यूएफओ!  (एक विज्ञानकथा...)

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 16 जून 2018

अवकाश गुप्तचर विभागाचे प्रमुख यो टिमा (ह्यांना तूर्त एकच "यो' लागतो...) ह्यांनी पाठवलेल्या नव्या संदेशामुळे योयोंनी (डबल यो हं...लक्षात ठेवा!) काही झटपट निर्णय घेतले. त्यांनी आपल्या गुह्यगृहात (अर्थ : खलबतखाना...तुम्ही लेको काहीही अर्थ लावता!) यो टिमा ह्यांना तांतडीने पाचारण केले. 

सूर्यमंडल प्रमुख योयो इडोम आर्दनेरान चिंताग्रस्त होते. अवघ्या ब्रह्मांडात त्यांना योयो ह्या आदरार्थी वचनाने संबोधत. पृथ्वीवरील पुण्यात्म्यांना श्रीश्री असे म्हटले जाते. मांगलिक भाषेत योयो म्हंटात. "स्टारट्रेक' मालिकेतील कॅप्टन स्पार्कसारखा योयो आर्दनेरान ह्यांनी झक्‍क युनिफॉर्म शिवून घेतला होता. त्याच्या खिशावर "योयो आर्दनेरान' असे इंग्रजीत लिहिलेले आहे. आता अंतराळात खिशावरचे नाव कोण वाचणार? पण हौसेला मोल नसते हेच खरे!! पण ते जाऊ दे. योयोंना चिंतेने ग्रासले होते ते पृथ्वीवरल्या काही घडामोडींमुळे. 

अवकाश गुप्तचर विभागाचे प्रमुख यो टिमा (ह्यांना तूर्त एकच "यो' लागतो...) ह्यांनी पाठवलेल्या नव्या संदेशामुळे योयोंनी (डबल यो हं...लक्षात ठेवा!) काही झटपट निर्णय घेतले. त्यांनी आपल्या गुह्यगृहात (अर्थ : खलबतखाना...तुम्ही लेको काहीही अर्थ लावता!) यो टिमा ह्यांना तांतडीने पाचारण केले. 

""बोला, पृथ्वीवरची काय हालहवाल?,'' योयोंनी विचारले. त्यांचा चेहरा घामेजला होता. मंगळावर गुरुत्वाकर्षण कमी असल्याने घाम हळूहळू गळतो. 
""मंगळयान जवळ येत आहे...,'' यो टिमा म्हणाले. 
""मानवरहित आहे ना?'' योयोंनी विचारले. यो ह्यांनी "हो' म्हटले. 

""मग ठीक आहे...'' सुटकेचा निश्‍वास टाकत योयोंनी आरशात पाहिले. योयो इडोम आर्दनेरान ह्यांना आरशात पाहिले की बरे वाटते. त्यासाठी त्यांनी जागोजाग आरसे लावले आहेत. यो टिमा मात्र आरशापासून घाबरुन लांबच राहतात. 
""परवा आपण एक यूएफओ पृथ्वीवर दिल्लीत पाठवला होता. त्याचा रिपोर्ट आला आहे...,'' डोळे बारीक करून यो टिमा ह्यांनी माहिती दिली. 

""अहवाल दिला नाहीत...का?'' योयोंनीही डोळे बारीक करून विचारणा केली. 
""दोन व्यक्‍ती दिसल्या. त्यातली एक व्यक्‍तीची अवस्था गंभीर वाटली. दुसरी मज्जेत होती...मज्जेत असलेली व्यक्‍ती प्लेटमध्ये काही चांगलेचुंगले पदार्थ खाताना दिसली...'' यो टिमांनी काही उपग्रहातून काढल्यासारखी धूसर छायाचित्रे पुढ्यात टाकली. 

""ढोकळा असणार...दुसरं काय?'' योयोंनी टिप्पणी केली. हल्ली हे ढोकळा प्रकरण हाताबाहेर जात चालले आहे. मंगळयानातून एखादा वानोळा पाठवला असेल का? योयोंची विचारांची मालिका सुरू झाली. 

""नाही. ढोकळा वाटत नाही. तो जांभळा असतो. हा मोरपंखी रंगाचा आहे. त्याअर्थी पिझ्झा असावा!,'' यो टिमा ह्यांनी काढलेली खबर करेक्‍ट होती. मंगळाच्या पृष्ठभागावर रंग वेगळे दिसतात, हे आपल्या आधी लक्षात यायला हवे होते, असे योयोंना वाटून गेले. 

""...बहुधा इथे मेजवानी चालली आहे! त्यावरून हे गृहस्थ सुखात असावेसे दिसते. गंभीर प्रकार दुसऱ्या व्यक्‍तीबद्दल आहे...हे पहा, हा मनुष्य एका विशाल दगडावर उताणा पडला आहे! लहान मुलांनी "ठो' केल्यावर आपण कसे जीभ काढून पडतो...तसा!!'' यो टिमांनी आणखी एक छायाचित्र पुढे केले. 

""...तिथली जमीन निळी कशी?'' योयोंनी विचारले. 
""हिरवळ निळी दिसते आपल्या मंगळावर...'' यो टिमांनी वैज्ञानिक माहिती दिली. पुढे म्हणाले, ""आपल्या यूएफओनं चांगली कामगिरी बजावली आहे. यूएफओ दिल्लीच्या आकाशात हिंडताना अनेकांनी पाहिला. सदर हिरवळीच्या आसपास गस्त घालणाऱ्या एका पहारेकऱ्यानं पहिल्यांदा यूएफओ पाहिल्याची तक्रार तिथल्या पोलिसात दिली. पण ती संध्याकाळी साडेसातची वेळ असल्याने पोलिसांनी त्याला "उतरल्यावर ये' असं सांगितल्याची माहिती आहे!'' 

""उतरल्यावर ये?...म्हंजे?,'' योयोंनी आश्‍चर्याने विचारले. 
""ह्या दोन प्रसंगांचा अर्थ काय काढायचा योयोजी?'' यो टिमा ह्यांनी अदबीने विचारले. 
""काही नाही...खडकावर झोपलेले हे गृहस्थ मज्जेत आहेत आणि पिझ्झा खाणाऱ्या व्यक्‍तीची हालत खराब आहे, एवढाच ह्याचा अर्थ!'' एवढे सांगून योयो अर्दनेरान इडोम ह्यांनी आरशात बघितले. त्यांच्या युनिफॉर्मवरील इंग्रजी नाव आरशात उलटे दिसत होते.- नरेंद्र मोदी! 
ते स्वत:शीच खुदकन हसले! 

-ब्रिटिश नंदी 
 

Web Title: Pune Edition Pune editorial UFO