कौन बनेगा सीएम ? (ढिंग टांग!)

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 जून 2018

स्थळ : मातोश्री हाइट्‌स, बांदरा बुद्रुक. 
वेळ : स्फूर्तिदायक. 
प्रसंग : अनवस्था. 
पात्रे : आमचे प्रेरणास्थान मा. श्री. उधोजीसाहेब आणि... आमचे धाकटे प्रेरणास्थान चि. प्रि. विक्रमादित्य. 

विक्रमादित्य : (दार ढकलून बेडरूममध्ये शिरत) हाय देअर बॅब्स... मे आय कम इन? 
उधोजीसाहेब : (झोपाझोपीच्या तयारीत) नोप ! उद्या भेटू. गुडनाइट ! 
विक्रमादित्य : (चातुर्यानं) बाकी तुमचं स्पीच एकदम टॉप क्‍लास झालं हां ! 
उधोजीसाहेब : (चक्रावून) काय टॉप क्‍लास झालं? 
विक्रमादित्य : (तोंडाकडे बोटांचा पाचुंदा नेत) स्पीच ! भाषण ! तडाखेबंद बोललात तुम्ही ! एक घाव दोन तुकडे !! 
उधोजीसाहेब : (किंचित खुशालत) हां हां ते ! तुझंही छान झालं हं का !! 

विक्रमादित्य : (आत्मविश्‍वासाने) आय नो !! बट डॅड... आपण खरंच पुढल्या वेळेला निवडून येणार का? 
उधोजीसाहेब : (डोळे गरागरा फिरवत) म्हंजे काय ! अर्थातच !! 
विक्रमादित्य : (ऍकडमीकली...) कशावरून? 

उधोजीसाहेब : (उसळून) मी सांगतो म्हणून ! ह्या कमळेच्या फेकाफेकीमुळे त्रस्त झालेली जनता आता आपल्यालाच मत देणार ! लिहून ठेव आत्ताच !! स्वबळावर लढू असं ठामपणे सांगतोय, ते काही उगाच नाही !! पावणेदोनशेच्या आसपास सीटा जिंकू आपण !! मंत्रालयावर झेंडा फडकणार म्हंजे फडकणारच ! मी प्रतिज्ञाच घेतली आहे तशी !! 
विक्रमादित्य : (उत्साहात टाळी वाजवत) एक्‍सलंट !! मग माझ्याकडे एक सॉलिड आयडिया आहे ! आपण डिस्कस करू या? 
उधोजीसाहेब : (संयमाने) टुमारो करू...हं...टुमारो ! झोपा आता !! 
विक्रमादित्य : (हाताची घडी घालून) येत्या इलेक्‍शनला आपलं मंत्रालयावर झेंडा फडकवण्याचं नक्‍की आहे ना? 
उधोजीसाहेब : (उसळून) हा काय प्रश्‍न झाला? अलबत ! 
विक्रमादित्य : (कंटिन्यू...) म्हंजे पुढचा सीएम आपला असणार ना? 

उधोजीसाहेब : (दुप्पट उसळून) अर्थात ! माझ्या भाषणात तसं मी क्‍लिअरली सांगितलं आहे ! पुढचं इलेक्‍शन आम्ही जिंकणार, आमचा मुख्यमंत्रीच तिथं खुर्चीत बसणार ! ह्यात आता बदल नाही !! 

विक्रमादित्य : (ओठांचा चंबू करत) कोणाला करायचं मुख्यमंत्री? 
उधोजीसाहेब : (गडबडून) आँ? मी सांगीन तो होईल मुख्यमंत्री !! आणि इतक्‍या लौकर ठरवण्याची काय घाई आहे? 
विक्रमादित्य : (पोक्‍त सुरात) आधी सगळं ठरलेलं असलं म्हंजे बरं ! प्लानिंग इज हाफ सक्‍सेस !! 
उधोजीसाहेब : (गोंधळून जात) नावाचा अजून घोळ आहे रे ! झेंड्याचं नक्‍की आहे... सीएमचंही नक्‍की आहे... पण अजून कोणाला तिथं बसवायचं? हे काही समजत नाही... काहीतरी केलं पाहिजे... केलं पाहिजे काहीतरी... पाहिजे काहीतरी केलं...काय करावं? काय कराव? कॅक्रावं? अं...अं...अं... 

विक्रमादित्य : (काळजीच्या सुरात) बॅब्स... काही होतंय का? कुछ लेते क्‍यूं नहीं? 
उधोजीसाहेब : (भानावर येत) नावबिव कुछ नाही ! मी सांगीन तेच नाव ! कुणीही मुख्यमंत्री म्हणून बसला तरी राज्य माझंच असणार आहे !! कळलं? 

विक्रमादित्य : (आग्रह करत) असं कसं? आधी नाव पाहिजे ! मागल्या खेपेला त्या कमळवाल्यांनीही आधी नाव ठरवलं ! मग झेंडाबिंडा !! मुख्यमंत्री आधी जाहीर करून मग निवडणुका लढवायचा आता नवा ट्रेंड आहे ना? मग वी मस्ट फॉलो दॅट !! 

उधोजीसाहेब : (पुन्हा गोंधळून) तेही खरंच म्हणा ! पण काय घाई आहे? एकदाचा तो झेंडा फडकवला की मग मी सुटलो !! मग मात्र मी आराम करणार आहे !! 
विक्रमादित्य : (एक डेडली पॉज घेत)...तुम्हाला आरामच करायचा आहे ना? मग मी काय म्हंटो... माझं नाव जाहीर करून टाका ना? कशी वाटतेय आयडिया? 

-ब्रिटिश नंदी 

Web Title: Pune Editorial Article on Zenda Flag Dhing Tang