विरुपतेचा भाष्यकार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 13 ऑगस्ट 2018

जागतिक कीर्तीचा हा लेखक मुंबईच्या दिव्यांच्या वस्तीत भणंगासारखा हिंडताना पाहून एरवी मुंबई नगरीच्या चेहऱ्यावरची माशीसुध्दा उडाली नसती. पण इथल्या दारिद्य्राच्या कहाण्या परदेशात विकून नायपॉल भारताचीच बदनामी करत आहेत, अशी ओरड होणे अपरिहार्य होते.

जीवनात इतक्‍या भद्र-अभद्र गोष्टींचा अंतर्भाव असताना, "कुण्या एका'ला त्यातील ओंगळाचेच कुतुहल अधिक का असावे? हा जगभरातील साहित्य समीक्षकांना पडलेला एक जुना प्रश्‍न आहे. ह्या जगतातले "जे जे नीचतम, अध:पतित अन अमंगलिक ते ते' धिटाईने दुनियेसमोर मांडणाऱ्या कलावंतांपैकी एक अग्रणी "कुणी एक' म्हणजे विद्याधर सूरजप्रसाद नायपॉल ऊर्फ व्ही. एस. नायपॉल हे होत. त्यांचे निकटवर्तीय आणि नंतर चाहते वाचक त्यांना विडिया ह्या लाडनावाने संबोधत. व्ही. एस. नायपॉल नावाचे सदैव काळ्या-करड्या रंगात न्हालेले एक जागतिक मिथक आता संपले आहे.

लंडनमधल्या निवासस्थानी शनिवारी नायपॉल ह्यांनी वयाच्या 85व्या वर्षी अखेरचा श्‍वास घेतला. मूळच्या भारतीय वंशाच्या, परंतु, त्रिनिदादमध्ये वाढलेल्या ह्या प्रतिभावंताने आपली अवघी कारकीर्द अमंगळाचे सडे न्याहाळत घालवली असे कुणी म्हणेल. परंतु, नायपॉल ह्यांना केवळ हे एक बिरुद चिकटवणे गैर ठरावे. 

माणूस सडेतोड, कदाचित नको तितका परखड होता. जागतिक साहित्याच्या साठोत्तरी कालखंडात नवा प्रवाह दणक्‍यात वाहू लागला. त्या प्रवाहाच्या पहिल्या लोंढ्यामध्ये जे प्रतिभावंत हाताने पाणी कापीत पुढे आले, त्यापैकी नायपॉल हे नाव आघाडीचे मानावे लागेल. रोजम÷र्याच्या जगण्याच्या केविलवाण्या धडपडीत भुक्‍कड ठरत जाणारी तथाकथित भद्र समाजाची मूल्ये, जीवनात ठावोठाव भरलेला दांभिकपणा, दारिद्य्र, कुचंबणा...ह्या साऱ्या विरुपाचे पृथ:करण त्यांची प्रतिभा कमालीच्या निर्दयपणाने करत राहिली. एका अर्थाने ते मानवी जीवनाचे "विरुपणकार'च म्हणायचे. ह्या बदलांना मराठी सारस्वताचे अंगणही अपवाद नव्हते. पोलो कॉलरचा सदरा परिधान करुन बॅडमिंटन खेळणारा नायक, आणि उंबरठ्याला टेकून भावविभोर होणारी नायिका ह्यांच्या कथा-कहाण्यांचा उबग आल्याने म्हणा, किंवा अस्सल जीवनातले निके सत्त्व मांडण्याचे धाडस नवलेखकांनी एकवटल्याने म्हणा, साहित्य बदलले. जाणीवांचे पोत बदलले.

