ज्येष्ठांच्या अवमानाची संस्कृती (दिल्ली वार्तापत्र)

अनंत बागाईतकर 
सोमवार, 8 एप्रिल 2019

वयोवृद्धांना योग्य सन्मान देऊन बाजूला करणे शक्‍य असते. भाजपचे सध्याचे नेतृत्व मात्र, ज्येष्ठांना मानहानिकारक वागणूक देऊन राजकारणातील खालची पातळी गाठत आहे. 

अभिवादन शीलस्य नित्यम्‌ वृद्धोपसेविना, 
चत्वरी तस्य वर्धन्ते, आयुर्विद्या यशो बलम्‌ ! 

जे विनम्र असतात आणि वृद्धांची नेहमी सेवा करतात त्यांना जीवनात चार लाभ होतात- आयुष्यमान, शहाणपण, नावलौकिक आणि बल. भारतीय संस्कृतीत संस्कृतचे विशेष महत्त्व मानले जाते. त्यातही काही मंडळी संस्कृत भाषा कळो अथवा ना कळो, भारतीय संस्कृतीपेक्षा हिंदू-हिंदुत्वाचा वृथा अभिमान बाळगतात. या "व्यर्थ अभिमाना'चा उल्लेख केल्यानंतर संस्कृत भाषा, त्या भाषेतील सुभाषिते व श्‍लोकांच्या माध्यमातून शतकानुशतके पिढी-दरपिढी झिरपत आलेल्या ज्ञान व शहाणपणाशीही त्यांचा संबंध असण्याचे कारण नाही हेही ओघाने आलेच! निसर्गचक्रात प्रत्येक प्राणी व वस्तूला आयुष्य असते आणि त्या ओघात त्या कालवशही होत असतात. हेही खरे आहे की जीवनात कुठे थांबायचे, हे प्रत्येक व्यक्तीला ठरवावे लागते.

जे ठरवत नाहीत ते बाहेर फेकले जातात. वरील सुभाषितात व्यक्त भावनेचा संदर्भ लक्षात घेतल्यास वयोवृद्धास उचित सन्मान व विनम्रपणे वृद्धत्वाची जाणीव देऊन बाजूला करणे शक्‍य असते; परंतु विचारपूसही न करता परस्पर त्यांना अडगळीत टाकणे याला चोरटेपणा म्हणतात. सध्या भारतीय राजकारणात हेच दिसून येत आहे. हिंदू-हिंदुत्व व हिंदू संस्कृतीचा वसा घेणाऱ्या या परिवाराचे पालकत्व स्वीकारलेल्या सांस्कृतिक संघटनेकडून या अशिष्ट-असंस्कृत आचरणाला मूक पाठिंबा आहे की ही त्यांची आगतिकता आहे, हेही एक प्रश्‍नचिन्ह आहे. 

पंचाहत्तरी पार केलेल्यांना निवडणुकीत उमेदवारी न देण्याची भूमिका भाजपच्या वर्तमान नेतृत्वाने जाहीर केली होती. पक्षात नव्या रक्ताला वाव देण्याच्या या भूमिकेत काहीच गैर नाही. त्याचा अर्थ हा नव्हे की पंचाहत्तरी पार केलेल्यांना पक्षातून हद्दपार करा किंवा त्यांची मानहानी करा. लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन यांचे यासंदर्भातील उदाहरण बोलके ठरेल. सुमित्राताई 12 एप्रिल रोजी पंचाहत्तरी पार करणार आहेत. मध्य प्रदेशातील इंदोरचे प्रतिनिधित्व त्यांनी तब्बल आठ वेळेस केले आहे. आजही इंदोरमध्ये असे बोलले जाते की "ताईंना उमेदवारी दिल्यास त्या अजूनही निवडून येऊ शकतात.' सुमित्राताईंनी पत्र लिहून ज्या भावना व्यक्त केल्या, त्यामुळे पक्षसंघटना व भाजपच्या सर्वोच्च नेतृत्वाचा चोरटेपणा उघड झाला आहे. लोकसभेच्या अध्यक्ष या नात्याने सुमित्रा महाजन यांचे नाव भाजपच्या पहिल्या उमेदवार यादीतच येणे अपेक्षित होते. पंतप्रधान आणि पक्षाध्यक्षांची नावे पहिल्याच यादीत जाहीर करण्यात आली होती.

संसदीय लोकशाही व्यवस्थेत एक असाही संकेत आहे, की लोकसभा अध्यक्षांना सहसा वगळण्यात येत नाही. ब्रिटनमधील परंपरेप्रमाणे तर "हाऊस ऑफ कॉमन्स'च्या सभापतींच्या विरोधात उमेदवारदेखील उभे केले जात नाहीत. त्यामुळे अद्याप सार्वजनिक जीवनात सक्रिय असलेल्या सुमित्रा महाजनांना उमेदवारी देणे अपेक्षित होते. लोकसभा अध्यक्षा या नात्यानेही त्यांची कामगिरी सतत सरकारला लाभदायकच राहिली होती. असे असूनही त्यांना चोरटेपणाने उमेदवारी नाकारण्यात आली. 
अखेर वाट पाहून कंटाळलेल्या सुमित्राताईंना पत्र लिहावे लागले. आपल्याला उमेदवारी नाकारण्याबद्दल स्पष्टपणे सांगण्यास पक्षाला संकोच वाटत असावा व त्यामुळेच इंदोरच्या उमेदवारीवरून निर्माण झालेल्या अनिश्‍चित वातावरणाचा शेवट करण्याच्या दृष्टीने आपण लोकसभा निवडणूक न लढविण्याचा निर्णय जाहीर करीत असल्याचे सांगून त्यांनी जाहीर माघार घेतली; पण जाताजाता भाजपच्या वर्तमान सूत्रधारांनाही त्यांनी नम्र भाषेत त्यांनी सुनावले.

