टू "इडियट्‌स'

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 28 जुलै 2018

परिस्थिती बरी असली, आसपास आप्तेष्ट असले तर अशी आयुष्ये निदान निभून तरी जातात; पण गरिबांना मात्र कुणीही वाली नसतो. अर्थात, मुंबईचे डॉ. वाटवानी सोडून! कारण अशाच रुग्णांच्या पालनपोषणाचा विडा त्यांनी उचलला आहे. यासाठी त्यांना कोणी उचलून भलीभक्‍कम रक्‍कम देत नाही की पुरस्कारांची खैरात करत नाही.

पोटापुरते मिळवून संतुष्ट राहणाऱ्यांपेक्षा लष्करच्या भाकऱ्या भाजणाऱ्या मोजक्‍या महाभागांमुळेच समाजाचा गाडा पुढे पुढे जात असतो, हे तर त्रिकालाबाधित सत्य आहे. अनवट वाटांचे हे वाटसरू कुठल्या मुशीतून तयार होतात, कुणास ठाऊक. उपजीविकेकडे सपशेल दुर्लक्ष करून अवघी बिरादरी पैलथडीला नेण्याच्या कामातच ही मंडळी आपली "जीविका' शोधतात. त्यांचा हा प्रवास बहुतेकदा दुर्लक्षित राहातो. प्रसंगी कुचेष्टेचाही विषय होतो; परंतु या अलौकिक व्यक्‍तिमत्त्वांना त्याचे काहीही सोयरसुतक नसते. सत्य आणि अहिंसेची तत्त्वे विश्‍वाला देणाऱ्या, अशाच एका झपाटलेल्या माहात्म्याने या देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात चैतन्य ओतले होते.

अशाच एका अद्‌भुत बाबाजीने "देवकीनंदन गोपाला'चा पुकारा करत हाती झाडू घेऊन उभ्या-आडव्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातली आणि मनामनातली जळमटे स्वच्छ करण्याचा विडा उचलला होता. अशाच एका निर्भय व्यक्‍तिमत्त्वाने वरोऱ्याच्या त्या रानवट जंगलात नांगर चालवून कुष्ठरोग्यांसाठी आनंदवन निर्माण केले होते... कितीतरी नावे सांगता येतील. कित्येक सांगताही येणार नाहीत. "ऍकला चालो रे' हे जीवनसूत्र स्वीकारून ही थोर मनुष्ये असतील, तिथून आपली कार्यज्योत तळहाताच्या कोनाड्यात जपत राहातात. या ज्योतीने ज्योत पेटत गेली की ते सारे कार्यच स्वयंप्रकाशित होते. या प्रक्रियेत खूप वेळ जातो. अशा दोघा "वेड्या' भारतीयांना यंदाचा प्रतिष्ठेचा रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर झाला, ही आनंदाची बाब आहे. 

सुमारे आठ-दहा वर्षांपूर्वी वाजून-गाजून गेलेल्या "थ्री इडियट्‌स' चित्रपटातला बुद्धिमान फुंगसुक वांगडू ऊर्फ रणछोडदास चांचड ऊर्फ रांचो भेटला नसता, तर कदाचित सोनम वांगचुक हे नावदेखील आपल्याला कदाचित ठाऊक झाले नसते. लेह-लडाखच्या बर्फगार मरुभूमीत विद्यादानाचा अभिनव यज्ञ मांडणाऱ्या या तरुणाने आपले अभियांत्रिकीतील ज्ञान पणाला लावून तिथल्या शालेय विद्यार्थ्यांना घडवण्याचा संकल्प केला. पुस्तकी ज्ञानाच्या पलीकडे जाऊन विज्ञानाधिष्ठित व्यवहार मातृभाषेत शिकवण्याचा त्यांचा आग्रह होता. श्रीनगरच्या तंत्र महाविद्यालयातील पदवी मिळवल्यानंतर त्यांना भल्याभक्‍कम पगाराची नोकरी मिळणे कठीण नव्हते; परंतु, "मर्सिडिझ'पेक्षा त्यांना आपल्या मरुभूमीतील विद्यार्जनाच्या परवडीची चिंता अधिक होती.

"वयाच्या नवव्या वर्षांपर्यंत आईनेच घरी शिकवल्याने इंग्रजी भाषेची कटकट नव्हती. आईच्या भाषेत शिक्षण झाल्याने पुढे माझे बरे झाले...' हे त्यांचे उद्‌गार बरेच बोलके आणि आपल्या "क्‍यूट' मुलांना अट्टहासाने इंग्रजी शाळेत घालून त्यांचे "करिअर' घडवू पाहणाऱ्या हजारो मम्मी-पप्पांच्या डोळ्यांमध्ये अंजन घालणारे ठरावेत. लेह-लडाखच्या दुर्गम भागातील मुलांना अभिनव शिक्षण देणारी त्यांची संस्था आताशा नावारूपाला आली आहे. निसर्ग किंवा भौतिकीचे नियम शिकवतानाच त्यांनी हिवाळ्यात साचणाऱ्या बर्फाचे स्तूप उभारून "उलट्या विहिरी' निर्माण करून लडाखच्या काही भागातले पाण्याचे दुर्भिक्षही संपवले, हा त्यांच्या कार्याचा एक जादा बोनस गुण म्हणावा लागेल. 

लडाखच्या रुक्ष भूमीतल्या सोनम वांगचुक यांच्यासारखाच आणखी एक "वेडा' महानगरी मुंबईत एकांड्या पद्धतीने राबत होता, हे किती जणांना ठाऊक होते? ना कधी प्रसिद्धी-माध्यमांनी त्यांची दखल घेतली, ना ते कधी माध्यमांकडे फिरकले! मुंबईच्या रस्तोरस्ती, उड्डाण पुलांखाली आढळणाऱ्या, दारिद्य्रात, घाणीत लोळणाऱ्या असंख्य मनोरुग्णांना स्वत: उचलून आणून त्यांची देखभाल, उपचार करण्याचा "अव्यापारेषु व्यापार' करणारे डॉ. भारत वाटवानी हे मुंबईत राहूनही तुलनेने अनोळखीच राहिले. स्किझोफ्रेनिया किंवा दुभंग व्यक्‍तिमत्त्वाचे रुग्ण समाजात अनेक आढळतात.

परिस्थिती बरी असली, आसपास आप्तेष्ट असले तर अशी आयुष्ये निदान निभून तरी जातात; पण गरिबांना मात्र कुणीही वाली नसतो. अर्थात, मुंबईचे डॉ. वाटवानी सोडून! कारण अशाच रुग्णांच्या पालनपोषणाचा विडा त्यांनी उचलला आहे. यासाठी त्यांना कोणी उचलून भलीभक्‍कम रक्‍कम देत नाही की पुरस्कारांची खैरात करत नाही.

तरीही गेली कैक वर्षे डॉ. वाटवानी यांनी या भंगलेल्यांची काळजी पोटतिडिकेने घेतली. जे का रंजले गांजले, त्यासी आपुले म्हणणाऱ्या डॉ. वाटवानींसारख्यांना साधू म्हणून ओळखावे काय? हे ज्याचे त्याने ठरवावे. वांगचुक आणि डॉ. वाटवानी यांना परदेशी पुरस्कार जाहीर झाल्याचा आनंद व्यक्‍त करावा की अशा अलौकिकांची दखल घेण्यासाठी आपल्याला परदेशी पुरस्कार का लागतात, या भावनेने ओशाळे व्हावे? हेदेखील ज्याचे त्यानेच ठरवावे. 

Web Title: pune edition editorial on Two Idiots