सुवर्ण किनारा! (अग्रलेख)

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 एप्रिल 2018

तगड्या प्रतिस्पर्ध्यांचे आव्हान पेलत राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी निर्भेळ यश संपादताना तिसऱ्या स्थानावर झेप घेतली. या यशामुळे भारतीय खेळाडूंचे एक पाऊल ऑलिंपिकच्या दिशेने पडले आहे, ही बाब अधोरेखित होते. 

ऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्ट शहरी गेले पंधरवडाभर सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये भारतीय पथकाने घसघशीत यश मिळवून देशाची मान उंच केली, याबद्दल त्यांचे अभिनंदन करावे तितके थोडेच. कथुआ आणि उन्नावच्या शिसारी आणणाऱ्या बातम्यांच्या आणि राजकीय चिखलफेकीच्या गढूळ वातावरणात गोल्ड कोस्टच्या दिशेकडून आलेली भारतीय यशोगाथेची बातमी म्हणजे ऐन उन्हाच्या झळांमध्ये मातीच्या सुगंधासहित आलेल्या थंडगार झुळकीसारखीच वाटावी. राष्ट्रकुलातील तब्बल सत्तरहून अधिक देशांच्या साडेपाच हजारांहून अधिक खेळाडूंच्या कटोविकटीच्या स्पर्धेत यंदा भारतीय खेळाडूंनी सोन्याची लयलूट केली. 

भारताच्या 66 पदकांच्या थैलीतली तब्बल 26 पदके सुवर्णाची आहेत. उरलेल्या चाळीस पदकांपैकी 20 रौप्य आहेत, तर 20 ब्रॉंझपदके. भारताला लाभलेली बरीचशी पदके ही कुस्ती, बॅडमिंटन, टेबल टेनिस आणि नेमबाजी या खेळांमधली आहेत. टेबल टेनिसमध्ये भारताने सिंगापूरची मक्‍तेदारी मोडीत काढली, हे लक्षणीय मानावे लागेल. बॅडमिंटनमध्ये भारतीयांनी गेल्या काही वर्षांत दाखवलेले सातत्य कमालीचे सुखद आहे. तगड्या प्रतिस्पर्ध्यांचे आव्हान पेलत भारतीय खेळाडूंनी निर्भेळ यश संपादले आणि राष्ट्रकुलाच्या क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर झेप घेतली. यजमान कांगारूंनी पदकतक्‍त्यात अव्वल स्थान मिळवले, तर राष्ट्रकुलाचा कुलपुरुष, म्हणजेच इंग्लंडने दुसरे स्थान पटकावले. क्रिकेटमधील चेंडू कुरतडण्याच्या प्रकरणामुळे ऑस्ट्रेलियाची क्रीडा क्षेत्रात भरपूर नाचक्‍की झाली होती. या पार्श्‍वभूमीवर "राष्ट्रकुलातील कामगिरीमुळे आमची मान किंचित वर झाली' असे प्रांजळ उद्‌गार ऑस्ट्रेलियन राष्ट्रकुल समितीच्या अध्यक्षांनी काढले, ते चिंत्य आहेत. यावरून तेथील क्रीडासंस्कृतीच्या स्तराची जाणीव होते. 

चार वर्षांपूर्वी ग्लासगोत झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये भारताने एकंदर 64 पदके जिंकली होती, त्यापैकी 15 सुवर्णपदके होती. भारताने यंदा आपली कामगिरी सर्वोत्तमाकडे नेल्याचे हे सुस्पष्ट द्योतक आहे. अर्थात राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील ही काही भारताची सर्वाधिक पदकसंख्या म्हणता येणार नाही. 2010मध्ये नवी दिल्लीत झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताने 600 खेळाडूंचे दमदार पथक उतरवले होते आणि तब्बल 200च्या वर पदके लुटली होती. दुर्दैवाने या क्रीडा स्पर्धा लोकांच्या लक्षात राहिल्या त्या तद्दन क्रीडाबाह्य कारणांमुळे. आपल्या नव्या दमाच्या खेळाडूंनी घरी आणलेले हे यशाचे घबाड भारतीयांना सुखावणारे आहे, यात शंका नाही. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमधली कामगिरी वा विक्रम यांचा ऑलिंपिक पात्रतेसाठी उपयोग होत नाही. किंबहुना, क्रीडा क्षेत्रात कायम दबदबा राखून असलेले अमेरिका, रशिया, चीन आदी देश राष्ट्रकुलाचा भाग नसल्याने ही स्पर्धा घरगुती स्वरूपाची राहते. मग या यशाचे कौतुक किती करावे? असा सवाल काहींच्या मनात येणे साहजिक आहे. राष्ट्रकुल हे बव्हंशी ब्रिटिश आमदानीतील देशांचे कुटुंब आहे. 1930मध्ये हेच खेळ सुरू झाले ते ब्रिटिश साम्राज्याच्या क्रीडा स्पर्धा म्हणून. पुढे 1974 पर्यंत हा क्रीडासोहळा ब्रिटिश साम्राज्याचा म्हणूनच ओळखला जात होता. 

तथापि, या स्थित्यंतरांमध्ये राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा बदलत गेल्या. आत्ताच्या राष्ट्रकुलातील सगळेच देश ब्रिटिश वसाहती होत्या असे नाही. राष्ट्रकुलाचे एकंदर 53 सदस्य देश असले, तरी या क्रीडा स्पर्धांमध्ये उतरणारे देश तब्बल 71 आहेत. असे असले तरी, राष्ट्रकुलाची तुलना जागतिक स्तरावरच्या ऑलिंपिक सोहळ्याशी करणे चुकीचेच ठरते. प्रत्येक प्रतिभावान खेळाडूचे अंतिम स्वप्न ऑलिंपिक पदकाचे असते, हे खरेच, पण त्यामुळे राष्ट्रकुलाची रेघ छोटी करण्यात काहीही हशील नाही. इथल्या यशानंतर भारतीय खेळाडूंचे एक मोठे पाऊल ऑलिंपिकच्या दिशेने पडले आहे, हे तर अधोरेखित होतेच. खेळाच्या रिंगणात किंवा मैदानात खेळाडूंचा कस तितकाच लागत असतो आणि खेळांचे नियमही तितकेच काटेकोर असतात. 

यंदाच्या राष्ट्रकुलमधील यशात नियोजन, प्रोत्साहन आणि प्रशासकीय नेतृत्वाचा किती मोठा वाटा आहे, अशा आशयाच्या बातम्या आता पुढील काही दिवसांत ऐकायला-वाचायला मिळतील. "खेळाडूच क्रीडामंत्री असला की असे यश मिळतेच,' अशा मखलाशीयुक्‍त प्रतिक्रिया एव्हाना ऐकू येऊ लागल्याही आहेत. "हेच ते अच्छे दिन' असेही ऐकू येण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. तथापि, हरेक गोष्टीचे राजकीय श्रेय-अपश्रेयात रूपांतर करण्याचा हिणकसपणा टाळून खेळाडूंची लगन आणि मेहनतीला सारे श्रेय देण्यातच खरा शहाणपणा आहे, हे पुढाऱ्यांनी आणि सर्वांनीच लक्षात घ्यायला हवे. 
 

Web Title: Pune Edition Pune Editorial Suvarn Kinara