कुशल अध्यापक

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 एप्रिल 2018

या विद्यापीठाचा खिळा नि कोपरा डॉ. पेडणेकर यांच्या परिचयाचा आहे. याच विद्यापीठाच्या आवारात त्यांची विद्यार्थिदशा पार पडली. येथेच त्यांनी रसायनशास्त्राच्या क्षेत्रातील विशेष संशोधन केले आणि अध्ययनदेखील.

तब्बल सहा महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर डॉ. सुहास पेडणेकर यांच्या रूपाने मुंबई विद्यापीठाला अखेर पूर्णवेळ आणि पात्र कुलगुरू मिळाला. विद्यापीठाची निर्नायकी अवस्था संपून विद्यार्थ्यांचे नष्टचर्य एकदाचे संपेल, अशी आशा बाळगायला हरकत नाही. कारण मुंबई विद्यापीठाची आजची अवस्था तर "भिंत खचली, कलथून खांब गेला' अशीच झाली आहे.

त्यात सकारात्मक बदल घडवून विद्यापीठाला पूर्ववैभव प्राप्त करून देण्याची जबाबदारी काळाने डॉ. पेडणेकर यांच्यावर टाकली आहे, असेच म्हणावे लागेल. एक मात्र खरे, की कित्येक वर्षांनी मुंबई विद्यापीठाला आपल्याच पठडी तयार झालेले एक प्राचार्य आता कुलगुरू म्हणून लाभले आहेत. 

या विद्यापीठाचा खिळा नि कोपरा डॉ. पेडणेकर यांच्या परिचयाचा आहे. याच विद्यापीठाच्या आवारात त्यांची विद्यार्थिदशा पार पडली. येथेच त्यांनी रसायनशास्त्राच्या क्षेत्रातील विशेष संशोधन केले आणि अध्ययनदेखील. ज्या विद्यापीठाच्या छत्रछायेत त्यांनी विद्यार्थिदशा अनुभवली, तेथेच उणीपुरी तीन दशके त्यांनी विद्यादानही केले. गेली तब्बल 43 वर्षे त्यांचे मुंबई विद्यापीठाशी अतूट नाते निर्माण झाले आहे.

स्टिव्हन्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलजीचे ते सन्माननीय "पोस्ट डॉक्‍टरल' फेलो ठरले होते. अनेक आंतरराष्ट्रीय विद्‌वतसभा व चर्चासत्रांमधून त्यांनी शोधनिबंध सादर केले असून, आंतरराष्ट्रीय शास्त्रीय नियतकालिकांमध्ये त्यांचे निबंध प्रसिद्ध झाले आहेत. दादरच्या "राम नारायण रुईया महाविद्यालया'चे प्राचार्यपद भूषविताना त्यांनी आपल्या संस्थेचा नावलौकिक वाढवला आणि स्वायत्ततेचा दर्जाही त्या संस्थेस मिळाला. कित्येक विद्यार्थ्यांच्या संशोधन प्रबंधांसाठी त्यांनी मार्गदर्शन केले आहे, आणि अजूनही करत आहेत. 

विद्यार्थ्यांचे आणि प्राध्यापकांचे हित आणि अहित या दोन्हींचे भान असलेल्या डॉ. पेडणेकरांच्या नियुक्‍तीमुळे विद्यापीठ पुन्हा नावारूपाला येईल, अशी आशा आहे, ती यामुळेच. मुंबई विद्यापीठाची जी काही गुणात्मक पडझड गेल्या काळात झाली, त्याचे एकप्रकारे डॉ. पेडणेकर हे साक्षीदारच मानावे लागतील. एकेकाळी बुद्धिमंतांचा वावर राहिलेले हे विद्यापीठ सध्या लौकिक गमावून बसले आहे.

परीक्षांचे निकालही वेळेवर लावण्याचा आत्मविश्‍वास या विद्यापीठाच्या प्रशासनात राहिला नसल्याने विद्यार्थी अन्य विद्यापीठांकडे वळू लागले आहेत. एकेकाळी सातासमुद्रापार गाजलेले हे विद्यापीठ आज मोठ्या अपेक्षेने डॉ. पेडणेकरांकडे पाहात आहे. डॉ. पेडणेकरांसाठी ही वेळ युद्धकाळापेक्षा वेगळी नाही.

Web Title: Pune Edition Editorial Expert Professor