बळी की बळीचा बकरा ? (मर्म)

बळी की बळीचा बकरा ? (मर्म)

भारताचे नाव जगाच्या ई-कॉमर्स नकाशावर ठळकपणे अधोरेखित करणाऱ्या "फ्लिपकार्ट' या मातब्बर कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) बिन्नी बन्सल यांनी गैरवर्तणुकीच्या आरोप प्रकरणी तडकाफडकी राजीनामा दिला आहे. मात्र, या प्रकरणातील अनेक कच्चे दुवे आणि त्याचबरोबर स्वतंत्रपणे झालेल्या त्यांच्या चौकशीतील काही त्रुटी लक्षात घेता बिन्नी यांचा "बळी' गेला आहे की त्यांना "बळीचा बकरा' बनवण्यात आले आहे, याबद्दल शंका घेण्याजोगी परिस्थिती आहे. बिन्नी यांच्यासमवेत सचिन बन्सल यांनी "फ्लिपकार्ट' या "स्टार्टअप'ची सुरवात केली आणि बघता बघता ती जोमाने फोफावली. ई-कॉमर्स क्षेत्रात जागतिक नकाशावर आधीच मुसंडी मारणाऱ्या "वॉलमार्ट' व "ऍमेझॉन' या दोन्ही कंपन्यांचा मग "फ्लिपकार्ट'वर डोळा नसता, तरच नवल होते.

अखेर "वॉलमार्ट'ने या कंपनीवर ताबा मिळवला, तेव्हा सचिन यांना कंपनी सोडणे भाग पडले; कारण आपण "ऍमेझॉन'सोबत काम करावे, असे त्यांना वाटत होते. त्यानंतरच हे बिन्नी यांच्या गंभीर गैरवर्तनाचे कथित प्रकरण बाहेर आल्यामुळे या आरोपांमागे "कॉर्पोरेट वॉर'चा हात तर नाही ना, अशा चर्चांना उधाण आले आहे. 

या संपूर्ण प्रकरणाचा तपशील "वॉलमार्ट'नेच जाहीर केला असून, बिन्नी बन्सल यांचा राजीनामाही स्वीकारला आहे. मात्र, बिन्नी यांनी आपल्यावरील आरोप ठामपणे फेटाळले आहेत. "रॉयटर्स' या वृत्तसंस्थेने यासंबंधात दिलेल्या तपशिलानुसार हे प्रकरण काही वर्षांपूर्वीचे आहे. गेल्या जुलैमध्ये कंपनीत या प्रकरणाची वाच्यता झाली. आरोप करणारी व्यक्‍ती एकेकाळी "फ्लिपकार्ट'मध्येच काम करत होती; मात्र आरोप करण्यात आले, तोपावेतो ती व्यक्‍ती कंपनीतून बाहेर पडली होती. पुढे या प्रकरणाची चौकशी झाली; पण त्यातून बिन्नी हे दोषी आहेत किंवा नाहीत याबाबत संभ्रम निर्माण झाला.

"वॉलमार्ट' कंपनीबरोबर बन्सल यांच्या "फ्लिपकार्ट'ची हातमिळवणी झाली, तेव्हा या घटनेचा तपशील आपल्याला सांगण्यात न आल्यामुळे "वॉलमार्ट'चे व्यवस्थापन बरेच अस्वस्थ झाले होते आणि त्याचीच परिणती अखेर बिन्नी यांना "फ्लिपकार्ट'मधून बाहेर पडावे लागण्यात झाली, असे आता समोर येत आहे.

मात्र, "फ्लिपकार्ट'च्या संचालक मंडळाच्या निवेदनानुसार तक्रारदारांच्या दाव्यांना पुष्टी मिळणारे पुरावे चौकशीत बाहेर आले नाहीत आणि शिवाय अन्य काही त्रुटीही आढळून आल्या. त्यामुळेच बिन्नी यांना बाहेर पडावे लागण्यामागे ई-कॉमर्स क्षेत्रात करोडोंचा व्यवहार असलेल्या कंपन्यांमधील एकमेकांवर वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी सुरू असलेल्या शह-काटशहाचे राजकारण तर नाही ना, अशीही शंका उपस्थित केली गेली आहे. त्यामुळे या प्रकरणामागील गूढ अधिकच गडद झाले आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com