रवांडातील रवंथ !  (एक रिपोर्ताज...) 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 जुलै 2018

रवांडा हा बऱ्याच तळ्यांचा आणि डोंगरांचा प्रदेश आहे. बघावे तेथे तळीच तळी ! तेथे पॉल कागामे नावाचे एक प्रधानसेवक आहेत. त्यांची तळी उचलण्यासाठी तेथे जाणे भाग होते. बाकी रवांडातील नागरिक कमालीचे प्रेमळ आहेत. प्रथमदर्शनी ते कळत नाही.

विषुववृत्ताच्या थोडेसे दक्षिणेला मध्यपूर्व आफ्रिकेचा दौरा आम्ही काढला तोच मुळी विस्मयाने. युगांडा, टांझानिया, बुरुंडी आणि कांगोच्यामध्ये एक रवांडा नावाचा देशदेखील आहे, हे आम्हाला माहीतच नव्हते. रवांडा? ते "खांडा' असे असावे, असे आम्हाला वाटत होते. पण र-वां-डा असेच निघाले. मनाला वैषम्य वाटले. तब्बल अठराशे कोटी रुपये खर्चून आम्ही जगभर हिंडलो, पण रवांडात जाता येऊ नये? छे, छे, तेथे गेलेच पाहिजे ! अखेर गेलो... 

रवांडा हा बऱ्याच तळ्यांचा आणि डोंगरांचा प्रदेश आहे. बघावे तेथे तळीच तळी ! तेथे पॉल कागामे नावाचे एक प्रधानसेवक आहेत. त्यांची तळी उचलण्यासाठी तेथे जाणे भाग होते. बाकी रवांडातील नागरिक कमालीचे प्रेमळ आहेत. प्रथमदर्शनी ते कळत नाही. पहिल्यांदा ते आमच्याकडे बघून प्रेमळपणाने हसले, तेव्हा आमची दातखीळ बसली ! परत फिरून विमान गाठावे, असे वाटले होते. पण प्रधानसेवक कागामे ह्यांनी धीर दिला. सर्वसाधारणपणे ज्या देशात जातो त्या देशातील पोशाख चढविण्याचा आमचा परिपाठ असतो. इंडोनेशियात तर मी रंगीबेरंगी फुलशर्ट घालून भाषण केले होते. अशा पोशाखात मी फार रुबाबदार दिसतो, असे मला कितीतरी लोकांनी सांगितले आहे. पण रवांडात पहिलाच मनुष्य भेटला, तो उघडाबंब होता ! मग आम्ही बेत सोडला. म्हटले आहे ते जाकीट काय वाईट आहे? 

रवांडातील जनतेसाठी काय न्यावे, असा प्रश्‍न पडला होता. एरवी मी विवेकानंदांची पुस्तके, गांधीजींचे चरित्र असे काय काय नेत असतो. ब्यागेत भरायला सोपे पडते आणि स्वस्तही !! रवांडातील जनता तितकीशी साक्षर नसावी, असे कुणीतरी म्हणाले. विमानतळावरून मोटारीने रवेरू नावाच्या एका गावात आलो. आम्हाला बघायला गर्दी जमली होतीच. 

"टूटसी ग्रेट हो!'' एकजण ओरडला. दुसरा त्याच्या अंगावर "हुटु' असे ओरडला. बराच आरडाओरडा झाला. त्यावर प्रधानसेवक कागामे ह्यांनी ""टूटसी ही एक रवांडातील जमात असून दुसऱ्या जमातीचे नाव "हुटु' आहे, गैरसमज करून घेऊ नका...'' असे सांगितले. 

भाषणाला मी उभा राहिलो आणि साऱ्यांची मने जिंकली ! ""मित्रोंऽऽ...आजे रवांडा मां दीपवाळीना दिवस आवी गया छे. वसुबारसने दिवस अमारे गुजराथमां...'' मी बोलता बोलता उपस्थितांना मंत्रमुग्ध करण्यात वाकबगार आहे, हे स्वत:च्या तोंडाने काय सांगायचे? रवांडातील जनतेला किन्यारावांडा ह्या भाषेपलीकडे दुसरी भाषा समजत नाही. मग त्यांच्याशी गुजराथीत बोललेले काय वाईट? असा सुज्ञ विचार मी केला. कागामेभाई, मी रवांडासाठी एक छोटीशी भेट आणली आहे...'' मी नम्रपणे वाकून शेजारी बसलेल्या कागामे ह्यांना म्हणालो. 
""उघडा की !'' असे ते म्हणाले. ""उघड्यावरच आहे... मी तुमच्यासाठी दोनशे गाई आणल्या आहेत !'' आम्ही. 
""क्‍काय? गाई?'' 
""गाईच !'' 

...एका रवांडातील कुटुंबाला एक गाय द्यायची. ती दूध देईल. वर शेणही देईल ! एक कुटुंब पोसेल. घरातील कुपोषित बालकाला दूध मिळेल. जेणेकरून रवांडातील पुढील पिढी सशक्‍त आणि पुष्ट होईल. इतकेच नव्हे तर त्या गाईस होणारी कालवड शेजारणीला द्यावी...अशी ही योजना आहे. आपल्यामुळे दोनशे कुटुंबांचे पालनपोषण होणार, ह्या कल्पनेने मी सुखावलो. त्यांनाच उलट "धन्यवाद' म्हटले आणि निघालो. ""जाताना आमचीही गिफ्ट घेऊन जा, मालक !'' प्रधानसेवक कागामे म्हणाले. मी विचारले, "नक्‍कीच...आणा !'' त्यांनी गिफ्ट आणली. ती बघून भोवळच आली... 

...रवांडात पर्वतीय गोरिल्लांचे येवढे कळप आहेत, हे आधी कळले असते तर? सबब, दोनशे गोरिल्ला घेऊन मायदेशी निघालो आहे. इति. 

- ब्रिटिश नंदी 

Web Title: Pune Edition Editorial Dhing Tang