मुलाचं नाव ठेवा, नोटबंदी!

मुलाचं नाव ठेवा, नोटबंदी!

नोटाबंदीच्या निर्णयामुळे देशभर रांगांचं, संतापाचं अन्‌ तणावाचं वातावरण असलं, तरी वाळवंटात हिरवळ वाटावी, असे काही हलकेफुलके प्रसंगही घडत आहेत. त्यातले काही सोशल मीडियावर अवतरताना अभिरूची सोडून येताहेत. ‘सोनम गुप्ता बेवफा है’, हा त्यातलाच प्रकार. वर्षभरापूर्वी कोणीतरी मजनूने हा संदेश लिहिलेली दहा रुपयांची नोट ‘व्हायरल’ झाली. बिचाऱ्या सोनम गुप्ता नावाच्या सगळ्या मुली गांगरून गेल्या. मधे बरेच महिने उलटले. आता पुन्हा नोटांवर चर्चा करायचे दिवस आलेत. ‘मै बेवफा नहीं हूँ, बॅंक की कतार में देर हुई - सोनम गुप्ता’ असा संदेश नव्या कोऱ्या गुलाबी रंगाच्या दोन हजारांच्या नोटीवर एका अनामिकाने लिहून टाकला व पुन्हा सोनम गुप्ता हे नाव व्हायरल झालं. अशारीतीने महिलांचा अपमान करणे योग्य नाही, हे खरे; पण इतक्‍या ताणतणावाच्या नोटांबद्दल चिंतेच्या वातावरणात शिळोप्याचं काही तरी हवं, या भावनेचा विचार व्हायला हरकत नाही. 

सोशल मीडियात फारसा चर्चिला गेला नाही, असा आणखी एक रंजक प्रसंग लोकशाहीचे मंदिर म्हणवल्या जाणाऱ्या संसदेलाच साक्षी ठेवून घडला. संसदेच्या दोन्ही सभागृहांत व बाहेर रस्त्यावरही नोटाबंदीवरून रणकंदन सुरू असताना राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालूप्रसाद यांच्या खासदार कन्या डॉ. मिसा भारती दोन महिन्यांच्या बाळाला घेऊन राज्यसभेत आल्या. सोबत त्यांचे पती, बाळाचे बाबा शैलेशकुमारही होते. नसानसांत राजकारण मुरलेल्या लालूंच्या नातवानं वयाच्या दुसऱ्या महिन्यातच संसदेत पदार्पण केलं, असं काही माध्यमांनी म्हटलं. नीरस व रुक्ष राजकीय वातावरण त्या गोंडस आगमनाने एकदम प्रफुल्लीत बनलं. अनेकांनी धावत जाऊन बाळाचं कौतुक करत नाव विचारलं. तेव्हा, अजून नाव ठेवलं नसल्याचं मिसानं सांगितलं. झालं, राजकारण्यांचीही प्रतिभा पाझरली. मिसाला सल्ला दिला गेला, ‘‘बाळाचं नाव ठेवा, नोटबंदी!’’  मुलाचं नाव ‘नोटबंदी’ ठेवण्याचा सल्ला मिळण्यामागं खासदार डॉ. मिसा भारती यांचं स्वत:चंच नाव कारणीभूत आहे. लालूप्रसाद यांच्या या थोरल्या मुलीचा जन्म झाला, तेव्हा ते स्वत: अंतर्गत सुरक्षा कायद्यांतर्गत (मेंटेनन्स ऑफ इंटर्नल सिक्‍युरिटी ॲक्‍ट) म्हणजे ‘मिसा’अंतर्गत तुरुंगात होते. म्हणून मुलीचं नाव त्यांनी मिसा ठेवलं. त्याही आधी बिहारचे पहिले मुख्यमंत्री कृष्णा सिंग यांनी ते तुरुंगात असताना जन्मलेल्या मुलाचं नाव ‘बंदीशंकर’ ठेवलं होतं. 

गेल्या ७ सप्टेंबरला जन्मलेल्या मिसाच्या बाळाशी संबंधित आणखी एक योगायोग आहे. लालूंची सर्वांत धाकटी मुलगी राजलक्ष्मी व मुलायमसिंहांचा चुलत नातू, मैनपुरीचे खासदार तेजप्रताप यांनाही नेमके त्याच दिवशी पुत्ररत्न झाले. मुलायम पणजोबा बनले. आठवत असेल, ब्राझीलमधील संसद सदस्य मॅन्युएला डीएव्हीला लहान मुलीला स्तनपान करत असल्याचे छायाचित्र मध्यंतरी सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. छायाचित्र खरे होते; पण ते संसदेतले नव्हे, तर कम्युनिस्ट पक्षाच्या त्यांच्या घरच्या बैठकीतले होते. या पार्श्‍वभूमीवर दुर्गा व गौरी या दोन मुलींनंतर झालेल्या बाळाला भारतींना संसदेच्या नियमांमुळे मिसा भारती सभागृहात नेऊ शकल्या नाहीत. राजद कार्यालयात शैलेशकुमार त्याला सांभाळत बसले. 

रोज नवे निर्णय, रोज नवे विनोद

नोटाबंदीच्या निर्णयाबद्दल सोशल मीडियावर गंभीर चर्चा फारशी होताना दिसत नाही. त्याऐवजी ना ना प्रकारचे चुटकुले, किस्से, विनोद यांनीच वॉल भरल्या आहेत. या निर्णयाचे एक वैशिष्ट्य म्हणजे अनियंत्रित होऊ पाहणारी परिस्थिती हाताळण्यासाठी अर्थ मंत्रालयाकडून रोज काढले जाणारे फतवे. नोटा बदलण्याची मर्यादा, नव्या नोटीचा रंग, विवाहासाठी वाढीव मर्यादा, सहकारी बॅंकांना बंदी अन्‌ पेट्रोल पंप किंवा अन्य ठिकाणी स्वाइप मशिनवरून रस्त्यावर वाटले जाणारे पैसे, असे रोज नवनवे निर्णय घेतले जाताहेत. असा निर्णय आला रे आला की त्यावर विनोद हा जणू शिरस्ता बनला आहे. रांगांमध्ये ताटकळणारे लाखो लोक त्या विनोदांचा आनंद घेताहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com