झाडे लावा ! (एक हिरवट पत्रव्यवहार...) 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 2 जुलै 2018

जय महाराष्ट्र ! माहीमच्या नेचरपार्कात लावलेली झाडे आम्ही केव्हाच विसरलो आहोत. पुन्हा ती आठवण नको ! दोन वर्षांपूर्वीच्या त्या कार्यक्रमात आम्ही लावलेले सोनचाफ्याचे झाड जगले, की मेले, ह्याचा विचार करायची उसंत आम्हांस नव्हती आणि नाही ! तुम्हीही हे रिकामे उद्योग सोडा !! आम्ही लावलेले झाड जगले, ह्याचे दु:ख करायचे की आनंद व्यक्‍त करायचा हेच आम्हाला कळत नाही.

प्रिय मा. नानासाहेब फडणवीस यांसी, शतप्रतिशत प्रणाम. महाराष्ट्राचा वनमंत्री ह्या नात्याने हे पत्र इको फ्रेंडली कागदावर लिहून पाठवत आहे. कळविण्यास अत्यंत आनंद होतो, की दोन वर्षांपूर्वी बरोब्बर ह्याच तारखेला माहीमच्या नेचर पार्कमध्ये आपण ताम्हणीचे झाड लावले होते व मी माझ्या हस्ते (खड्‌डा खणून) कडुनिंबाचे रोपटे लावियले होते. ती झाडे दोन वर्षांत पुरुषभर उंचीची झाली आहेत.

सोबत फोटो पाठवतोच आहे, पण आपण प्रत्यक्ष बघूनही यावे. यंदा तेरा कोटी झाडे लावण्याचा वन खात्याचा संकल्प असून, त्याचा शुभारंभ कल्याण येथे आपल्या हस्ते करावयाचे म्हणतो आहे. याल ना? कळावे. आपला. सुधीर्जी मुनगंटीवार वनमंत्री. 
* * * 
प्रिय वनमंत्री- 
तेरा कोटी झाडे मी लावू? मेलो !! -नानासाहेब. 
* * * 
प्रिय मित्रवर्य मा. उधोजीसाहेब यांसी शतप्रतिशत प्रणाम. फारा दिवसांत गांठभेट नाही. तुमची सारखी आठवण येत्ये. पर्यावरणाविषयी तुम्हाला आत्मीयता आहे. इंफ्रारेड क्‍यामेऱ्याने झाडांचे फोटो काढण्यात तुम्ही जाम एक्‍सपर्ट आहात. (तुमचे झाडाच्या खोडांच्या फोटोंचे प्रदर्शन मी बघितले होते...) बरोब्बर दोन वर्षांपूर्वी ह्याच दिवशी आपण दोघांनी मिळून किती सुंदर सुंदर झाडे लावली होती, आठवते आहे का? ती झाडे आता फोटो काढण्याइतपत मोठी झाली असून, आपण क्‍यामेरा घेऊन यावे, अशी विनंती आहे. 

माहिमच्या नेचरपार्कमध्ये झालेल्या त्या हिरव्यागार सोहळ्यात मी ताम्हणीचे रोपटे रोवले होते, तर तुम्ही सोनचाफा. तो सोनचाफा तेव्हा अगदीच एवढासा होता. आता चांगला ताडमाड झाला आहे. केंद्रीय मंत्री प्रकाशजी जावडेकर ह्यांनी वड लावला होता, आठवते आहे का? तेव्हा "तुमचे नाव आता प्रकाशजी जा वडेकर असे ठेवायला लागेल', असा अफलातून विनोद तुम्ही केला होता. जोक बंडल होता, तरीही आम्ही खूप मोठ्यांदा हंसलो होतो. 

आठवते आहे का ते सारे? न केलेल्या जोकवर एकमेकांना हसून प्रतिसाद देण्याचे ते सुंदर दिवस आठवा ! आता आपण चांगला जोक केला तरी हसत नाही की बोलत नाही... जाऊ दे. गेले ते दिवस, राहिल्या त्या आठवणी. 

नेचर पार्कातली ती जोमाने वाढलेली झाडे परवा बघितली आणि ऊर भरून आला. म्हणून हे पत्र पाठवतो आहे. "ट्विटर'वर मी फोटो टाकला आहे. कृपया बघून घ्यावा. पत्राबरोबर तुमच्या त्या सोनचाफ्याची काही पाने पाठवतो आहे. (फुले अजून धरली नाहीत ! धरली की धाडतो !!) स्वीकार व्हावा. कळावे. आपला मित्र. नाना फडणवीस. 
ता. क. : दिवसभर "चाफा बोलेना, चाफा चालेना' हे गाणे गुणगुणतो आहे. आपल्याला उचक्‍या तर लागल्या नाहीत ना? कळावे. नाना. 
* * * 
नानासाहेब- 

जय महाराष्ट्र ! माहीमच्या नेचरपार्कात लावलेली झाडे आम्ही केव्हाच विसरलो आहोत. पुन्हा ती आठवण नको ! दोन वर्षांपूर्वीच्या त्या कार्यक्रमात आम्ही लावलेले सोनचाफ्याचे झाड जगले, की मेले, ह्याचा विचार करायची उसंत आम्हांस नव्हती आणि नाही ! तुम्हीही हे रिकामे उद्योग सोडा !! आम्ही लावलेले झाड जगले, ह्याचे दु:ख करायचे की आनंद व्यक्‍त करायचा हेच आम्हाला कळत नाही. सोनचाफ्याचा सुगंध घेणेही आम्हाला नकोसे झाले असून, परवा दादरच्या फुलबाजारातून गाडी काढत असताना आम्ही नाक दाबून घेतले होते. असो. 

पर्यावरणाचा इतकाच सोस असेल तर आधी नाणार प्रकल्प उपटून फेकून द्या !! प्लास्टिकबंदीची आमच्या चिरंजीवांची मोहीम यशस्वी करण्यासाठी पुढाकार घ्या... मग हे झाडे लावण्याचे उद्योग करा !! कळावे. उधोजी. 
ता. क. : सोनचाफ्याच्या पानांबरोबर लाल मुंग्या मिळाल्या ! तुम्हाला आता बघतोच !! उ. ठा.

Web Title: Pune Edition Editorial Article on Tree Plant in Dhing Tang