राजस्थान, राहुल आणि आव्हाने ! 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 13 ऑगस्ट 2018

राजस्थानात गेले काही महिने प्रदेशाध्यक्ष सचिन पायलट यांनी तळ ठोकून पक्षबांधणी जोमाने केली आहे. मात्र मुख्यमंत्रिपदाचा चेहरा घोषित न करण्याचा निर्णय कॉंग्रेसला महागात पडू शकतो ! त्याचे कारण म्हणजे राहुल यांनी आपल्यासोबत आणलेले नेते अशोक गेहलोत आहेत.

लोकसभा निवडणुकीवर डोळा ठेवून भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांनी आपले लक्ष्य "पश्‍चिम बंगाल' आणि ममता बॅनर्जी हेच असल्याचे वारंवार स्पष्ट केले आहे; तर कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी मात्र लोकसभा निवडणुकीपूर्वी होणाऱ्या राजस्थान, मध्य प्रदेश तसेच छत्तीसगड या तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुकांवर लक्ष केंद्रित केले आहे. राहुल यांनी शनिवारी राजस्थानात केलेल्या "रोड शो'ला मोठा प्रतिसाद मिळाला आणि त्यांनी "राफाईल' विमान खरेदी प्रकरणातील कथित गैरव्यवहाराचा मुद्दा त्या वेळी लावून धरला. त्यामुळे निवडणुका विधानसभेच्या असल्या, तरी यासारखे राष्ट्रीय विषय चर्चेत ठेवण्याची त्यांची रणनीतीही स्पष्ट झाली. 

राजस्थानात गेले काही महिने प्रदेशाध्यक्ष सचिन पायलट यांनी तळ ठोकून पक्षबांधणी जोमाने केली आहे. मात्र मुख्यमंत्रिपदाचा चेहरा घोषित न करण्याचा निर्णय कॉंग्रेसला महागात पडू शकतो ! त्याचे कारण म्हणजे राहुल यांनी आपल्यासोबत आणलेले नेते अशोक गेहलोत आहेत. ते आणि पायलट असे दोन गट राजस्थान कॉंग्रेसमध्ये असून, दोघांनाही मुख्यमंत्रिपद हवे आहे. या दोन गटांत त्यासाठी सुरू असलेला संघर्ष हा लपून राहिलेला नाही आणि त्यामुळेच राहुल यांनी मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर न करण्याचा निर्णय घेतला आहे. मध्य प्रदेशातही कॉंग्रेस पक्षांतर्गत कुरबुरी मोठ्या प्रमाणावर आहेत. तेथे ज्योतिरादित्य शिंदे यांचे नाव "सीएम डेसिग्नेट' म्हणून जाहीर करणे कॉंग्रेसच्या फायद्याचे ठरू शकते. मात्र तेथेही नऊ वेळा खासदार म्हणून निवडून आलेले कमलनाथ हे बाशिंग बांधून तयार आहेत. राजस्थान तसेच मध्य प्रदेश या दोन्ही राज्यांत भाजपला "अँटिइन्कबन्सी फॅक्‍टर'चा सामना करावा लागणार आहे. 

प्रश्‍न आहे तो त्याचा राहुल कसा फायदा उठवतात हाच. राहुल यांच्यापुढील खरे आव्हान हे या दोन्ही राज्यात कॉंग्रेसमधील गटबाजीला आवर घालणे हे बाकी आहे. त्यात ते कितपत यशस्वी होतात, हे पाहायचे. कोणे एके काळी कॉंग्रेसचा पराभव फक्‍त कॉंग्रेसच करू शकते, असे म्हटले जायचे. तेच राजस्थान आणि मध्य प्रदेश या राज्यांतील कॉंग्रेसच्या अंतर्गत संघर्षावरून दिसत आहे. 

Web Title: Pune Edition Editorial Article on Rajsthan election Rahul