वारसा ; पण कशाचा ?

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 जुलै 2018

"पनामा पेपर्स'मधून जगातील अनेक बड्या राजकारणांचे "पोल-खोल' झाल्यानंतर, पाकिस्तानात सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार स्थापन झालेल्या खास न्यायालयाने लंडन येथे नवाझ कुटुंबीयांनी खरेदी केलेल्या चार अलिशान फ्लॅट्‌स प्रकरणात भ्रष्टाचार झाल्याचा ठपका ठेवून, त्यांना सात वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली.

अवघ्या सहाच महिन्यांपूर्वी मरियम नवाझ शरीफ यांचा समावेश "न्यूयॉर्क टाइम्स' या ख्यातकीर्त वृत्तपत्राने जगातील 11 शक्‍तिशाली महिलांमध्ये केला होता आणि लगोलग त्यांची तुलना ही बेनझीर भुत्तो यांच्याशी केली जाऊ लागली होती. प्रभावशाली राजकीय नेत्यांच्या कन्यांनी राजकारण गाजवल्याची अनेक उदाहरणे आहेत. इंदिरा गांधी हे त्यांच्यातील सर्वात मोठे नाव. मात्र, याच मरियम यांच्यावर आता भ्रष्टाचाराच्या आरोपापायी आपल्या पित्यासह गजाआड जाण्याची पाळी आली आहे. 

"पनामा पेपर्स'मधून जगातील अनेक बड्या राजकारणांचे "पोल-खोल' झाल्यानंतर, पाकिस्तानात सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार स्थापन झालेल्या खास न्यायालयाने लंडन येथे नवाझ कुटुंबीयांनी खरेदी केलेल्या चार अलिशान फ्लॅट्‌स प्रकरणात भ्रष्टाचार झाल्याचा ठपका ठेवून, त्यांना सात वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. तरी त्यामुळे सध्या लंडनमध्ये असलेल्या मरियम यांचे मनोधैर्य खचलेले नाही. मात्र, नवाझ शरीफ आणि त्यांच्या राजकीय वारस समजल्या जाणाऱ्या मरियम यांना झालेल्या या शिक्षेमुळे पाकिस्तानात याच महिन्यात होऊ घातलेल्या सार्वत्रिक निवडणुका मात्र एका वेगळ्याच वळणावर जाऊन उभ्या ठाकल्या आहेत. मरियम 45 वर्षांच्या आहेत. नवाझ कुटुंबीयांच्या विश्‍वस्त निधींच्या ट्रस्टी म्हणून त्या समाजकार्यात गुंतलेल्या होत्या. 

2012च्या निवडणुकांच्या वेळी त्यांनी राजकारणात उडी घेतली आणि नवाझ शरीफ यांचे प्रचारप्रमुख म्हणून त्यांनी काम केले. शरीफ विजयी झाले आणि त्यांनी मरियम यांची नियुक्‍ती युवकांसाठी राबवल्या जाणाऱ्या कार्यक्रमाच्या प्रमुख म्हणून केली. तेव्हापासून त्या विरोधकांच्या निशाण्यावर होत्या. मरियम यांची इच्छा खरे तर डॉक्‍टर होण्याची होती आणि त्यांनी "किंग एडवर्ड मेडिकल कॉलेज' या प्रख्यात महाविद्यालयात प्रवेशही घेतला होता; पण ते शिक्षण त्यांनी अर्धवटच सोडले. तेव्हाच त्यांचा या महाविद्यालयातील प्रवेश बेकायदा असल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. अवघ्या 19 वर्षांच्या असतानाच त्यांचा विवाह महंमद सफदर अवान याच्याशी झाला होता आणि त्यांना तीन अपत्येही आहेत. 

वैद्यकीय शिक्षण भले त्यांनी अर्धवट सोडले असो; पुढे त्यांनी पीएचडी संपादन केली आणि शरीफ यांच्या राजकीय वारस म्हणून त्यांचे नाव घेतले जात आहे. पूर्वी चार वेळा पुढे ढकलण्यात आलेल्या या भ्रष्टाचाराच्या खटल्याचा निकाल ऐन निवडणुकांच्या तोंडावरच जाहीर झाल्यामुळे त्यामागे काही राजकीय खेळी असल्याचा आरोप नवाझ कुटुंबीयांनी केला आहे.

Web Title: Pune Edition Editorial Article on Sharif Corruption Case