सांघिक वृत्तीचे माहात्म्य जाणा

उदय साने
शनिवार, 4 ऑगस्ट 2018

गेल्या काही स्पर्धेपासून फरक इतकाच दिसून येतोय, की चीनपेक्षा जपानी खेळाडू भारतीयांसमोर आव्हानवीर ठरत आहेत. पण, एखाद दुसरा विजय इकडे तिकडे. भारतीय बॅडमिंटनपटू पदक मिळविणार याची खात्री आहे. यापूर्वी झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताची कामगिरी चांगली झाली.

रिओ ऑलिंपिक स्पर्धेनंतर आता भारतीय खेळाडूंचा आशियाई स्पर्धेत कस लागणार आहे. ऑलिंपिकमधील हाताच्या बोटावर मोजता येणारी पदके आशियाई स्पर्धेत वाढलेली असतात यात शंकाच नाही. येथे फरक असतो तो स्पर्धेचा. आशियातील देशच या स्पर्धेत सहभागी असतात. त्यामुळे आपली पदकसंख्या वाढते असे म्हणायला वाव आहे. क्रीडा महासत्ता बनण्याकडे वाटचाल करणाऱ्या चीनने ऑलिंपिकमध्ये क्रीडा महासत्तांना देशांना आव्हान दिले आहे. त्यामुळे घरच्याच; म्हणजेच आशियाई स्पर्धेत त्यांनी वर्चस्व राखल्यास आश्‍चर्य वाटायला नको. लोकसंख्येच्या आकारात मोठे असणाऱ्या चीनने मैदानातही आपण मोठे असल्याचे दाखवून दिले आहे. मात्र, भारत येथेच कमी पडला. लोकसंख्येच्या आकारात आपण चीनच्या पाठोपाठ आहोत हे खरे असले, तरी मैदानावरील कामगिरी बघतो तेव्हा आपण कितीतरी वर्षे त्यांच्या मागे असल्याचे दिसून येते. आपण प्रत्येक आशियाई क्रीडा स्पर्धेत मोठाला संघ पाठवून आम्ही इतके खेळाडू पाठवले अशी चर्चा करतो. हा आकडा प्रत्येक वेळेस फुगलेलाच असतो. त्याच्या तुलनेत पदके मात्र मिळत नाहीत. या वेळीदेखील काही चित्र काही वेगळे नाही. पाचशेहून अधिक खेळाडूंचे पथक आपण पाठवणार आहोत. इतके मोठे पथक पाठवूनही आपल्याला पदके किती मिळणार हे कुणी छातीठोकपणे सांगू शकत नाही. 

पहिल्या आशियाई स्पर्धेत आपण एकूण 51 पदके मिळवली होती, तेव्हा आपले स्थान दुसरे होते. त्यानंतर सर्वाधिक पदकांचा आकडा गाठायला आपल्याला 2010ची वाट पाहावी लागली. ग्वांगझू स्पर्धेत आपण आजपर्यंतची सर्वाधिक 65 पदके मिळवली होती. तरी आपला नंबर सहावा होता. या आकडेवारीवरूनच आशियाई स्पर्धेतील आव्हान स्पष्ट होते. आशियाई स्पर्धेत कामगिरी उंचावायची असेल, तर आपल्याला एकत्रित प्रयत्नांची गरज आहे याची जाणीव करून देणारी ही स्पर्धा असते. कारण या स्पर्धेनंतर दोन वर्षांनी ऑलिंपिक स्पर्धा येत असते. ऑलिंपिककडे पाहण्याची दृष्टी आपण या स्पर्धेतूनच मिळविली, तर आपल्याला ऑलिंपिक यश दूर नाही; पण, त्यासाठी आधी आशियाई स्पर्धेत कामगिरी सुधारण्याची गरज आहे. आतापर्यंत भारताला आशियाई स्पर्धेत ऍथलेटिक्‍स, कुस्ती, बॉक्‍सिंग, नेमबाजी आणि रोइंग या खेळांनी पदके मिळवून दिली आहेत. बॅडमिंटनमध्ये साईना नेहवाल गवसल्यानंतर बॅडमिंटन हा प्रकार आता भारतासाठी हमखास पदकाचा ठरत आहे. साईना नेहवाल, पी. व्ही. सिंधू, एच. एस. प्रणॉय, किदांबी श्रीकांत असे एकापेक्षा एक सरस बॅडमिंटनपटू अलिकडच्या काळात बॅडमिंटन विश्‍वात भारताचे नाव गाजवत आहेत. या वेळी देखील बॅडमिंटनमध्ये भारताला पदकाची खात्री आहे. 

गेल्या काही स्पर्धेपासून फरक इतकाच दिसून येतोय, की चीनपेक्षा जपानी खेळाडू भारतीयांसमोर आव्हानवीर ठरत आहेत. पण, एखाद दुसरा विजय इकडे तिकडे. भारतीय बॅडमिंटनपटू पदक मिळविणार याची खात्री आहे. यापूर्वी झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताची कामगिरी चांगली झाली. अर्थात, आंतरराष्ट्रीय स्पर्धेचा "तो' दर्जा नसलेल्या या राष्ट्रकुल स्पर्धेतील यशाला किती महत्त्व द्यायचे हा प्रश्‍नच आहे. राष्ट्रकुल स्पर्धेत टेबल टेनिसपटूंनी इतिहास घडवला होता. मात्र, त्याची पुनरावृत्ती भारतीय आशियाई स्पर्धेत करणार का? हा प्रश्‍न नक्कीच सर्वांना पडला असेल. आशियाई स्पर्धेत प्रतिस्पर्धी अधिक तगडा सराव करून येणार असल्यामुळे भारताला देखील पूर्ण तयारीने उतरावे लागेल. 

मुळात भारतात क्रीडासंस्कृतीचा अभाव आहे. ऑलिंपिक स्पर्धा आल्या की ही चर्चा होते आणि मग आशियाई स्पर्धा आल्यावर या चर्चेला उधाण येते. पण, पूर्णविराम कधीच मिळत नाही. जपान, कोरिया, चीन हे देश जेव्हा आशियाई स्पर्धेत वर्चस्व राखतात तेव्हा त्यांच्या तयारीकडे नुसते डोकावले तरी त्यांचे नियोजन आणि झोकून देण्याची वृत्ती दिसून येते. एक आशियाई स्पर्धा संपली की लगेच पुढील आशियाई स्पर्धेची तयारी त्यांच्याकडे सुरू होते. आपल्याकडे नेमके उलटे आहे. इतकी वर्षे झाली तरी आपण स्पर्धा आली की मगच तयारीला लागतो. मग पात्रता फेरीचे निकष, सराव या सगळ्याला सुरवात होते. यातूनही आपण बाहेर पडतो. पात्रता सिद्ध करतो. संघ निश्‍चित होतात. इथेच हे थांबत नाही, तर आम्हालाही स्थान मिळायला हवे यासाठी कधी खेळाडू, कधी संघटना न्यायालयाची पायरी चढतात. या वेळची स्पर्धाही त्याला अपवाद ठरलेली नाही. आशियाई स्पर्धेसाठी संघ रवाना होण्याची वेळ आली तरी न्यायालयीन लढाया सुरू आहेतच. हे सर्व कशासाठी हेच कळत नाही. आशियाई स्पर्धेतून आपल्याला ठसा उमटवायचा असेल, तर आपल्याला हेवेदावे विसरून चार वर्षे एकत्रित प्रयत्नांची गरज आहे. 

- उदय साने, आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन पंच 

Web Title: Pune Edition Editorial Article on Sports Unity