हॅप्पी फ्रेंडशिप डे ! (ढिंग टांग !)

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 ऑगस्ट 2018

आपली मैत्री किती जुनी आहे? माझ्या दप्तरातल्या आवळे-चिंचा तुम्ही खाव्यात, तुमच्या डब्यातला खिमा मी मटकवावा, असे किती वर्षे चालले? मला बटाटावडा आवडतो म्हणून तुम्ही स्वत:...जाऊ दे. गेले ते दिवस, राहिल्या त्या आठवणी...परिस्थिती झपाट्याने बदलत गेली आणि एक कंपासपेटी दोघात वापरणारे आपण एकमेकांना करकटकाने टोंचू का लागलो? 

प्रिय मित्र उधोजीसाहेब यांसी, जागतिक मैत्री दिनाच्या अनेकानेक हार्दिक शुभेच्छा. फारा दिवसांत आपली गाठभेट नाही. अर्थात दोन जीवलग मित्र रोज भेटले नाहीत, तरी ते शेवटी मित्रच असतात. मनाने ते एकमेकांसोबत आणि एकमेकांसाठीच जगत असतात. आपले असेच आहे की नाही? आजच्या फ्रेंडशिप डेच्या निमित्ताने थेट "मातोश्री'वर डोकवावे, आणि तुमच्या मनगटावर फ्रेंडशिप बॅंड बांधून यावे, असे राहून राहून वाटत होते. लेकिन ये हो न सकाऽऽ और अब यह आलम है के तू नही, तिरा गम, तिरी जूस्तजू भी नही...गुजर रही है कुछ इस तरह जिंदगी जैसे, इसे किसी के सहारे की आरजू भी नहीऽऽ....अशी अवस्था झाली आहे. 

बंगालच्या मोमतादीदींच्या जानेवारीत होणाऱ्या विराट मेळाव्यासाठी तुम्ही कोलकात्याला जाणार आहात असे कळले. बंगाली कुडता आणि लफ्फेदार धोतर ह्या पोशाखात तुम्ही जाम रुबाबदार दिसाल, ह्यात शंका नाही. जानेवारीत आमचाही तिथेच मेळावा होणार असल्याने तुम्ही जानेवारी महिना बंगालातच काढा, आणि त्याही मेळाव्याला हजेरी लावा, अशी मित्रत्वाची सूचना आत्ताच करुन ठेवतो. 

लोकांच्या पराभव जिव्हारी लागतो, माझ्या जिव्हारी जळगावचा विजय लागला आहे! जीवलग मित्राचा पराभव करणे सोपे का असते? आमच्या गिरीशभाऊंनी जळगावच्या विजयाची बातमी (फोनवरून) दिली, तेव्हा मी त्यांना सद्‌गदित सुरात म्हणालो, "" हा प्रचंड विजय मला किती दु:ख देतोय, ह्याची कल्पना आहे तुम्हाला? आता आठ-पंधरा दिवस मला बांदऱ्यावरून विमानतळावरही जाता येणार नाही!!'' 

आपली मैत्री किती जुनी आहे? माझ्या दप्तरातल्या आवळे-चिंचा तुम्ही खाव्यात, तुमच्या डब्यातला खिमा मी मटकवावा, असे किती वर्षे चालले? मला बटाटावडा आवडतो म्हणून तुम्ही स्वत:...जाऊ दे. गेले ते दिवस, राहिल्या त्या आठवणी...परिस्थिती झपाट्याने बदलत गेली आणि एक कंपासपेटी दोघात वापरणारे आपण एकमेकांना करकटकाने टोंचू का लागलो? 

झाले गेले सारे विसरुन आपण पुन्हा एकत्र यायला हवे. हातात हात गुंफून रयतेपुढे जायला हवे. स्वबळाचा नारा किती महागात पडतो, हे आता तुम्हाला कळले असेलच. फ्रेंडशिप डेची भेट म्हणून एक शानदार फ्रेंडशिप बॅंड पाठवत आहे. तो मनगटाला गुंडाळून आपल्या जुन्या मैत्रीच्या आठवणी आळवा. तुमच्या भेटीच्या प्रतीक्षेतला मित्र. नानासाहेब. 
* * * 
नाना- 
मैत्री दिनालाच तुमचे पत्र मिळाले, तेव्हा मी नेमका बटाटेवडाच खात होतो. पत्र बघितले, आणि वडा पुन्हा ताटलीत ठेवून दिला. जानेवारी महिन्यात मोदीविरोधी मेळावा कोलकात्यात भरतो आहे आणि त्याला मी जाणार आहे. तथापि, बंगाली कुडता आणि धोतर वगैरे नस्ते उद्योग मी करणार नाही. असली दाखवेगिरी आमच्याकडे चालत नाही. एक घाव दोन तुकडे असा आमचा खाक्‍या तुम्हाला परिचित आहेच. मोमतादीदींनी आमची तारीख खूप आधी बुक केली होती, तिथे जाणे भाग आहे. 

तुमच्या मेळाव्याचे काय करायचे ते नंतर पाहू!! 
जळगावातील विजयाचे काही सांगू नका. तुमचे विजय कसे असतात, हे आम्हाला चांगले ठाऊक आहे. तुमच्या मैत्रीच्या आणाभाकांना काय अर्थ असतो, हे आम्हाला पंचवीस वर्षांनी कळले. म्हणूनच आम्ही स्वबळाचा नारा दिला आहे. त्याचा इंगा लौकरच कळेल. दरम्यान, तुम्ही बांदरा ओलांडून विमानतळाकडे जायला काहीही हरकत नाही. आमच्या मुंबईच्या रस्त्यातले खड्‌डे मावळ्यासारखाच प्रसाद देतात, हे लक्षात ठेवा!! 
...आणि हो, फ्रेंडशिप बॅंड म्हणून तुम्ही पुडीचा दोरा पाठवलात!! त्याला हिंगाचा वास येतो आहे!! कळावे. उधोजी. 

- ब्रिटिश नंदी 

Web Title: Pune Edition Editorial Article on Friendship Day