चंद्राबाबूंची दिल्ली स्वारी ! (अग्रलेख)

Pune Edition Editorial on Politics Chandrababu Naidu
Pune Edition Editorial on Politics Chandrababu Naidu

राजकारणात कायमचा शत्रू आणि कायमचा मित्र असे काही नसते, असे म्हटले जाते. हे अगदी सर्वांच्या बाबतीत सर्व काळ खरे नसते. मात्र, भारतीय राजकारणात त्याचा प्रत्यय अधूनमधून येतो आणि प्रादेशिक अस्मितेवर आधारित राजकारण करणाऱ्यांच्या बाबतीत तर बऱ्याचदा येतो. तीन दशकांहून अधिक काळ कॉंग्रेसचे कट्टर वैरी असलेले आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी दिल्लीत कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतली आणि देशाला वाचवण्यासाठी नरेंद्र मोदी व भाजपच्या विरोधात आघाडी करण्याच्या आणाभाका घेतल्या! चंद्राबाबूंच्या या कोलांटउडीमुळे त्यांच्या राजकीय प्रवासाचे वर्तुळ पूर्ण झाले आहे. 

तरुणपणात, 1970च्या अस्वस्थ दशकात चंद्राबाबूंनी आपल्या राजकीय प्रवेशाची सुरवातच युवक कॉंग्रेसमधून केली होती. एवढेच नव्हे, तर त्याच दशकात इंदिरा गांधींनी जारी केलेल्या आणीबाणीच्या विरोधात अवघा देश उभा ठाकला असताना, ते संजय गांधींचे खंदे पाठीराखे होते. मात्र, आता राहुल यांच्या हातात हात घालून, मोदींच्या विरोधात राष्ट्रीय पातळीवर आघाडी उभारण्याचा चंग त्यांनी बांधला आहे. त्यासाठी त्यांनी राहुल गांधी यांची भेट घेतलीच; पण शरद पवार, मुलायमसिंह यादव, फारूख अब्दुल्ला, अजित सिंह आणि मोदी यांचे कडवे टीकाकार अरुण शौरी यांच्याही भेटीगाठी घेतल्या. त्यामुळे चंद्राबाबू हे अखेर "स्वगृही' तर येऊन पोचले नाहीत ना, असा प्रश्‍न पडू शकतो! 

चंद्राबाबू केवळ संजय गांधी यांचे समर्थकच नव्हते, तर ते कॉंग्रेसच्या तिकिटावर निवडून येऊन आंध्रात टी. अंजय्या यांच्या मंत्रिमंडळात तंत्रशिक्षण आणि सिनेमॅटोग्राफी अशी खातीही सांभाळत होते. या सिनेमॅटोग्राफीनेच त्यांची गाठ "तेलुगू बिड्डा' एन. टी. रामाराव यांच्याशी घालून दिली आणि पुढे ते थेट रामारावांचे जावईच बनले! रामाराव यांच्या राजकीय महत्त्वाकांक्षा मोठ्या होत्या आणि त्यांनी 1982 नंतर तेलुगू देसम पक्षाची स्थापना केल्यावर हे जावईही त्या पक्षात दाखल झाले आणि त्यांनी पुढे त्या पक्षावर कब्जाच केला! त्या काळात ते कॉंग्रेसविरोधाने पेटलेले असत आणि शरद पवार कॉंग्रेसच्याबाहेर असताना, त्यांनी त्यांच्या सोबत आणि डॉ. अब्दुल्ला यांच्या साथीने कॉंग्रेसविरोधात आघाडीही स्थापन केली होती. याच कडव्या कॉंग्रेसविरोधाची परिणती त्यांनी भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीत सहभागी होण्यात झाली आणि गेली दोन दशके ते "एनडीए'चे मोठे आधारस्तंभही होते. मात्र, 2014च्या प्रचारमोहिमेत आंध्रला विशेष राज्याचा दर्जा देण्यासंबंधात मोदींनी दिलेल्या आश्‍वासनाची पूर्ती होत नाही, हे लक्षात आल्यावर त्यांनी गेल्या मार्चमध्ये "एनडीए'ला सोडचिठ्ठी दिली! चंद्राबाबू आता सुडाने पेटून उठले असून, मोदीविरोध हेच आपले जीवितकार्य असल्याचे ते वरकरणी दाखवत असले, तरी "अंदर की बात' मात्र वेगळी असू शकते. पुढच्या एप्रिल-मेमध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीबरोबरच चंद्राबाबूंना विधानसभा निवडणुकीला सामोरे जायचे आहे आणि पद टिकवण्यासाठीच त्यांनी राहुल यांच्या हातात हात दिल्याचे दिसते. 

चंद्राबाबूंनी गेली लोकसभा निवडणूक भाजपबरोबर लढवली होती आणि तेव्हा त्यांनी आंध्रातील 42 पैकी 29 जागा जिंकल्या होत्या. मात्र, आता विधानसभेला सामोरे जाताना त्यांच्यासमवेत भाजप नसणार. शिवाय जगनमोहन रेड्डी यांच्या "वायएसआर कॉंग्रेस'चे आव्हानही आहे. त्यामुळेच त्यांना आता नव्या मित्रांची गरज भासते आहे. कॉंग्रेसशी हातमिळवणी करण्यामागील खरे इंगित हेच आहे. बाकी "लोकशाही वाचवण्याच्या अपरिहार्यतेतून आम्ही राहुल यांच्या हातात हात देत आहोत!' हे सारे "शब्द बापुडे केवळ वारा' आहेत. 

राहुल यांच्यासमवेत जाण्यामागे त्यांची त्यापुढची महत्त्वाकांक्षाही असू शकते; कारण या विरोधी आघाडीची पुंगी यदाकदाचित वाजलीच, तर पंतप्रधानपदाचे स्वप्नही ते पाहत असतील. त्यामुळेच या राष्ट्रीय स्तरावरील आघाडीचा नेता वा पंतप्रधानपदाचा उमेदवार जाहीर करायला ते तयार नाहीत. राहुल यांनाही आताच्या परिस्थितीत म्हणजेच मध्य प्रदेशात मायावतींनी सहकार्य करायला नकार दिल्यानंतर नवे मित्र हवेच आहेत. तेव्हा लोकशाही वाचवण्याच्या निव्वळ गप्पा आहेत, खरी गरज नव्या मित्रांची आहे आणि त्यामुळेच तीन दशकांचे हे कट्टर वैरी हातात हात घालायला तयार झाले आहेत. चंद्राबाबूंच्या दिल्लीस्वारीचा खरा अर्थ हाच आहे !

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com