जिद्दीचा "म्होरक्‍या' (नाममुद्रा)

संतोष भिंगार्डे
सोमवार, 16 एप्रिल 2018

"म्होरक्‍या'ची कथा ऐकल्यानंतर त्यांनी आपल्या एका चित्रपटाचा प्रोजेक्‍ट बाजूला ठेवून "म्होरक्‍या' पहिल्यांदा बनवायचा, असे ठरविले. त्यांच्या "स्वस्तिक- प्रीती फिल्म प्रोडक्‍शन'द्वारे चित्रीकरण सुरू झाले. 

अमर देवकरने वयाच्या सहाव्या वर्षीच बालकलाकार म्हणून एकांकिकेमध्ये काम केले. वडिलांनी त्याच्यातील सुप्त कलागुण हेरून त्याला प्रोत्साहन दिले. पुढे अमरने पुणे विद्यापीठातून "डिपार्टमेंट ऑफ कम्युनिकेशन स्टडीज'मधून "मास्टर्स' केले. तेथे असतानाच त्याने काही शॉर्टफिल्म केल्या. लेखन, अभिनय आणि दिग्दर्शन अशा विविध आघाड्या तो सांभाळू लागला. "आयडेंटिटी' नावाची शॉर्टफिल्म त्याने बनविली आणि 2014 मध्ये त्याने पहिलावहिला चित्रपट लिहायला घेतला तो "म्होरक्‍या.' नुकत्याच जाहीर झालेल्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये "म्होरक्‍या'ने दोन पुरस्कार पटकावले.

"म्होरक्‍या'ची संकल्पना त्याला कशी सुचली? अमर एका शॉर्टफिल्मच्या चित्रीकरणासाठी पुण्याजवळील एका गावातील शाळेत गेला. तो दिवस होता 15 ऑगस्टचा. तेथे संचलन करणारी 20-25 विद्यार्थ्यांची तुकडी होती. तिचा म्होरक्‍या असलेला मुलगा अमरला काहीसा नेभळट वाटला. एखाद्या टीमचे नेतृत्व असे कमकुवत असेल, तर ती टीम कशी काम करणार, असा प्रश्‍न त्याला पडला आणि त्याला "म्होरक्‍या'ची संकल्पना सापडली. चित्रपटाचे लेखन पूर्ण झाल्यानंतर त्याने गावोगावी जाऊन कलाकारांची निवड केली.

मात्र आर्थिक पाठबळाचा प्रश्‍न उभा राहिला. तेव्हा गावातील शेती विकण्याचा विचार त्याच्या मनात आला. दरम्यान, सोलापूरला कल्याण पडाल आणि युवराज सरवदे यांच्याशी त्याची भेट झाली. "म्होरक्‍या'ची कथा ऐकल्यानंतर त्यांनी आपल्या एका चित्रपटाचा प्रोजेक्‍ट बाजूला ठेवून "म्होरक्‍या' पहिल्यांदा बनवायचा, असे ठरविले. त्यांच्या "स्वस्तिक- प्रीती फिल्म प्रोडक्‍शन'द्वारे चित्रीकरण सुरू झाले. 

सव्वाशे-दीडशे बालकलाकार, शेळ्या-मेंढ्या असा लवाजमा घेऊन 42-45 विविध लोकेशन्सवर चित्रीकरण झाले. त्यानंतर पोस्ट प्रॉडक्‍शनचे काम करण्यातही अडचणी आल्या. त्यामुळे अमरने चक्क शेती विकून "अमर चित्रवाणी' या स्वतःच्या निर्मिती संस्थेअंतर्गत चित्रपट पूर्ण केला. चित्रपटाची कल्पना सुचल्यापासून प्रत्यक्ष त्याच्या निर्मितीपर्यंत अनेक आघाड्यांवर म्होरकेपण करीत त्याने घेतलेल्या धडपडीचे अखेर सार्थक झाले. आधी पुण्याच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात "म्होरक्‍या'चा गौरव झाला आणि आता तर थेट दोन राष्ट्रीय पुरस्कारांनी या चित्रपटाचा सन्मान झाला आहे. कलेची प्रचंड आवड, जिद्द आणि दांडगा आत्मविश्‍वास याच्या बळावर अमरने या यशाला गवसणी घातली आहे.

Web Title: Pune Edition Editorial Jiddicha Mhorkya Article