...तसाच शब्दांत आहे !

शेखर जोशी
सोमवार, 25 जून 2018

आजची तरुणाई वाचायची विसरली असं वाटत असताना दुष्काळाशी दोन हात करणारा एक तरुण लिहिता झाला, ही बाबही नक्कीच लक्षवेधी आहे. जिल्ह्यात अनेक ग्रामीण लेखक लिहिताहेत. नवनाथसारख्या अनेकांना शब्दधुमारे फुटले आहेत. 

"फेसाटी' शब्द शहरातल्यांसाठी नवा आहे. मात्र, दुष्काळाशी सामना करण्याऱ्या समाजाच्या जगण्यातून तो आला आहे. या शब्दाची मराठी साहित्यविश्‍वात चर्चा झडतेय. "फेसाटी' म्हणजे राबराब राबून तोंडाला येणारा फेस. संघर्षमय जगण्याचा वास्तव पट मांडणारे लेखक नवनाथ गोरे यांच्या "फेसाटी' या कादंबरीस यंदाचा साहित्य अकादमी युवा साहित्यिक पुरस्कार जाहीर झाल्यानंतर साहजिकच त्यांनी चित्रित केलेल्या जगण्याच्या विलक्षण अशा झगड्याकडे लक्ष वेधले गेले असेल तर नवल नाही. 

जत या रखरखत्या दुष्काळी तालुक्‍यातील निगडी खुर्द गावचा नवनाथ हा तिशीतला युवक. याआधी सांगलीकर लेखक वसंत केशव पाटील आणि हिंदीचे अभ्यासक प्रा. बलवंत जेऊरकर यांना अनुवादासाठी साहित्य अकादमीने गौरवले आहे. साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त अन्य लेखक आणि नवनाथ गोरे यांची तुलना करण्याचे कारण नाही; मात्र या माणसात एक वेगळेपण नक्की आहे. नवनाथ यांची ही पहिलीच कादंबरी. स्वतःचं जगणं त्यांनी त्यात मांडलं आहे.

जगताना इतके कष्ट उपसलेत की तोंडाला फेस यावा. ही कादंबरी त्यांच्यासारख्या कष्टकरी तरुणांची संघर्षकथा आहे. त्यावर कुठल्याही कृत्रिम आवरणाची छाप नाही... जे घडलं, जसं घडलं ते जसंच्या तसं "फेसाटी' सांगते. ते वाचल्यावर "जसा जगत आहे, तसाच शब्दांत आहे...' या नारायण सुर्वे यांच्या ओळी सहज आठवतात. दोनवेळची भाकरी ही आयुष्यातील सर्वांत मोठी कमाई असल्याचं सांगणाऱ्या नवनाथने पुस्तकांशी मैत्र जमविले. 

जिल्ह्याची साहित्य परंपरा संपन्न केली. शेळ्यामेंढ्यांमागे बालपण हरवलेला, दरसाल 14 हजार रुपये चाकरीवर शेतात राबणारा, विद्यापीठात एम.ए. करताना दोन वेळच्या अन्नासाठी गवंड्याच्या हाताखाली काम करणारा हा लेखक आजही कुडाच्या छपरात राहतो. तो गरिबीचं भांडवल करत नाही; मात्र त्याची त्याला लाजही वाटत नाही. आपलं जगणंच माझ्या लेखनाची ताकद असल्याची त्याला जाण आणि भान आहे.

आजची तरुणाई वाचायची विसरली असं वाटत असताना दुष्काळाशी दोन हात करणारा एक तरुण लिहिता झाला, ही बाबही नक्कीच लक्षवेधी आहे. जिल्ह्यात अनेक ग्रामीण लेखक लिहिताहेत. नवनाथसारख्या अनेकांना शब्दधुमारे फुटले आहेत. 

नवकवी, लेखक समाजभान जागे ठेवून व्यक्त होताहेत. केवळ समाजमाध्यमांच्या भिंती रंगवत नाहीत, तर पुस्तकरूपानं आपल्या जीवनानुभवांना शब्दाकार देऊ पाहताहेत. त्यांच्यासाठी नवनाथ एक प्रेरणास्रोत बनून समोर आला आहे. दुष्काळाची छाती फाडून तो अंकुररूपाने उगवलाय. त्याची "फेसाटी' ग्रामीण साहित्यात नवी भर घालणारी आहे. 

- नवनाथ गोरे

Web Title: Pune Edition Editorial written by Navnath Gore