पूरे पचास दिन! (ढिंग टांग)

पूरे पचास दिन! (ढिंग टांग)
पूरे पचास दिन! (ढिंग टांग)

तारीख : २८ डिसेंबर २०१७.
वेळ : घातवेळ...सायंकाळी आठ वाजता!
स्थळ : घरातील टीव्हीसमोरील सोफा.
पात्रे : एकच पात्र...तेही पोचे पडलेले!

 

...अचानक टीव्हीच्या पडद्यावर ती अतिपरिचित शतप्रतिशत मूर्ती प्रकट झाली. निळ्याशार पार्श्‍वभूमीवर ते दिव्य जाकीट झगमगू लागले. अतिममताळूपणे अवघ्या देशाचे अल्प धारिष्ट्य पाहणारा तो दिल्लीचा राणा शुभ्र दाढीत किंचित हसत पुनश्‍च एकवार उद्‌गारला : ‘‘मेरे प्यारे देशवासीयों!.. शवासीयों...वासीयों... सीयों...यों...ओं...ओ...’’ ह्या इको इफेक्‍टमधील अखेरचा ‘ओ’ सोफ्यावरून, याने की आमच्या मुखातून आला होता. चालू भाषेत त्याला किंकाळी म्हणता आले असते...असो.

...पोटात जबर्दस्त वायगोळा आला. मरेस्तवर कोंबडी खाल्ल्यानंतर आम्हाला अनेकदा असा गुबारा धरतो. त्या ग्यासच्या गुबाऱ्याप्रमाणेच आमचा जीवदिखील वर्खाली होतो. भयंकर आर्डओर्डा करूनशेनी आम्ही मग सोडा मागवतो. सोडा मागविला, की कुटुंबीय उगीचच सौंशयाने पाहो लागतात; पण नुस्ता सोडा पिण्यात काय अनैतिक आहे? सोडा प्यायल्यावर थोडे पाय मुडपून जमेल तितक्‍या वज्रासनात बसले, की अंमळ सुटका होत्ये; पण गुबाऱ्यासोबतच आमच्या सत्तावीस इंची छातीतील इवलेसे काळीज बुलेट ट्रेनसारखे धडधडू लागले. पाय लटलटू लागले. देहाच्या कानाकोपऱ्यातून आणि सांदीसपाटीतून घामाच्या धारा वाहू लागल्या. (सांदीसपाटीतून म्हंजे नेमका कुठून कुठून? असा नतद्रष्ट सवाल करणाऱ्यांच्या घरी इन्कम ट्याक्‍सची धाड पडो!) सारांश इतकाच, की ‘मेरे प्यारे देशवासीयों’ ह्या पुकाऱ्याची आम्ही हाय खाल्ली आहे!
हल्ली कोणी ‘मैं तेरा खून पी जाउंगा’ असे म्हणतो, तेव्हा आम्ही नीडरपणे हसतो. जीवाच्या धमक्‍यांचे आम्हाला आताशा काही वाटेनासे झाले आहे; पण ‘मेरे प्यारे देशवासीयों’ हे तीन शब्द ऐकले की आमची पांचावर धारण बसत्ये.

..डोळ्यांसमोर अंधारी येवोन आम्ही क्षण दोन क्षण निपचित पडलो. आमची दीड खणी खोली गरागरा फिरली. टीव्हीच्या पडद्याचा निळा रंग खोलीभर पसरला. छत अचानक खाली कोसळल्याचा भास होवोन आम्ही बहुधा बेशुद्ध पडलो. हे राम! आता काय भोगावयाचे राहिले आहे? ह्या मर्त्य जीवनातील सारी काही दु:खे भोगून झाली नाहीत का? आणखी किती काळ मोक्षाची वाट पाहायची? ह्या चौऱ्यांशीच्या फेऱ्यातून आमची मुक्‍तता कधी? असे नानाविध प्रश्‍न मनात हजार-पाचशेच्या बाद नोटांप्रमाणे गठ्ठे होवोन पडून राहिले. ते आम्ही मोजण्याच्या भानगडीत पडलो नाही...काही काळाने अत्यंत उग्र दर्प नाकात शिरून आम्हास जाग आली.

‘‘आलात का शुद्धीवर?,’’ त्याहूनही उग्र प्रश्‍न आला. जळजळीत स्वरात विचारणा झाली, ‘‘ नेमका सोडाच प्यायलात की मेलं घातलंत त्याच्यात काही? शी काय मेली ती लक्षणं!’’

‘‘मी...मी...मी...कुठे आहे?,’’ आम्ही. ‘मैं कहां हूं’ ह्या फिल्मी डायलॉगचे हे भाषांतर आहे, हे आम्हांस मान्य आहे; परंतु त्या सिच्युएशनला तो डायलॉग फिट्ट बसल्याने आम्ही अचूक चिकटवला.
‘‘ मसणात!,’’ उत्तर आले.
‘‘तरीच घाण वास आला!,’’ खोल आवाजात आम्ही.
‘‘बेशुद्ध पडलात म्हणून तुमचाच पंधरा दिवस न धुतलेला मोजा लावला नाकाला!,’’ तोंडाला पदर लावून दुसऱ्या हातात मेलेला उंदीर पकडल्याप्रमाणे चिमटीत मोजा उचलून ती मूर्तिमंत उग्रता निघून गेली. टीव्हीवरून घोषणा ऐकू येत होती...
‘मेरे प्यारे देशवासीयो...मैंने आपको कहा था की पचास दिन तकलीफ उठाओ, बाद में अच्छे दिन आ जायेंगे. पचास दिन आपने किया हुआ त्याग देखकर मैं आपको शतशत नमन करता हूं. आपका यह त्याग अब रंग लाएगा. आज इसी समय पचास दिन पूरे हो चुके है. आज की मध्यरात्री को ठीक बारा बजे आपके सौ, पचांस, बीस, दस और पांच के टुकडे महज कागज का टुकडा बनकर रह जायेंगे...जीने के लिए आपको पैसों की जरुरतही नहीं पडेगी!!!’
...अरे, आमचा मोजा आणा रे कुणी तरी!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com