सहृदय अन्‌ कठोरही

अनिश पाटील
सोमवार, 2 जुलै 2018

मुंबईत 2008 मध्ये झालेल्या दहशवादी हल्ल्यानंतर परदेशातील तपासात पडसलगीकर यांनी महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली. त्यांच्याच प्रयत्नांमुळे दहशतवादी व त्यांच्या हॅडलर्सचे संभाषण, महत्त्वपूर्ण पुरावे परदेशी यंत्रणांकडून मिळवता आले. त्यामुळे पाकिस्तानच्या या हल्ल्यातील सहभागाबाबत महत्त्वपूर्ण पुरावा भारताचा हाती लागला.

कोणत्याही माणसाला त्याच्या क्षेत्रातील सर्वोच्च स्थान मिळवण्यासाठी कामात परिपूर्ण असावेच लागले; पण त्याला उत्तम स्वभावाची जोड मिळाली, तर ते व्यक्तिमत्त्व हवेहवेसे वाटते. राज्याच्या पोलिस महासंचालकपदी नियुक्ती झालेले दत्तात्रय पडसलगीकर यांच्याबाबत काहीसे असेच आहे. "मॅन विथ परफेक्‍ट पोलिसिंग अँड गोल्डन हार्ट' असे त्यांना म्हटले तर वावगे ठरणार नाही. पोलिस शिपायांच्या व्यथा ओळखून त्यांनी मुंबईत "आठ तास ड्यूटी' ही संकल्पना राबवली. पोलिसांचे आरोग्य व आहार सुधारणा व्हावी, यासाठी पडसलगीकर यांनी मेहनत घेतली. कर्मचाऱ्यांच्या मुलांसाठी चांगल्या नोकऱ्या मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतला. 

पोलिस सांस्कृतिक मंच उभारला. कौतुकाची थाप देण्यासाठी अगदी कनिष्ठ अधिकाऱ्याच्या घरी जाऊन त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणे असो, की उल्लेखनीय कारवाई करणाऱ्या पोलिसाचे जाहीर कौतुक करणे असो. पडसलगीकरांची ती खासियत आहे. ते उस्मानाबादमध्ये पोलिस अधीक्षक असताना त्यांनी निजामाविरोधातील कारवाईत हुतात्मा झालेल्या पोलिसांच्या पत्नींची माहिती घेतली. साक्षीदार गोळा केले. त्यांच्या या प्रयत्नांमुळे 30 वर्षांनंतर अशा पोलिसांच्या कुटुंबीयांना पेन्शन सुरू झाली. पोलिस उपायुक्त असताना कामाठीपुरा येथील 450 अल्पवयीन मुलींची सुटका करून पडसलगीकर यांनी त्यांचे पुनर्वसन केले होते. त्यांनी पोलिस म्हणून बजावलेली कामगिरीही खूप महत्त्वपूर्ण आहे. 

मुंबईत 2008 मध्ये झालेल्या दहशवादी हल्ल्यानंतर परदेशातील तपासात पडसलगीकर यांनी महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली. त्यांच्याच प्रयत्नांमुळे दहशतवादी व त्यांच्या हॅडलर्सचे संभाषण, महत्त्वपूर्ण पुरावे परदेशी यंत्रणांकडून मिळवता आले. त्यामुळे पाकिस्तानच्या या हल्ल्यातील सहभागाबाबत महत्त्वपूर्ण पुरावा भारताचा हाती लागला. वडील सैन्यात असल्यामुळे नेहमीची बदली, त्यामुळे शिक्षणासाठी पडसलगीकर यांना 10वर्षे पुण्यात राहावे लागले. फर्गसन व पुणे विद्यापीठातून त्यांनी फ्रेंच साहित्यातील त्यांच पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. त्यांचा उर्दूचा विशेष अभ्यास आहे. भारतीय पोलिस दलात सामील झाल्यानंतर परदेशातही त्यांनी कर्तृत्वाचा झेंडा रोवला. "लोकप्रशासना'वर पॅरिसमधील परीक्षेत ते प्रथम आले. 

कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी त्यांनी वेळोवेळी कठोर पावलेही उचलली. नागपुरात मटका व दारूचा धंदा करणाऱ्यांविरोधात खंबीर कारवाई केली. मुंबईतील संघटित टोळ्यांची दहशत मोडून काढली. आर्थिक गुन्हे विभागाच्या उपायुक्तपदीही त्यांनी काम केले आहे. अशा या अधिकाऱ्याकडे राज्याचे महत्त्वाचे पद आल्याने त्यांच्याविषयीच्या सर्वांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. 

Web Title: Pune Edition Editorial Article on NamMudra