मुद्रा : ऑस्ट्रेलियातील 'चमत्कार'

मुद्रा : ऑस्ट्रेलियातील 'चमत्कार'

"माझा चमत्कारांवर विश्‍वास आहे' असे म्हणत ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी येथील सार्वत्रिक निवडणुकीत आश्‍चर्यकारकरीत्या मिळालेल्या विजयाचा स्वीकार केला आहे. देशातील सर्व एक्‍झिट पोलमध्ये विरोधी लेबर पक्षाला सत्ता मिळण्याचा अंदाज व्यक्त केला असताना त्यांना खोटे ठरवित मॉरिसन यांच्या कॉन्झर्वेटिव्ह आघाडीने बहुमताच्या जवळपास मते मिळवून सत्ता राखल्याने सर्वत्र आश्‍चर्य व्यक्त होत आहे. 

यंदा जनता विरोधकांना संधी देणार असल्याचे दावे अत्यंत ठामपणे केले जात असल्याने हा विजय मॉरिसन यांच्यासाठीही धक्काच होता. अर्थात आघाडीच्या या यशाचे श्रेय सर्वस्वी मॉरिसन यांनाच जाते. त्यांनी या निवडणुकीत मतदारांना स्वत:च्या विश्‍वासार्हतेचा आणि कार्यक्षमतेचा वारंवार हवाला दिला. आपण सामान्य आहोत आणि सामान्यांचे प्रश्‍न सोडवू शकतो, असे त्यांनी जनतेला पटवून दिले. त्याचेच फळ त्यांना मिळाले.

ऑस्ट्रेलियामध्ये दर तीन वर्षांनी निवडणूक होते. मात्र, राजकीय स्पर्धेमुळे येथे 2007 पासून एकाही पंतप्रधानाला कार्यकाळ पूर्ण करता आलेला नाही. अशा परिस्थितीत मॉरिसन यांनी साधारण नऊ महिन्यांपूर्वी माक्‍लम टर्नबुल यांच्याकडून सूत्रे हातात घेतली होती. ऑस्ट्रेलियामधील मतदारांना देशाच्या अर्थव्यवस्थेची आणि आरोग्याची अधिक काळजी असल्याने मॉरिसन यांनी यंदाच्या निवडणुकीत याच मुद्यांवर भर देत यातून मार्ग काढण्यासाठी विश्‍वास ठेवण्याचे आवाहन केले होते. 

2007 पासून ऑस्ट्रेलियाच्या राजकारणात सक्रिय असून आणि मोठी पदे भूषविली असूनही मॉरिसन यांच्याबाबत निश्‍चित विधाने करता येत नाहीत. मॉरिसन हे अत्यंत हुशार म्हणून गणले जात नसले तरी राजकारणात हवी असलेली चतुरता त्यांच्याकडे आहे. कामाच्या जोरावर ते विश्‍वास निर्माण करू शकतात. मॉरिसन यांची वैयक्तिक मते हीच त्यांच्या पक्षाची राजकीय विचारधारा आहे. आर्थिक बाबींमध्ये ते उदारमतवादी आहेत, मात्र इतर सार्वजनिक बाबींमध्ये कमालीचे परंपरावादी आहेत.

आपली ध्येयधोरणे कठोरपणे राबविणारे अशीही त्यांची ओळख आहे. यापूर्वीच्या दोन मंत्रिमंडळांमध्ये काम केले असल्याने मॉरिसन यांना कामाचा तगडा अनुभव होता. त्यामुळे गेल्या वर्षी पंतप्रधानपद स्वीकारल्यापासूनच त्यांनी कामावर पकड घेतली होती. जबाबदारी सोपविल्याच्या दिवसापासून काम करण्याची मानसिकता असल्याने मॉरिसन यांनी गेल्या दहा महिन्यांत बरीच धडाडी दाखविली होती. आता त्यांना हीच धडाडी दाखवत त्यांच्यावर दाखविलेला विश्‍वास सार्थ ठरविण्याचे आव्हान आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com