स्वत:पाशी... (पहाटपावलं)

सोनाली नवांगुळ 
शुक्रवार, 26 एप्रिल 2019

स्वयंपाकघरातून घमघमाट सुटलेला. तोंडात कहर पाणी सुटून अन्न पचण्यासाठीची पूर्वतयारी ताबडतोब सुरू झालेली. सुग्रास ताट हातात घेतलं. पटकन कॉम्प्युटरसमोर आले.

स्वयंपाकघरातून घमघमाट सुटलेला. तोंडात कहर पाणी सुटून अन्न पचण्यासाठीची पूर्वतयारी ताबडतोब सुरू झालेली. सुग्रास ताट हातात घेतलं. पटकन कॉम्प्युटरसमोर आले. हवा तो सिनेमा पॉज करून तयारीत ठेवलेला. लगेच लावला नि खायला सुरवात केली. आई हिरमुसून म्हणाली, "एक तर एक आनंद घ्यावा. नीट अन्नाकडे बघत, कधी चटणी, कधी कोशिंबीर, कधी आमटीचा भुरका घ्यावा, तर पचतं अन्न.

दोन्हीकडचं अर्ध अर्ध, त्यामुळं कशातच काही नाही. ही कसली आलीय एन्जॉयमेंट?' तितक्‍यात एका मैत्रिणीचा फोन आला. मैत्रीण म्हणाली, "कमरेची चकती सरकलीय. डॉक्‍टरांनी पंधरा दिवस बेडरेस्ट सांगितलीय.' म्हटलं "व्वा! किती कटकट करत होतीस की माझा मला वेळच नाहीये, यंत्र आहे की मशिन? किती काय वाचायचंय, पाहायचंय! आता उपभोग घे एकांताचा, निवांतपणाचा.' - तर म्हणाली, "हो. ते आहेच. काल काकू येऊन गेली. आज मंजूला बोलावलंय. उद्या आपल्या गाण्याच्या ग्रुपमधल्या तिघींना म्हटलं, या जरा मला बघायला. गा थोडं इथं. आता पुढच्या चार दिवसांचं प्लॅनिंग करतेय की कुणाला भेटता येईल. येणाऱ्यांबरोबरचा अनुभव, फोटो लगेच "एफबी'वर अपलोड करायचा असतो.' पुढे ती बोलतच राहिली. मलाच दम लागला. म्हटलं, "अगं हो! थांब... या सगळ्यांत तुला हव्या असलेल्या तुझ्या एकांताचं काय?' तर म्हणते कशी, की पहिले दोन दिवस "फेसबुक' नि "व्हॉट्‌सऍप'वर खूप केला टाइमपास, एकांतात. पण बोअर झाले. इतर काही वाचवेना, पाहवेना. तगमग नुसती. अस्वस्थ वाटायला लागलं म्हणून जवळच्या, दूरच्या सगळ्यांना बोलावून घेतेय. मग चहापाणी, खाणं, कधी त्यांचं, कधी आमचं, वेळ भराभर निघून जातो. 

मी दचकलेच. आठवलं की मी काय करते एकटी असताना? मन लावून घर आवरते, वाचत पडते. भरपूर वेळ घालवून शाही अंघोळ करते. हातापायांची बोटं न्याहाळते. पण जेवताना जेवणं नि पाहताना पाहणं जमत नाहीये अजून! अगदी सुरवातीला स्वत:शी असणं जमत नव्हतं, तेव्हा "व्हॉट्‌सऍप' नव्हतं नि "फेसबुक' पोटाबोटाशी घ्यायचा चाळा नव्हता. त्या वेळी सारखं कुणाकुणाशी बोलावं वाटायचं. अखंड रिकामा वेळ हातात असताना स्वत:शी कसं असायचं, हे न कळल्यामुळं सगळ्यांत जास्त अस्वस्थ मी स्वत:जवळ असतानाच असायचे.

बापरे, आपण कम्फर्टेबल नसतो स्वत:शी? होय! तेच मोठं आव्हान आहे. प्रमोद देशपांडे म्हणाले, "आपल्याला अशा वेळी कळतं की आपल्याला भेटलेला "मोस्ट डिफिकल्ट पर्सन' आपणच असतो हे समजून मान्य करणं व त्याच्याशी सूर जुळवणं सगळ्यांत अवघड नि सोपंही. एकांत सापडला की माणसं तो येनकेनप्रकारे भरून टाकतात व स्वत:ला टाळतात. एकांताचं गीत जितकं गुणगुणू, तितका लोकांत सुरेख जमेल!' 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune Edition Pahatpawal Article