वेगळ्या वाटेची आस (नाममुद्रा)

वेगळ्या वाटेची आस (नाममुद्रा)

दहावी-बारावीचे निकाल जाहीर झाल्यानंतर मुलांना जेव्हा पुढे काय असा प्रश्‍न विचारला जातो तेव्हा डॉक्‍टर, इंजिनिअर होणार, प्रशासकीय सेवेत करिअर करणार, संशोधनात रमणार अशी ठरीव उत्तरे मिळतात. यापेक्षा वेगळी उत्तरे सहसा ऐकायला मिळत नाहीत. बरं, या उत्तरांमागे त्या मुलांची स्वतःची मते तशी कमीच असतात. ही उत्तरे तयार केलेली असतात त्यांच्या पालकांनी. कित्येक मुले पहिल्या वर्गात जेव्हा पाऊल ठेवतात तेव्हाच पालकांनी त्याचे करिअर "डिझाइन' केलेले असते; मग ते बिचारे मूल त्या दिशेने पावले टाकत राहते.

स्पर्धेचे ओझे वागवत ही मुले चालू लागतात. काही तरून जातात, काही अपयशी ठरतात; मग खचतात, निराश होतात. वेगळ्या वाटेवर निघून जातात. हे आपल्या समाजाचे वास्तव. अशा वास्तवात आशेचा एखादा किरण अपेक्षांच्या ढगांआडून डोकावतो आणि खऱ्या अर्थाने काही करू पाहणाऱ्यांना मार्ग दाखवतो.

करिष्मा अरोरा हे नाव गेल्या चार दिवसांत देशातील प्रसारमाध्यमांतून ठळकपणे झळकले. मुजफ्फरनगरच्या एस. डी. पब्लिक स्कूलची ही कला शाखेतील विद्यार्थिनी. तिने सीबीएसईच्या बारावी परीक्षेत 500 पैकी 499 गुण मिळवून देशात प्रथम क्रमांक पटकावला. देशात अव्वल ठरलेल्या करिष्माला पुढे काय, असा प्रश्‍न विचारल्यानंतर तिने दिलेल्या उत्तराने करिअरची वेगळी वाट खुली केली. करिष्मा म्हणाली, ""मला नृत्यामध्ये करिअर करावयाचे आहे.

मी नृत्य शिकतेच आहे. मला त्यामधील आणखी सखोल ज्ञान मिळवायचे आहे.'' तिच्या या उत्तराने अनेकांना आश्‍चर्याचा धक्का बसला असेल. देशात पहिली आलेली मुलगी अगदी सहज रुळलेल्या वाटेवरून दणक्‍यात "नेम' आणि "फेम' मिळवू शकली असती, असेच विचार मनात आले असतील; पण या समजांना करिष्माने छेद दिला. विशेष म्हणजे तिचे कुटुंबीय तिच्या या निर्णयासोबत आहेत. ते तिच्या निर्णयाचा आदर करतात. कथ्थक शिकणारी आणि कला मंत्रालयाची शिष्यवृत्ती मिळालेली करिष्मा सांगते, ""परीक्षेच्या कालावधीत मी माझ्या पद्धतीने अभ्यास केला आणि स्वतःला सोशल मीडियापासून कटाक्षाने दूर ठेवले.''

करिष्माचा निर्णय दिखाऊ प्रतिष्ठेमागे धावणाऱ्या पालकांसाठी दिशादर्शक आहे. आपल्या पाल्याला स्वतंत्र अभिव्यक्ती आहे, ती जोपासल्यास ते नक्कीच काहीतरी वेगळे करू पाहील. अन्यथा कारखान्यातून निर्माण होणारे उत्पादन बनून जगाच्या मार्केटमध्ये शोभेची वस्तू बनतील. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com