इम्रानची 'कसोटी'

Pune Edition Editorial Article on Pakistan political Situation
Pune Edition Editorial Article on Pakistan political Situation

पाकिस्तानातील निवडणुकांच्या निकालाचे कल पाहता इम्रान खानच्या "तेहरिक ए-इन्साफ' पक्षाला सर्वाधिक जागा मिळून तो सत्ता काबीज करण्याच्या स्थितीत आहे, हे एव्हाना स्पष्ट झाले आहे. पाकिस्तानातील अलीकडच्या काळातील घटनाक्रमावर नजर टाकली, तर तेथील लष्कराने लिहिलेल्या संहितेबरहुकूम सारे काही घडत आहे. आपल्या इशाऱ्यानुसार चालणारा पंतप्रधान पाकिस्तानी लष्कराला हवा होता, यात काहीच गुपित राहिलेले नसले, तरी त्यासाठी साजेसे नेपथ्य उभे करण्यास कोणतीही कसर सोडण्यात आली नव्हती. म्हटले तर तेथे सगळी पात्रे जागच्या जागी आहेत.

स्वतंत्र म्हणविणारा निवडणूक आयोग आहे, राजकीय पक्ष आहेत, मतदान केंद्रे आणि मतदान प्रतिनिधी आहेत, युरोपीय समुदायाचे निवडणूक निरीक्षकही मौजुद आहेत. हे सगळे असूनही मतपेटीतून लोकांचा निष्पक्ष कौल बाहेर आला आहे आणि त्यातून हे शांततामय सत्तांतर घडते आहे, या दाव्याविषयी जगात साशंकताच व्यक्त होते आहे. या देशाच्या लडखडत्या लोकशाहीत यापेक्षा वेगळे काही अपेक्षितही नव्हते. 

इम्रानसाठी मैदान मोकळे व्हावे म्हणून नवाझ शरीफ यांना आधीच भ्रष्टाचाराच्या आरोपावरून तुरुंगात टाकण्यात आले होते. मतमोजणीच्या वेळी पाकिस्तान मुस्लिम लीग व पाकिस्तान पीपल्स पार्टीच्या निवडणूक प्रतिनिधींना मतमोजणी केंद्रांतून हुसकावून लावण्यात आल्याचा आरोप शाहबाज शरीफ व बिलावल भुट्टो यांनी केला आहे. त्यामुळेच इम्रानचे यश हे झाकोळलेले राहणार. तरीही पारंपरिक नि प्रस्थापित राजकीय पक्षांविषयी आशियातील अनेक देशांमध्ये अलीकडे जनतेत जी अपेक्षाभंगाची आणि वैफल्याची भावना आढळून येते आहे, त्याचेही प्रत्यंतर काही बाबतीत या निवडणुकीत आले आहे, हे नाकारता येणार नाही.

मुळात क्रिकेटमुळे वलय प्राप्त झालेला इम्रान राजकीय मैदानावरही उत्तम खेळी करेल, अशी एक आशेची किनार या निकालामागे असू शकते; परंतु या अपेक्षांना पुरे पडणे ही सोपी बाब नाही. एक तर पाकिस्तानातील व्यवस्थेवरील आपली पकड लष्कराने आता आणखी घट्ट केली आहे. तेथील नागरी-मुलकी व्यवस्थेचा कमालीचा संकोच झाला आहे. इम्रान खानलाही त्याच चौकटीत काम करावे लागणार आहे. 

राजकारणात पाय रोवण्यासाठी त्याला अद्याप बरीच मजल मारायची आहे. शिवाय दहशतवादाच्या भस्मासुराने या देशाच्या डोक्‍यावरच हात ठेवायला सुरुवात केली असल्याने त्याच्यापुढील आव्हान आणखी बिकट होणार आहे. दहशतवादी संघटना राजकीय प्रक्रियेत शिरकाव करू लागल्या आहेत. निवडणुकीत त्यांची डाळ फार शिजली नसली, तरी या धोक्‍याचे सावट गडद आहे. पाकिस्तानातील जे काही नागरी जीवन थोडेफार अस्तित्वात आहे, त्याचीही राखरांगोळी व्हायची नसेल, तर इम्रान खानला आपली इनिंग्ज अधिक विचारपूर्वक खेळावी लागेल.

केवळ पाश्‍चात्त्य शिक्षण, सफाईदार इंग्रजी, उच्च राहणीमान नि गोरागोमटा चेहरा म्हणजे आधुनिकता नव्हे. जनतेच्या ऐहिक प्रश्‍नांना भिडणे आणि मध्ययुगीन विचारांची जळमटे दूर करणे म्हणजे आधुनिकतेचा स्वीकार. तसा तो केला, तरच तिथल्या सरंजामी बुरुजांना थोडाफार धक्का बसण्याची शक्‍यता. आर्थिक स्थैर्य, विकास, शांतता वगैरे आश्‍वासने त्याने तोंड भरून दिली असली, तरी त्यासाठी देशांतर्गत पातळीवर कडव्या धर्मांधतेला आवर घालण्यासाठी तो काय करणार, हा खरा प्रश्‍न आहे. 

प्रचारकाळात कट्टर राष्ट्रवादाची भाषा करीत त्याने काश्‍मीरप्रश्‍नावरून भारताविरुद्ध अकांडतांडव केले. नवाझ शरीफ भारताच्या कच्छपी लागले असल्याचा आरोप करून तो त्याने निवडणुकीचा एक महत्त्वाचा मुद्दा बनवला होता. भारतद्वेषाचे पाकिस्तानात हुकुमी ठरणारे कार्ड त्याने पुरेपूर वापरले; पण जनतेला दिलेली आश्‍वासने पूर्ण करायची असतील, तर प्रचारकाळातील अभिनिवेश सोडून त्याला वास्तव आणि व्यवहार पाहावा लागेल.

पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय पातळीवर निर्माण झालेली प्रतिमा सुधारायची, तर याला पर्याय नाही. त्या देशाची आर्थिक स्थिती चिंताजनक झालेली आहे आणि कर्जाच्या सापळ्यातून बाहेर पडण्यासाठी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीला साकडे घालावे लागणार आहे. अशा परिस्थितीत तो कशी पावले टाकतो, हे पाहणे औत्सुक्‍याचे ठरेल. 

पूर्णपणे लष्कराच्या कह्यात असलेल्या नव्या पंतप्रधानाबरोबर कशा रीतीने संबंध ठेवायचे, हे भारतालाही ठरवावे लागेल. आणखी एका बाबतीत भारताने तेथील घडामोडींपासून बोध घ्यायला हवा. वेगवेगळ्या संस्थांची स्वायत्तता आणि विश्‍वासार्हता लयाला जाऊ लागली, की लोकशाहीचा निव्वळ सांगाडा उरतो. पाकिस्तानची तशी घसरण झपाट्याने सुरू आहे. लोकशाहीच्या बाबतीत भारतातील परिस्थिती तुलनेने खूपच चांगली आहे, हे निर्विवाद; तरीही काय होता कामा नये, याचा धडा पाकिस्तानमधील घडामोडींवरून नक्कीच घेता येण्यासारखा आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com