ट्रम्प यांना प्रतिनिधिगृहाची वेसण 

ट्रम्प यांना प्रतिनिधिगृहाची वेसण 

आधुनिक लोकशाहीचा पाया हा अमेरिकी स्वातंत्र्याचा जाहीरनामा, फ्रेंच राज्यक्रांती, तसेच अमेरिकेत गुलामगिरी नष्ट करण्यासाठी झालेल्या यादवीद्वारे घातला गेला. अर्वाचीन इतिहासात अमेरिकेची लोकशाही सर्वांत जुनी ठरली. अमेरिकी स्वातंत्र्ययुद्धाच्या मंथनातून जॉर्ज वॉशिंग्टन, जेफरसन अशी रत्ने निघाली, तर गुलामगिरी विरुद्धच्या संघर्षातून अब्राहम लिंकन लाभले. या पार्श्‍वभूमीवर साठच्या दशकात रिचर्ड निक्‍सन आणि आता डोनाल्ड ट्रम्प ही लोकशाहीच्या वृक्षावरची बांडगुळे जगाने पाहिली. दुसऱ्या महायुद्धानंतर लोकशाही जगतात अमेरिकेकडे नेतृत्व आले. जागतिक सामरिक व राजकीय सत्तासंतुलनात या महासत्तेने महत्त्वाची भूमिका बजावली. 

जगभरच्या बुद्धिमान लोकांनी अमेरिकेत येऊन त्या देशाच्या वैभवात भर घातली. ट्रम्प नावाचा आक्रस्ताळी नेता 2016 मधील निवडणुकीद्वारे अमेरिकेच्या अध्यक्षपदी आल्यानंतर त्यांनी केवळ अमेरिकेतच नव्हे, तर बाहेरही उत्पात माजवला. दोन वर्षांतच जगभरच्या लोकांना ट्रम्प हे केवळ अमेरिकेवरचेच नाही, तर जगावरचे संकट वाटू लागले. त्यामुळेच सहा नोव्हेंबरला झालेल्या अमेरिकेतील द्विवार्षिक निवडणुकीकडे अवघ्या जगाचे लक्ष लागले होते. अमेरिकी संसदेच्या (कॉंग्रेस) सिनेट या वरिष्ठ सभागृहात ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाने बहुमत टिकविण्याबरोबरच ते वाढविलेही. मात्र 435 सदस्यांच्या प्रतिनिधिगृह या कनिष्ठ सभागृहात आठ वर्षांनंतर डेमोक्रॅटिक पक्षाला बहुमत मिळाले. अध्यक्षीय प्रशासन आणि संसदेवरील वर्चस्वामुळे ट्रम्प यांनी जी मनमानी चालविली होती, तिला आता आळा बसण्याची शक्‍यता आहे. "अमेरिका फर्स्ट' घोषणेद्वारे सत्तेवर आलेल्या ट्रम्प यांनी दोन वर्षांत अमेरिकेत उभी फूट पाडली असून, ज्या मूल्यांवर अमेरिकेची उभारणी झाली तो पायाच त्यांनी खिळखिळा करून ठेवला आहे. 

गोऱ्यांच्या वर्ण-वंश वर्चस्ववादाला कुरवाळणाऱ्या ट्रम्प यांनी सनातनी परंपरांना नव्याने साद घालीत आपले राजकीय बस्तान बसविण्याचा प्रयत्न केला. त्यातून कृष्णवर्णीय, हिस्पॅनिक, स्थलांतरित यांना अमेरिकी हितसंबंधांवरचे निखारे ठरविण्याचा प्रयत्न झाला. महिलांबाबत ट्रम्प यांचा दृष्टिकोन 2016 मधील निवडणुकीच्या प्रचारमोहिमेत हिलरी क्‍लिंटन यांचा "नास्टी वुमन' अशा जाहीर उल्लेखातून स्पष्ट झाला. या पार्श्‍वभूमीवर आताच्या निवडणुकीत अवघ्या अमेरिकेतील महिलांच्या एकजुटीमुळे शंभरावर महिला उमेदवार निवडून आल्या. अलास्का प्रांताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या व आठ वर्षांपूर्वी प्रतिनिधिगृहाचे सभापतिपद सांभाळणाऱ्या नॅन्सी पेलोसी यांनी आता ट्रम्प यांचा हिशेब चुकता करण्याचे सूतोवाच केले आहे. 

