परीक्षक अनुत्तीर्ण !

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 जुलै 2018

इश्रिताला राज्यशास्त्र हा एकमेव विषय वगळता बाकी सर्व विषयांमध्ये 95 टक्‍क्‍यांच्या आसपास गुण मिळाले होते. त्यामुळे तिने त्या एकाच विषयाचे पुनर्मूल्यांकन करून घेतले आणि तिच्या गुणांमध्ये चक्‍क 22 गुणांची भर पडली! शिवाय, या गुणवाढीमुळे आता ती नागपुरातून पहिली आल्याचेही स्पष्ट झाले आहे.

आपल्या देशातील परीक्षा पद्धती आणि त्यांचे मूल्यांकन नेमक्‍या कशा रीतीने होते, यांचे प्रत्यंतर केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळा (सीबीएसई) च्या विद्यार्थ्यांना यंदा आले. त्यांच्यासाठी हा धक्‍का सुखद असला, तरी त्यामुळे या प्रतिष्ठित मंडळाच्या कारभारावर प्रकाश पडला आहे. यंदा या परीक्षेचा निकाल लागल्यानंतर अनेक गुणवान विद्यार्थ्यांना अपेक्षेपेक्षा खूपच कमी गुण मिळाल्याचे स्पष्ट झाले आणि त्यांच्या आशा-आकांक्षावर विरजण पडले. मात्र, त्यामुळे हे विद्यार्थी निराश झाले नाहीत. त्यांनी या निकालाला आव्हान देण्याचे ठरवले आणि फेरतपासणीचे अर्ज मंडळाकडे दाखल केले. या अर्जांची संख्या दहा हजारांच्या घरात होती. अर्थात, अशी मागणी करण्यापूर्वी त्यांना उत्तरपत्रिकेतील प्रत्येक प्रश्‍नाला दिलेल्या गुणांची फेर-बेरीज करून घेण्याच्या जंजाळातून जावे लागणे आवश्‍यक होते. त्यालाही या विद्यार्थ्यांनी तयारी दर्शविली आणि तेव्हा अशा साध्या बेरजांमध्ये खूपच चुका असल्याचे आढळले! 

खरे तर यंदा या कामासाठी गणित, संगणक या विषयांच्या शिक्षकांची खास नेमणूक करण्यात आली होती. तरीही त्यात भरपूर चुका झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर 9,111 विद्यार्थ्यांनी पुनर्मूल्यांकनाची मागणी लावून धरली आणि त्यात निम्म्याहून अधिक म्हणजे 4,632 विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका तपासताना घोळ झाल्याचे आढळून आले आणि त्यांच्या गुणांमध्ये दणदणीत वाढ झाल्याचे आढळले. याचा अर्थ स्पष्ट आहे. फेरतपासणीसाठी अर्ज करणाऱ्या प्रत्येक दोन विद्यार्थ्यांपैकी एकाच्या मूल्यांकनात घोळ झाला होता. हे सारेच धक्‍कादायक आहे आणि त्यामुळे निकालांत मोठीच उलथापालथ झाली. नापासांचे पास तर झालेच; शिवाय गुणवत्ता यादीही उलटीपालटी झाली! नागपूरमधील इश्रिता गुप्ता ही या विद्यार्थ्यांपैकी बहुधा सर्वात भाग्यवान विद्यार्थिनी ठरली. 

इश्रिताला राज्यशास्त्र हा एकमेव विषय वगळता बाकी सर्व विषयांमध्ये 95 टक्‍क्‍यांच्या आसपास गुण मिळाले होते. त्यामुळे तिने त्या एकाच विषयाचे पुनर्मूल्यांकन करून घेतले आणि तिच्या गुणांमध्ये चक्‍क 22 गुणांची भर पडली! शिवाय, या गुणवाढीमुळे आता ती नागपुरातून पहिली आल्याचेही स्पष्ट झाले आहे. दिल्लीच्या एका विद्यार्थ्याच्या तीन अचूक उत्तरांना गुणच देण्यात आले नव्हते! अशी अनेक उदाहरणे आहेत. आपल्या बेजबाबदार वर्तनामुळे विद्यार्थ्यांच्या मनावर काय परिणाम होत असेल, याचीही फिकीर परीक्षकांना नसते, हीच बाब यामुळे अधोरेखित झाली आहे. त्यामुळे या शिक्षकांनाच आता "तुही यत्ता कंची?' असा प्रश्‍न विचारणे भाग आहे. 

Web Title: Pune Edition Editorial On Examination