फॉरेन रिटर्न्ड! (ढिंग टांग!)

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 18 जून 2018

मा. नानासाहेब, शतप्रतिशत प्रणाम, आपण परत येणार? ओह!! आत्ता कुठे मला कारभाराचा सूर गवसत होता, तेवढ्यात आपण परत येणार? हे म्हंजे एखाद्या खवय्याला मेजवानीचे आमंत्रण देऊन श्रीखंडाचा फोटो दाखवण्यासारखे झाले.

प्रिय सहकारी मा. श्री. चंदुदादा कोल्हापूरकरसाहेब यांसी, शतप्रतिशत प्रणाम. कळविण्यास आनंद होत आहे की मी आत्ताच अमेरिकेच्या वारीहून परतत आहे. कधी एकदा घरी येईन, असे झाले आहे. दहा दिवसांत होमसिक झालो! अमेरिकेहून विमानाने भारतात यायला खूप वेळ लागतो. हायपरलूप तंत्रज्ञानाने हे अंतर काही तासांत काटता येईल. ते तंत्रज्ञान अजून पुरते विकसित झालेले नाही असे म्हणतात. त्याच्या चाचण्या चालू आहेत.

सुरवातीला हायपरलूप तंत्रज्ञानाद्वारे माल पाठवण्याचा प्रयोग करण्यात येईल, असे मला सांगण्यात आले. मी म्हणालो, ""माल का? माणसे का नाहीत? आमच्या मुंबई-पुणे प्रवासाला भयंकर वेळ लागतो एक्‍सप्रेस वे असूनही खूप ट्रॅफिक असतो. हायपरलूपद्वारे माणसांनी मुंबई-पुणे वाऱ्या केल्या तर किती सोपे होईल.'' ते "बरं' म्हणाले आहेत. मुंबई ते कोल्हापूर हे अंतर अवघ्या पंचवीस मिनिटांत काटता येईल, असे हे तंत्रज्ञान आहे. हायपरलूप तंत्र हे तंत्रज्ञान मी महाराष्ट्रात, नव्हे देशात प्रथम आणीनच, असा माझा संकल्प आहे. 

...घरी यायला निघालो असलो तरी दिल्लीला जाऊन मगच मुंबईत परतेन. कारण दिल्लीत वरिष्ठांना कॅनडा-अमेरिका वारीचा वृत्तांत देणे आवश्‍यक आहे. (प्रवासभत्त्याची बिलेदेखील सबमिट करावयाची आहेत!) माझ्या अनुपस्थितीत राज्याची धुरा तुमच्याकडे देऊन गेलो होतो. (आठवते आहे ना?) मुंबईत आल्यावर कारभाराची सूत्रे माझ्याकडे सोपवावीत, ही विनंती. भेटीअंती बाकी बोलूच. कळावे. आपला. फडणवीसनाना. 
* * * 
मा. नानासाहेब, शतप्रतिशत प्रणाम, आपण परत येणार? ओह!! आत्ता कुठे मला कारभाराचा सूर गवसत होता, तेवढ्यात आपण परत येणार? हे म्हंजे एखाद्या खवय्याला मेजवानीचे आमंत्रण देऊन श्रीखंडाचा फोटो दाखवण्यासारखे झाले. राज्याच्या कारभाराची धुरा माझ्या हाती देऊन आपण गेलात. भरताने श्रीरामचंद्रांच्या पादुका सिंहासनावर ठेवून रामराज्य चालवले, तद्वत काहीतरी करण्याचा माझाही मानस होता. परंतु, आपण सगळ्याच चपला नि पादत्राणे घेऊन फॉरेनला गेलात, असे (शोधाअंती) कळले!! 

...आपण फॉरेनला गेलात, (म्हणून) त्या काळात राज्यात सर्व काही आलबेल होते. कारभार मी फार समर्थपणे सांभाळला हे तुम्हाला परत आल्यावर कळेलच. पण मी म्हंटो, घाई का करता? सावकाश या!! हवे तर ते हायपरलूप तंत्रज्ञान पूर्ण विकसित झाल्यावर घेऊनच या!! इथे काहीही अडलेले नाही!! पाऊसपाणीदेखील बरे असल्याने सगळे शेतकरी शेतशिवारात बिझी झाल्यामुळे आंदोलन नाही नि मोर्चेही नाहीत. त्यामुळे घाई करू नका, असा माझा स्नेहपूर्ण आग्रह आहे. 

दरम्यान, आणीबाणीच्या काळात तुरुंगात गेलेल्यांना दहा हजार दरमहा पेन्शन देण्याची घोषणा मी इथे करून टाकली. ही घोषणा केल्यानंतर आत्तापर्यंत मिळालेल्या प्रतिसादावरून असे लक्षात आले आहे, की महाराष्ट्रातले बहुतेक सगळेच इमर्जन्सीच्या काळात "आत' जाऊन आलेले आहेत!! ही घोषणा केल्यानंतर अर्थमंत्री सुधीर्जी मुनगंटीवारजी ह्यांनी मला भेटून डोळ्यांतून पाणी काढले. म्हणाले, ""मी तुमचे काय वाईट केले आहे?'' 

मी म्हटले, ""जस्ट डोंट वरी! क्‍यूं पैसा पैसा करते हो? आपले मुख्यमंत्री पैसे आणायलाच परदेशात गेले आहेत. त्यांच्या एका दौऱ्यात सारं कर्ज फेडलं जाईल!!'' 
ते कपाळाला हात लावून गेले! पण ते जाऊ दे. माझ्या सांगण्याचा अर्थ एवढाच की परतण्याची घाई करू नये. मी चांगला सेटल होतो आहे. सावकाश या! कळावे. आपला. दादासाहेब. 

ता. क. : प्रवासाची ब्याग न उघडता सरळ तस्सेच रशियाला जावे, अशी स्नेहपूर्ण सूचना आहे. तिथे विश्‍वचषक फुटबॉल स्पर्धा चालू आहे. हॅव फन! कळावे. दादा. 

-ब्रिटिश नंदी 
 

Web Title: Pune Edition Editorial Foreign Return in Dhing Tang