डोनाल्ड ट्रम्प हे "पडलो तरी नाक वर' या श्रेणीतले पुढारी आहेत. त्यांच्यामुळे अमेरिकी समाजाचे ऐक्‍य भंगले. प्रतिनिधिगृहातील रिपब्लिकन पक्षाचे बहुमत आता गेले. पण सिनेटमधील कामगिरीचा आधार घेत त्यांनी विजयाचा दावा केला आहे. अमेरिकेत 1984 मध्ये रोनाल्ड रेगन आणि 1996 मध्ये बिल क्‍लिंटन यांच्या अध्यक्षीय कारकिर्दीत संसदेत विरोधी पक्षाला बहुमत होते. रेगन हे रिपब्लिकन, तर क्‍लिंटन हे डेमोक्रॅटिक पक्षाचे. दोघांनीही समजूतदारपणा व संवादाद्वारे काम पुढे नेले. पण ट्रम्प हे राजकीय विरोधाला वैर मानून वागत आले असल्याने अमेरिकी संसदेतील कामात उरलेल्या दोन वर्षांत अडथळे येणार आहेत. 2020 मधील अध्यक्षीय निवडणुकीतील ट्रम्प यांच्या उमेदवारीच्या दृष्टीने आताच्या निवडणुकीत त्यांच्या रिपब्लिकन पक्षाचा निर्भेळ विजय होण्याला महत्त्व होते. या निवडणुकीच्या रिंगणात नसलेले ट्रम्प हेच "केंद्र' ठरले होते. 

अध्यक्षीय निवडणुकीत रशियाच्या हस्तक्षेपाची चौकशी हा ट्रम्प यांच्या राजकीय भवितव्याच्या दृष्टीने कळीचा मुद्दा ठरणार आहे. त्यांचे करचोरी प्रकरण, देहविक्रय करणाऱ्या महिलांचे तोंड बंद करण्यासाठी निवडणूक निधीतून वळविलेला पैसा, ट्रम्प कुटुंबाचे आर्थिक हितसंबंध या बाबी आतापर्यंत चर्चेत होत्या. आताच्या निवडणुकीत प्रतिनिधिगृहात डेमोक्रॅटिक पक्षाला भक्कम बहुमत मिळाल्याने ट्रम्प यांच्यावर महाभियोगाची कारवाई होण्याची शक्‍यता वाढली आहे. अध्यक्ष म्हणून आपल्याला असलेल्या विशेष अधिकारांद्वारे आपल्याविरुद्धची दंडात्मक कारवाई उधळून लावू, असे म्हणणारे ट्रम्प आता सिनेटमधील बहुमताच्या जोरावर डेमोक्रॅटिक पक्षावर सूड उगवण्याची भाषा करू लागले आहेत. त्यासाठी त्यांनी आतापासूनच संघर्षाचा पवित्रा घेतला आहे.

ताज्या निवडणूक निकालानंतर त्यांनी ऍटर्नी जनरल जेफ सेशन्स यांना राजीनामा देण्यास भाग पाडले. अध्यक्षीय निवडणुकीतील रशियाच्या हस्तक्षेपाचे प्रकरण हाताळणारे विशेष वकील रॉबर्ट म्युलर यांना जेरबंद करण्याचे त्यांचे प्रयत्न फसले. आता प्रतिनिधिगृहात डेमोक्रॅटिक पक्षाच्या बहुमतामुळे म्युलर यांना सुरक्षाकवच मिळाले आहे. 

