राणीच्या बागेत पाहुणा ! (ढिंग टांग !)

राणीच्या बागेत पाहुणा ! (ढिंग टांग !)

बने, बने, ये! काय म्हणालीस? जिवाची मुंबई करायला आली आहेस? बने, अशी कशी गं तू वेडी? हल्ली कुणी जिवाची मुंबई करायला येते का? जीव मुठीत धरून जगण्याचे हे शहर आहे...पण असू दे. आलीच आहेस तर चार दिवस राहा हो! चार दिवस राहा, डायटिंग कर आणि बारीक होऊन परत जा. पण चार दिवसांनी जा हं...परप्रांतीयांसारखा इथेच मुक्‍काम टाकू नकोस. 
बने, आपण किनई आता मुंबईचा फेरफटका मारायला जाऊ.... 

बने, बने, लौकर फूटपाथ बदल! समोरून एक गृहस्थ "कुणी घर देता का घर?' असे कुसुमाग्रजांच्या "नटसम्राट'मधील सुप्रसिद्ध स्वगत म्हणत येत आहे...ते कुणी नटबिट नाहीत, मुंबईचे महापौर आहेत, महापौर! चल, चल लौकर इथून... 
बने, हाच तो महापौर निवास बरं! ब्रिटिशकालीन जुनी इमारत आहे ही...अवघ्या मुंबईला अभिमान आहे ह्या वास्तूचा. समोरून झुळझुळ वाहणारा वीर सावरकर मार्ग, मागल्या बाजूला गर्जणारा अरबी समुद्र...अहाहा!! पण इथे फार रेंगाळू नकोस. पंचाईत होईल...बघ, ते गृहस्थ पुन्हा आलेच. कुणी घर देता का घर?'वाले!! "मी इथेच राहणार,' असे ते आत्ता आत्तापर्यंत हट्टाने म्हणत होते. पण परवाच त्यांना कुणीतरी चुटकी वाजवून, डोळे वटारून "निघा' असे सांगितलेले दिसते...जाऊ दे. 

बने, आता आपण भायखळ्याला आलो. ही पाहा आमची राणीची बाग. त्याला जिजामाता उद्यान असेही म्हणतात. पण अस्सल मुंबईकरांसाठी ती अजूनही राणीची बागच. गंमत म्हणजे इथे प्राणिसंग्रहालय असले तरी त्यात प्राणी नाहीत. रिकामेच पिंजरे आहेत. त्यात परदेशी प्राणी आणून सोडण्याचा प्लॅन आहे. डायनॉसॉरची अंडी आणून, ती उबवून डायनॉसॉरची पोल्ट्री करण्याचाही प्लॅन आहे. काही वर्षे थांब, इथे तुला ज्युरासिक पार्क झालेले दिसेल!! 

बने, अगं, तो काही कोल्हा नाही काही? तो साधा कुत्रा तर आहे. त्याला काय घाबरायचे? चाळीच्या जिन्याखाली भारी उकडते म्हणून दुपारचा सावलीसाठी तो इथे आला असावा!! हा पाहा हरणांचा विभाग...कित्ती हरणे आहेत ना? एवढी हरणे एका ठेपी तुला रेहकुरीच्या अभयारण्यातही बघायला मिळणार नाहीत. काय? तो काळवीट आहे म्हणालीस? वेडी की काय तू!! तो काळवीट नाही, मघाशी ते रस्त्यात दिसलेले गृहस्थच आहेत... 

हे राखाडी झुडुप कसले आहे हे विचारू नकोस. तो मोर आहे, मोर! बने, असे नाक मुरडू नकोस. पाठीमागून मोर असाच दिसतो. कळलं? 

चल, आपण आता ह्या पेंग्विन कक्षात जाऊ. हा कक्ष फार्फार सुंदर आहे. तुला खूप आवडेल. मुंबईचा राजा आहे ना, त्याच्या राजपुत्राने हट्ट धरलान! म्हणून थेट कोरियातून हे पेंग्विन पक्षी आणण्यात आले. गंमत म्हणजे हे पक्षी असूनही त्यांना उडता येत नाही. कोट घातलेल्या माणसासारखे ते दिसतात. कित्ती छान...नै? चल, आत जाऊ. 

बाप रे, बने, किती कुडकुडते आहेस? मुंबईत का कुणी इतके कुडकुडते? इथे डिसेंबरातल्या थंडीत ऑनवरच्या फॅनचा स्पीड फक्‍त एका आट्याने कमी करावा लागतो. ह्या पेंग्विन कक्षातल्या बर्फील्या वातावरणामुळे तुला हुडहुडी भरली का? हे बघ, ते ऐतिहासिक सात पेंग्विन पक्षी. छान आहेत की नाही? काय म्हणालीस? आठ आहेत? छे, मोज बरे पुन्हा... 
एक...दोन...तीन...चार...पाच...सहा...सात...आणि आठ! अरेच्चा!! अगं बने, इथून चल, तो आठवा पक्षी पेंग्विन नाही काही...ते मुंबईचे महापौर आहेत, महापौर!! आता ते इथेच राहणार असे दिसते. असतात एकेकाचे दिवस. हो की नाही? जाऊ दे. 

- ब्रिटिश नंदी 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com