"रॉकेट मॅन'ची भरारी (नाममुद्रा)

Pune Edition Editorial NamMudra Rocket Man
Pune Edition Editorial NamMudra Rocket Man

सरकारी शाळेत, तमीळमधून शिक्षण घेतलेला, कधीही कोचिंग क्‍लासला न गेलेला मुलगा आज अवकाश संशोधनात जगभरात आदर प्राप्त केलेल्या "इस्रो'चा प्रमुख आहे. चिकाटी, अथक परिश्रम आणि प्रखर बुद्धिमत्ता यांच्या जोरावर अवकाशशास्त्रज्ञ डॉ. कैलासावडीवू सिवन यांनी हे यश प्राप्त केले आहे. राजकीय क्षितिजावर तळपतानाच खगोलशास्त्राचाही सखोल अभ्यास असलेल्या लोकमान्य टिळकांच्या नावाने पुण्यातील लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टतर्फे दिला जाणारा यंदाचा टिळक पुरस्कार सिवन यांना जाहीर झाल्याने त्यांच्या कार्याचा यथोचित गौरव झाला आहे. 

सिवन यांचा जन्म 1958 मध्ये साध्या शेतकरी कुटुंबात झाला. स्वकष्टावर शिक्षण घेत त्यांनी "मद्रास आयआयटी', "मुंबई आयआयटी'सारख्या प्रतिष्ठित संस्थांमधून एरॉनॉटिकल इंजिनिअरिंग, एअरोस्पेस इंजिनिअरिंग असे विषय घेत बी. ई., एम. ई. केले. बी.ई.ची पदवी मिळताच "पीएसएलव्ही' प्रकल्पासाठी ते "इस्रो'मध्ये 1982 ला रुजू झाले. तेव्हापासून जानेवारी 2018 मध्ये "इस्रो'चे प्रमुखपद मिळेपर्यंतचा त्यांचा प्रवास थक्क करणारा आहे.

उपग्रह अवकाशात सोडण्यासाठी अत्यावश्‍यक असलेल्या प्रक्षेपकाची रचना आणि विकास करण्याचे महत्त्वपूर्ण काम सिवन यांनी तेथे केले. मोहिमेची आखणी, तिची रचना, त्यातील घटक आणि विश्‍लेषण यात त्यांनी मोठे योगदान दिले. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे उड्डाणांमध्ये अचूकता येण्यास मदत झाली. "इस्रो'च्या प्रक्षेपकांच्या उड्डाणांसाठी उपयुक्त ठरणाऱ्या "6 डी' सिम्युलेशन सॉफ्टवेअरचे ते जनक आहेत. मंगळ मोहिमेमध्येही त्यांचे योगदान होते. 

पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीच्या बाहेर उपग्रहाला पाठविण्यासाठी क्रायोजेनिक इंजिनची आवश्‍यकता असते. हे तंत्रज्ञान देण्यास इतर देशांनी नकार दिल्याने "इस्रो'ने जिद्दीने स्वदेशी बनावटीचे क्रायोजेनिक इंजिन तयार केले. हे देदीप्यमान यश सिवन यांच्याच नेतृत्वाखाली मिळाले. त्यामुळे त्यांना "रॉकेट मॅन' असे म्हटले जाते.

"इस्रो'ने अवकाशात एकाच वेळी 104 उपग्रह सोडले, या ऐतिहासिक यशाचे शिल्पकारही सिवन हेच आहेत. एवढी मोठी कामगिरी करतानाही त्यांच्यातील अंगभूत नम्रता आणि सौजन्यशीलता कायम आहे. "इस्रो'चे प्रमुखपद मिळेल, असे तुम्हाला अपेक्षित होते काय?, या प्रश्‍नावर त्यांनी, "नाही, मी "पीएसएलव्ही'च्या कामात व्यग्र होतो,' असे उत्तर दिले होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com