अमेरिकेच्या संविधानकर्त्यांनी "चेक अँड बॅलन्स'चे भान ठेवून अध्यक्षीय प्रशासन आणि संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या जबाबदाऱ्या व कामाची आखणी केली असली, तरी ट्रम्प यांनी ही चौकट उधळून लावणारे वर्तन केले. सिनेटमध्ये त्यांच्या रिपब्लिकन पक्षाचे बहुमत वाढल्यामुळे सर्वोच्च न्यायालयातील नेमणुकांवर त्यांची पकड कायम राहणार आहे. नऊपैकी पाच न्यायाधीश सनातनी विचारांचे असल्याने सर्वोच्च न्यायालयाचे संतुलन यापूर्वीच बिघडले आहे. मंत्री, राजदूत वगैरेंच्या निवडीवर शिक्कामोर्तब करण्याचा अधिकार सिनेटच्या संबंधित समित्यांना असल्याने ट्रम्प यांना हवी ती मंडळी येत्या दोन वर्षांत त्या त्या पदावर राहणार आहेत. पण प्रतिनिधिगृहातील बहुमतामुळे डेमोक्रॅटिक पक्षाला ट्रम्प यांच्या अनेक भानगडींची चौकशी सुरू करण्याचा अधिकार मिळणार आहे. त्यातूनच अखेर ट्रम्प यांच्यावरील महाभियोगाची कारवाई सुरू होऊ शकते. मात्र डेमोक्रॅटिक पक्षातील मवाळ व जहाल डाव्या गटांमध्ये या मुद्यावर मतभेद आहेत. प्रतिनिधिगृहाद्वारे डेमोक्रॅटिक पक्ष आपल्या सरकारची कोंडी करीत आहे, असा कांगावा करीत ट्रम्प 2020 मधील निवडणुकीसाठी आपल्याविषयी सहानुभूती निर्माण करण्याची शक्‍यता आहे. 

ताज्या निवडणुकीच्या तोंडावर मध्य अमेरिकेतील भुकेकंगाल सात हजार लोकांचा जमाव मेक्‍सिकोमधून अमेरिकेकडे निघाला होता. ट्रम्प यांनी अमेरिकेवरचे हे "आक्रमण' आहे, असे भासवीत पंधरा हजार सैनिकांना अमेरिका-मेक्‍सिकोच्या सीमेवर धाडले. "अमेरिकेत घुसू पाहणाऱ्या स्थलांतरितांनी दगडफेक केली, तर त्यांना गोळ्या घालण्यात येतील,' असा इशाराही ट्रम्प यांनी दिला. स्वतः ट्रम्प यांचे वाडवडील जर्मनीतून अमेरिकेत आले. अमेरिकेची लोकसंख्या ही स्थलांतरितांचीच लोकसंख्या आहे.

मूळ निवासी रेड इंडियन्सचा निःपात करून हा देश उभा राहिला आहे. अमेरिकेचे सारे वैभव ही स्थलांतरितांचीच किमया आहे. पण आता ट्रम्प आणि त्यांचे समविचारी गोरे वर्चस्ववादी सहकारी अमेरिकेच्या पारंपरिक उदार लोकशाही मूल्यांना दडपून आपले अस्तित्व टिकवू पाहत आहेत. 

इराक आणि अफगाणिस्तानात अमेरिकी लष्कराचे कमांडर असलेल्या एका माजी सेनाधिकाऱ्याने स्थलांतरितांच्या विरोधात लष्कर पाठवणे आणि त्याच्या वापराची धमकी देणे ही लोकशाही मूल्यांशी, तसेच सरकार आणि लष्कर यांच्या संतुलनाशी तडजोड ठरेल, अशी प्रतिक्रिया नोंदविली आहे, ती या संदर्भात योग्य तो संदेश देण्यास पुरेशी आहे. पण प्रश्‍न ट्रम्प अशा प्रतिक्रियांची दखल घेतील काय हा आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com