राजकीय गोटातील माहितीनुसार, संसदेचे शेवटचे अधिवेशन समाप्त झाल्यावर महाजन यांनी थेट पंतप्रधानांनाच इंदोरबद्दल विचारणा केली होती. त्या वेळी त्यांना "गो अहेड' म्हणून सांगितल्याने त्यांनी विश्‍वासाने इंदोरमध्ये तयारी सुरू केली होती. प्रत्यक्षात चोरटेपणा सुरू झाल्याने त्यांनी याचा अर्थ ओळखून स्वतःच निर्णय घेतला. 

सुमित्रा महाजनांपूर्वी लालकृष्ण अडवानी व मुरलीमनोहर जोशी यांच्यावरही ही वेळ आलीच होती. तेथेही सूत्रधारांनी "अळी मिळी गुपचिळी'चाच खेळ केला होता. याच पार्श्‍वभूमीवर लालकृष्ण अडवानी यांनी भाजपच्या स्थापना दिवसानिमित्त ब्लॉग लिहिला. त्यामध्ये या वयोवृद्ध नेत्याने "सूत्रधारां'कडून ज्या पद्धतीने पक्ष चालविला जात आहे त्याबद्दल अत्यंत चतुराईने नापसंती व्यक्त केली आहे. विशेषतः वर्तमान सूत्रधारांकडून ज्या विखारी भाषेचा वापर करून सार्वत्रिक घृणा आणि तिरस्काराचे वातावरण पसरविले जात आहे त्याबद्दल त्यांनी तीव्र नापसंती व्यक्त केली आहे. जनसंघ व नंतरच्या भाजपच्या संस्थापकांपैकी अडवानी एक आहेत. विरोधी पक्षांना देशद्रोही म्हणणे किंवा त्यांच्यावर शत्रूशी हातमिळवणीचा आरोप करणे, त्यांना विरोधक न मानता शत्रू मानणे हा प्रकार भाजपच्या तत्त्वात बसत नाही, असे त्यांनी या ब्लॉगमध्ये म्हटले आहे. 
अडवानींच्याच भावनेची पुष्टी करणाऱ्या एका प्रसंगाचा उल्लेख अपरिहार्य आहे. संसदेवर हल्ला झाल्यानंतर तत्कालीन विरोधी पक्षनेत्या सोनिया गांधी यांनी पहिला दूरध्वनी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींना करून त्यांची खुशाली विचारली होती. दुसऱ्या दिवशी काहीशा भावनाप्रधानतेने वाजपेयी यांनी सभागृहात त्याचा उल्लेख केला.

"ज्या देशात विरोधी पक्षाचा नेता पंतप्रधान सुरक्षित आहेत की नाहीत, याची काळजी करणारा पहिला दूरध्वी करतो, त्या देशातली लोकशाही निःसंशय सुरक्षित असल्याचे मी मानतो,' अशा शब्दांत वाजपेयींनी भावना प्रकट केल्या होत्या. याचे कारण वाजपेयी उदारमतवादी आणि विरोधी पक्षांनाही बरोबर घेऊन चालणारे होते. अडवानी यांनी म्हटले त्याप्रमाणे त्यावेळचा भाजप विरोधी पक्षांना शत्रू, देशद्रोही मानत नव्हता. सहकार्य ही एकतर्फी बाब नसते. ती देवाणघेवाण असते आणि त्यासाठी सत्तेत बसलेल्यांना अधिक उदारता दाखवायची असते. कारण ते अधिकारपदावर व सत्तेत असतात. सत्तेची गुर्मी करणे, विरोधी पक्षांना सूडबुद्धीने वागवणे, त्यांच्याविरोधात विखारी व व्यक्तिद्वेषाच्या पातळीवर उतरून प्रचार करणे हे अडवानी व वाजपेयींच्या परंपरेत न बसणारे आहे.

सत्तापक्ष या नात्याने प्रचाराची अपेक्षित पातळी राखण्यात भाजप नेते असफल ठरत आहेत. योगी आदित्यनाथ यांना तर निवडणूक आयोगाकडून सल्लावजा कानपिचक्‍या मिळाल्या आहेत. निती आयोगाचे प्रमुखदेखील आपले नोकरशहाचे स्थान विसरून राजकीय टीका टिप्पण्या करण्यात धन्यता मानत आहेत. ही सर्व लक्षणे ऱ्हासाकडे निर्देश करणारी आहेत. गेल्या सत्तर वर्षांत प्रचार प्रथमच एवढ्या खालच्या पातळीवर गेलेला नव्हता. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune Edition Editorial Article on Political Situation