले होते. गानकोकिळेचे चरित्र लिहिणे सोपे नाही. येकांदे जुने गाणे आठवले की त्यातच लेखक रमून जातो. लिखाण राहोन जाते. अशी अनेक वर्षे गेली...आता कोठे मुहूर्त लागला आहे. 

सरस्वती धावोन ये गे! बृहस्पती दौडत ये रे!! 
येथ खुद्‌द राजियांनी चरित्रलेखनाचा संकल्प सोडला आहे ... 
पूर्वी वेळ घालवण्यासाठी राजे व्यंग्यचित्रे काढत. त्यांच्या कुंचल्यातून साकारलेली झक्‍कास, फर्मास व्यंग्यचित्रे पाहोन उभा महाराष्ट्र खदाखदा हसत लोळत आडवा होत असे. परंतु, पुरेसा निवांतपणा न मिळाल्याने त्यांचे मस्तक भडकू लागले. डिस्टर्ब करणाऱ्यास कुंचले फेकोन मारण्याच्या त्यांच्या पवित्र्यामुळे सारे कुंचलेच संपले!! आता काय करावे? कॅय क्रावे आता? अखेर एक सुंदरसे पेन गावले. पाच-पन्नास कोरे तांव मिळाले. झाले, गानकोकिळेच्या चरित्राचे काम सुरू की हो जाहले... 

...चरित्राच्या जुळवाजुळवीत राजे मग्न असतानाच बाळाजीपंत अमात्य लगबगीने येवोन दाराआड उभे राहिले. किंचित खाकरले. 
""कयॅय?'' राजियांनी प्रेमळपणाने चवकशी केली. आपल्या हातात आज ढाल नाही, ह्या कल्पनेने बाळाजीपंत हवालदिल झाले. तरीही माणूस धीराचा म्हणायचा!! 
""व...व...वाहतुकीचे न...न...नियम म...म...मोडल्याचे इ-चलान आले आहे..,'' बाळाजीपंत चाचरत म्हणाले. मोटारीसारखेच आपल्यालाही स्टार्टिंग ट्रबल सुरू झाले काय? ह्या विचाराने ते अधिकच खचले. 
""नियम मोडता कशाला मग? भरा आता दंड...'' राजे ओरडले. त्यांचा सात्विक संताप उफाळून आला, ""लेको, तुमचं ह्या मुंबईवर प्रेमच नाही! वाहतुकीचा बोजवारा उडतो तो तुम्हासारख्या नियम मोडून गाड्या चालवणाऱ्या लोकांमुळे!! मुंबईकरांच्या सुरक्षिततेची जरासुद्धा चाड नाही तुम्हाला...'' 
""तसं नाही राजे, पण...'' बाळाजीपंतांची गाडी पहिल्या गिअरमध्येच बंद पडली. 

"खामोश! एक शब्द बोलू नका...दोन मिनिटं सिग्नलला थांबलात तर अपमान होतो का तुमचा? आमचे शिलेदार असलात तरी रयतेचे चाकर आहात, हे कदापि विसरो नका! सिग्नल पाळायला नको, सीटबेल्ट बांधायला नको, आणि नो पार्किंगमध्ये गाडी लावणं हा तर तुमचा जन्मसिद्ध हक्‍कच नाही का?,'' राजियांच्या मुखातून मल्टिप्लेक्‍सात स्वस्त झालेल्या पॉपकॉर्नसारख्या लाह्या फुटत होत्या. 

""क्षमा असावी राजे, पण..,'' बाळाजीपंत कसेबसे म्हणाले. 
""कसली क्षमा? कसली दया? ह्या मुंबईवर प्रेम न करणाऱ्या कोणालाही क्षमा नाही...कोणाकोणाला दंड ठोठावला आहे वाहतूक विभागाने?'' राजियांनी पृच्छिले. 
""बांदऱ्याचे आपले लाडके पुतणे, सलमान खान, कपिल शर्मा आदींना नोटिसा गेल्या आहेत राजे!!'' घाईघाईने बाळाजीपंतांनी माहिती दिली. 

"मग हरकत नाही...नियम मोडणारे तुम्ही एकटे नाही! आणखी कोण कोण आहेत नियम मोडणारे?'' राजे विचारमग्न अवस्थेत विचारतें झाले. 
"" आ...आ...आपल्याही न...न...नावे द...द...दंडाची नोटिस आली आहे, राजे!,'' बाळाजीपंतांच्या गाडीने पुन्हा स्टार्टिंग ट्रबल दिले. 

""क्‍काय? आम्ही?,'' असे म्हणून राजे तब्बल 180 सेकंद सिग्नलपाशी तिष्ठावे, तसे तिष्ठले. मग घाईघाईने हातात पेन घेऊन काही लिहू लागले. मग कष्टी चेहऱ्याने म्हणाले- 
""गानकोकिळेच्या चरित्राच्या रॉयल्टीतून फेडू आम्ही दंडाची रक्‍कम...नियम म्हंजे नियम!'' 

- ब्रिटिश नंदी 
 

Web Title: Pune Edition Editorial Article on Fine in Dhing Tang