काय हे मिस्टर कुल ? (मर्म)

काय हे मिस्टर कुल ? (मर्म)

"आयपीएल' स्पर्धा गेल्या काही मोसमापासून येन केन प्रकरणाने चर्चेत राहात आहे. कधी मॅच फिक्‍सिंग, कधी स्पॉट फिक्‍सिंग, तर कधी खेळाडूंच्या गलेलठ्ठ करारांमुळे स्पर्धा गाजत आहे. मुंबई वि. बंगळूर सामन्यात पंचांनी नाकारलेल्या नो-बॉलचे प्रकरण विसरत नाही, तोच चेन्नई वि. राजस्थानविरुद्धच्या सामन्यात पंचांनी नाकारलेल्या नो-बॉलचे प्रकरण चांगलेच गाजले. दोन्ही सामन्यातील नो-बॉलमधील साम्य म्हणजे ते अखेरच्या निर्णायक षटकात घडले. चेन्नईला विजयासाठी तीन चेंडूंत आठ धावांची गरज असताना राजस्थानचा गोलंदाज स्टोक्‍स याने टाकलेला चेंडू हा कंबरेच्या उंचीवर पडलेला होता.

फलंदाज सॅंटनेरला हा चेंडू खेळताना उडी मारायला लागली होती. त्या वेळी गोलंदाजांकडील पंचांचा हात शरीरापासून लांब झाला. फलंदाज आणि बघणाऱ्या प्रत्येकाला ती नो-बॉलची खूण वाटली. प्रत्यक्षात पंचांनी तसे काहीच केले नाही. खेळ पुढे चालू ठेवण्याची खूण केली. झाले, नुकताच बाद झालेला चेन्नईचा कर्णधार धोनीचा संयम सुटला. फलंदाज पंच आणि स्क्वेअर लेगवरील पंचांशी वाद घालत असतानाच धोनी हातवारे करत मैदानात आला. कर्णधाराने ड्रेसिंगरूममधून पंचांशी वाद घालायला मैदानात येणे धक्कादायक होते. कंबरेवरच्या उंचीवरील नो-बॉलची पहिली खूण स्क्वेअर लेग पंच करतो आणि मग गोलंदाजाकडील पंच. यातील काहीच घडले नव्हते.

पंचांकडून एखादा इशारा करण्यात येतो तेव्हा तो आधी मैदानावर आणि मग पॅव्हेलियनमध्ये बसलेल्या स्कोअररकडे तो इशारा करतो. तेव्हाच पंचाच्या निर्णयाची प्रक्रिया पूर्ण होते. असेही येथे काही घडले नाही. मग, धोनी का मैदानात आला? "आयपीएल'सारख्या एका देशांतर्गत स्पर्धेत त्याने असे कृत्य करावे हे शोभणारे नव्हते. पंचांनी तंत्रज्ञानाचा आधार (तिसरा पंच) का घेतला नाही, हा प्रश्‍न असला तरी धोनीने संयम सोडून मैदानात येणे शोभणारे नाही.

नामवंत खेळाडू पंचांवर दबाब टाकतात, हे आता नवे राहिलेले नाही. अशा वेळी पंचांनी ठाम राहायला हवे. खेळ कुठलाही असो, मैदानावरील पंच तेथे घडणाऱ्या प्रत्येक घटनेचा पहिला साक्षीदार असतो आणि त्याचा निर्णय अंतिम असतो. पंच चुकले तर तक्रार करण्यासाठी पर्याय उपलब्ध आहेत. ते न वापरात मैदानात येऊन हुज्जत घालणे योग्य नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com