शत-प्रतिशत धक्का 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 ऑगस्ट 2018

नगरपालिका, महापालिका तहहयात कॉंग्रेसच्याच म्हणजे दिवंगत नेते मदनभाऊ पाटील यांच्याच ताब्यात. एवढी मोठी सत्तास्थाने असूनही सांगली-मिरजेसारखी शहरे विकासाच्या पातळीवर मागे पडली.

महापालिका निवडणुका या प्रामुख्याने स्थानिक प्रश्‍नांवर लढविल्या जात असल्याने त्यांच्या निकालावरून राज्याच्या किंवा देशाच्या राजकारणाबद्दल काही निष्कर्ष काढणे योग्य नसते. तरीही सांगली व जळगाव महापालिका निवडणुकीतील निकालांचा धक्का राज्यभर जाणवला तो त्यातल्या अनपेक्षिततेमुळे आणि सध्याच्या अस्वस्थ राजकीय-सामाजिक परिस्थितीमुळे. स्थानिक पातळीवरील प्रस्थापितविरोधी जनभावना (ऍन्टिइन्कबन्सी) दोन्ही ठिकाणी महत्त्वाची ठरली, असे दिसते. पण जास्त चर्चा झाली ती सांगलीत "कमळ' कसे फुलले याची. याचे कारण पश्‍चिम महाराष्ट्रातला हा जिल्हा कॉंग्रेसचा पारंपरिक बालेकिल्ला. आणीबाणीनंतरच्या जनता लाटेतही येथे कॉंग्रेस हारली नव्हती. वसंतदादांनी सहकाराच्या माध्यमातून येथे उभारलेले जाळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला मजबूत करणारे होते. सामान्य माणसांशी त्यांनी जोडलेली कॉंग्रेसची नाळ त्यांच्या पश्‍चात ढिली होत गेली. 

पतंगराव कदम यांनी पक्षाला या भागात चांगले नेतृत्व दिले होते; पण या दोन्ही नेत्यांच्या गटातील संघर्ष पक्षाला मारक ठरला. या पार्श्‍वभूमीवर मागील चार वर्षांत आलेली मोदी लाट येथे त्सुनामीच ठरली. आज या घडीला कॉंग्रेसकडे अपवाद सोडल्यास एकही मोठी स्थानिक स्वराज्य संस्था राहिलेली नाही. राष्ट्रवादीचीही तीच अवस्था असून, जिल्हा सहकारी बॅंक सोडल्यास "राष्ट्रवादी'ची पीछेहाट आहे. त्यांचे अनेक मातब्बर सरदार भाजपचे सेनापती कधी झाले हे येथील पक्षाला कळलेच नाही. ज्या महापालिकेत भाजप झिरो होता तो हिरो कसा झाला? एकाच वाक्‍यात सांगायचे तर कॉंग्रेसच्या निष्क्रियतेबद्दलची ही जनतेची प्रतिक्रिया आहे. भाजप येथे वाढली ती "राष्ट्रवादी'तील काहींच्या कृपेने. आयात केलेल्या नेत्यांच्या जोरावर भाजपने यश मिळविले. सलग 15 वर्षे दोन्ही कॉंग्रेसचे येथे चार मंत्री होते. सगळे आमदार, खासदार आणि स्थानिक स्वराज्य संस्थाही त्यांच्याच ताब्यात होत्या. 

नगरपालिका, महापालिका तहहयात कॉंग्रेसच्याच म्हणजे दिवंगत नेते मदनभाऊ पाटील यांच्याच ताब्यात. एवढी मोठी सत्तास्थाने असूनही सांगली-मिरजेसारखी शहरे विकासाच्या पातळीवर मागे पडली. टक्‍केवारी, भूखंड गैरव्यवहार, "वसंतदादा बॅंके'त अडकलेल्या पालिकेच्या ठेवी अशा अनेक गोष्टी प्रचारात फारशा आल्या नाहीत, तरीही जनतेने या सर्वांचा हिशेब चुकता केलेला दिसतो. विद्यमान महापालिकेत कॉंग्रेस सत्ताधारी तर राष्ट्रवादी विरोधी पक्षनेता होता. या दोघांचा "संगनमता'चा कारभार जनतेला पसंत पडला नाही.

उलट भाजपचे आमदार सुधीर गाडगीळ यांच्या स्वच्छ प्रतिमेला मतदारांनी पसंती दिली. जळगावात खरी परीक्षा होती ती जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांचीच! एकनाथ खडसेंसारखे दिग्गज नेते तसे अलिप्त असतानाही त्यांनी भाजपला मिळवून दिलेला विजय म्हणूनच कौतुकाचा ठरला आहे. जिल्ह्यात पक्षाचा प्रभाव असूनही जळगाव महापालिकेत मात्र शिवसेनेची पकड त्यांना ढिली करता आली नव्हती. सुरेश जैन यांची प्रतिमा जळगावचे सर्वेसर्वा नेते अशीच बनली होती. पण इथेदेखील भाजपने मुसंडी मारली आणि सुरेश जैन यांची ही गढी खालसा केली. 
 

Web Title: Pune Edition Editorial Article on MARM on Politics