मैदानाबाहेरचे शह-काटशह (मर्म)

मैदानाबाहेरचे शह-काटशह (मर्म)

भारताला पहिल्यावहिल्या "ट्‌वेन्टी-20' विश्‍वकरंडकाचे विजेतेपद मिळवून देणाऱ्या महेंद्रसिंह धोनीला वेस्ट इंडीजविरुद्धच्या मालिकेसाठी वगळण्यात आले. गेल्या महिन्यातील हा प्रसंग. आता महिलांच्या "ट्‌वेन्टी-20' विश्‍वकरंडक स्पर्धेत महत्त्वाच्या सामन्यात सर्वांत अनुभवी मिताली राजला वगळण्यात आले. या दोन्ही घटना वेगवेगळ्या असल्या तरी, आता भारतीय महिला क्रिकेटही "राज'कारणापासून दूर नसल्याचे जाणवते.

गेल्या जुलै महिन्यात मितालीच्या नेतृत्वाखाली 50 षटकांच्या विश्‍वकरंडक स्पर्धेत भारताने अंतिम सामन्यापर्यंत मारलेली मजल महिला क्रिकेटला शिखरावर नेणारी ठरली. तेव्हा खेळाडूंबरोबरच प्रशिक्षक तुषार आरोठे यांच्यावरही स्तुतिसुमने उधळण्यात आली; पण काही महिन्यांतच आरोठे यांना पद सोडावे लागले. कारण काही वरिष्ठ खेळाडूंनी त्यांच्या प्रशिक्षण पद्धतीवर नाराजी व्यक्त केली होती. त्यांच्या जागी आलेले रमेश पोवार हे आपल्याला जाणीवपूर्वक डावलत असल्याचा आरोप आता मितालीने केला आहे. ही उदाहरणे देण्याचे कारण एवढेच की, महिला क्रिकेटमध्ये मैदानाबाहेरही शह- काटशहाचे राजकारण होत आहे. 

या प्रकारात कोण खरे, कोण खोटे हे समोर येईलच असे नाही; परंतु "ट्‌वेन्टी-20' या वेगवान प्रकारात मिताली आता कमकुवत ठरत आहे, असे तिच्याबाबत म्हटले जात आहे. मितालीने मात्र रमेश पोवार आणि प्रशासकीय समितीच्या महिला सदस्या डायना एडल्जी यांची नावे घेत त्यांना लक्ष्य केले आहे. "बीसीसीआय'चे प्रशासन चालवत असलेल्या प्रशासकीय समितीतील सदस्यांच्या विरोधात "बीसीसीआय' पदाधिकाऱ्यांनी हिंमत दाखवली नाही. पुरुष खेळाडू तर दूरच राहिले, पण मितालीने थेट आरोप करून खळबळ उडवून दिली आहे. परिणामी, आता महिला खेळाडूंचा एकमेकींकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलू शकतो.

तिकडे धोनीला वगळून त्याला "टी-20'तून निरोप देण्यात आल्यातच जमा आहे. इकडे मितालीसाठीही तेच सूचित केले जात आहे. राजकारण वेगळे; परंतु निवृत्तीकडे झुकत असताना कोठे पूर्णविराम घ्यायचा, याची जाणीव होणे खेळाडूंच्या स्वाभिमानासाठी तेवढेच महत्त्वाचे असते.

धोनीला तर मालिकेपूर्वीच वगळले होते; पण मितालीची उपयुक्तता होती म्हणून तिची संघात निवड केली गेली होती. असे असेल तर काही सामने खेळवल्यानंतर महत्त्वाच्या सामन्यातून तिला वगळणे यामागे "राज'कारण असल्याचे मितालीने जाहीरपणे सांगितले तर तिचे काय चुकले?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com