वस्त्र जरतारीच हवे, हा आग्रह दुबळा ठरु लागला. मराठीत हे घडत होते, त्याच वेळेस नायपॉल ह्यांची लेखणी जागतिक पातळीवर हेच चेपलेपण ठणकावून मांडत होते. 1957च्या सुमारास त्यांची "मिस्टिक मास्यूर' ही कादंबरी हळूचकन साहित्य-क्षितीजावर डोकावली. पुढे 1961 साली त्यांनी लिहिलेल्या "ए हाऊस फॉर मि. बिस्वास' ह्या कादंबरीने तर झोपा उडवल्या. ह्या कहाणीतील नायक म्हणजे मि. मोहन बिस्वास ही व्यक्‍तिरेखा म्हणजे त्यांचे वडील सूरजप्रसाद ह्यांच्याच व्यक्‍तिमत्त्वाच्या छटा ल्यालेली होती. 

भद्रजनांच्या भोजनाच्या मेजावरील काटेचमचे, शिष्टाचार ह्यांची वासलात लावत भस्सकन हात घालत, बोटे चाटत ध्वनियुक्‍त खादाडपणा करणाऱ्या अशिष्टाचे जसे स्वागत व्हावे, तसेच नायपॉल ह्यांचेही झाले. 1971 साली त्यांच्या "इन अ फ्री स्टेट" ह्या कादंबरीस बुकर पुरस्कार मिळाला, पण त्यानंतर नायपॉल ह्यांनी लौकरच कादंबरीचा घाट सोडत नायपॉल देशोदेशी हिंडून प्रवासवर्णनपर सामाजिक लिखाणाला प्रारंभ केला. इंडोनेशिया, मलेशिया, अरब राष्ट्रे, पाकिस्तान, बांगलादेश आदी देशांमध्ये हिंडून त्यांनी तेथील जनजीवनातले "विरुप' पकडले. इंग्रजी साहित्यातील नवा जोसेफ कॉनरॅड असे नायपॉल ह्यांचे वर्णन होऊ लागले. कॉनरॅड हे गेल्या शतकात होऊन गेलेले पोलिश वंशाचे इंग्रजी लेखक होते.

इंग्रजी धड येत नसतानाही त्यांनी स्वत:ची एक नॉन-इंग्लिश शैली तयार केली होती. नायपॉल ह्यांचे काहीसे तसेच होते. ह्याच काळात नायपॉल ह्यांनी भारताला भेट दिली. त्यानंतर त्यांनी लिहिलेल्या "ऍन इरा ऑफ डार्कनेस' ह्या पुस्तकावर उलटसुलट टीका झाली. भारतीय संस्कृतीला त्यांनी "एक जखमी संस्कृती' असे म्हटले होते. पुढे त्यांनी त्याच शीर्षकाचे आणखी लेखन प्रसिध्द केले. 

जागतिक कीर्तीचा हा लेखक मुंबईच्या दिव्यांच्या वस्तीत भणंगासारखा हिंडताना पाहून एरवी मुंबई नगरीच्या चेहऱ्यावरची माशीसुध्दा उडाली नसती. पण इथल्या दारिद्य्राच्या कहाण्या परदेशात विकून नायपॉल भारताचीच बदनामी करत आहेत, अशी ओरड होणे अपरिहार्य होते. अर्थात नायपॉल आणि त्यांच्या चाहत्यांनी ही "उजवी' ओरड "डाव्या' कानांनी सोडून दिली हा भाग वेगळा. ह्याच नायपॉल ह्यांनी बाबरी मशिदीचा ढाचा बेभान कारसेवकांनी जमीनदोस्त केला, तेव्हा "आत्मा हरवलेल्या भारताने केलेले ऐतिहासिक भाष्य' असे ह्या घटनेचे वर्णन करुन सर्वांनाच बुचकळ्यात टाकले.

2001 साली नायपॉल ह्यांना साहित्याचे नोबेल पारितोषिक मिळाले. तेव्हा आपल्या छोटेखानी भाषणात ते म्हणाले होते की, "लिखाणापलिकडे माझे अस्तित्त्व नगण्य असल्याने माझ्यापाशी आणखी सांगण्यासारखे काहीही नव्हते आणि नाही.' ते लिखाण आता थांबले आहे.

Web Title: Pune Edition Editorial Article on Virupatecha Bhashykar