अभ्यासू आणि लढवय्या नेता

राजकारण, शेती व सहकाराच्या माध्यमातून ज्या नेत्यांनी नगर जिल्ह्याची ओळख देशपातळीवर नेली, त्यात ज्येष्ठ नेते माजी मंत्री शंकरराव कोल्हे व माजी केंद्रीय मंत्री (कै.) बाळासाहेब विखे पाटील या दोन दिग्गज नेत्यांची नावे आघाडीवर होती.
Shankarrao Kolhe and Sharad Pawar
Shankarrao Kolhe and Sharad PawarSakal
Summary

राजकारण, शेती व सहकाराच्या माध्यमातून ज्या नेत्यांनी नगर जिल्ह्याची ओळख देशपातळीवर नेली, त्यात ज्येष्ठ नेते माजी मंत्री शंकरराव कोल्हे व माजी केंद्रीय मंत्री (कै.) बाळासाहेब विखे पाटील या दोन दिग्गज नेत्यांची नावे आघाडीवर होती.

राजकारण, शेती व सहकाराच्या माध्यमातून ज्या नेत्यांनी नगर जिल्ह्याची ओळख देशपातळीवर नेली, त्यात ज्येष्ठ नेते माजी मंत्री शंकरराव कोल्हे व माजी केंद्रीय मंत्री (कै.) बाळासाहेब विखे पाटील या दोन दिग्गज नेत्यांची नावे आघाडीवर होती. सहकारी साखर कारखानदारी आणि शैक्षणिक क्षेत्रात या दोन्ही नेत्यांनी केलेले काम राज्याला नव्हे तर देशाला मार्गदर्शक ठरले. कोल्हे साहेब म्हणून ते सर्वत्र परिचित होते. मध्यंतरी खास वेळ काढून त्यांची भेट घ्यायला संजीवनी कारखान्यावर गेलो. वयाच्या 93 व्या वर्षी त्यांचा उत्साह आणि उमेद पाहून थक्क झालो. सोबत सहभोजन घ्यायचे ठरले होते. त्यासाठी तारीख निश्चित करायची होती. मात्र, त्यापूर्वीच ते देवाघरी गेले.

राजकारणाचे संदर्भ नेहमी बदलत असतात. त्यांच्यात आणि आमच्यात कधी संघर्षाचे प्रसंग आले तर कधी समेटाचे राजकारण फलदायी ठरले. कोणे एकेकाळी आमचे गट आणि पक्ष वेगळे असले तरी माझे वडील कै. बाळासाहेब विखे पाटील आणि कै. शंकरराव कोल्हे या दोन्ही दिग्गज नेत्यांचे व्यक्तिगत संबंध अतिशय सलोख्याचे होते. दोघांची अनेकदा भेट व्हायची, झकास गप्पा रंगायच्या. आता तर आम्ही दोन्ही घराणी भाजपात आहोत.

महाराष्ट्रातील सहकारी साखर कारखानदारीचे जाणकार अशी कोल्हे साहेबांची ओळख होती. राज्यभरातील सहकारी साखर कारखान्यांचे धुरीण त्यांच्याकडे सल्ला घेण्यासाठी येत असत. गोदावरी कालव्यांचा बिकट झालेला पाणीप्रश्न सोडविण्यासाठी त्यांनी पोटतिडकीने प्रयत्न केले. गोदावरी कालव्यांची पाण्याची तूट भरून काढण्यासाठी सह्याद्रीच्या कुशीत वरच्या बाजूला छोटी मोठी धरणे बांधण्यात आली. ती मार्गी लावण्यासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला. गोदावरी खो-याचा पाणीप्रश्न कायम स्वरूपी सोडविण्यासाठी पश्चिमेचे पाणी पुर्वेला वळवावे लागेल. त्यासाठी नगर, नाशिक व मराठवाड्यातील नेत्यांना एकत्र येऊन भूमिका घ्यावी लागेल. हे सुत्र माजी खासदार बाळासाहेब विखे पाटील व कै.शंकरराव कोल्हे यांनी मांडले. मी आजही भूमिका पुढे घेऊन चाललो आहे.

नगर जिल्ह्याच्या जडणघडणीत ज्या नेत्यांचा मोलाचा वाटा होता त्यात कोल्हे साहेबांचे नाव आघाडीवर होते. सहकारी साखर कारखान्यांनी उपपदार्थ निर्मितीकडे वळायला हवे अशी आग्रही भूमिका ते मांडत. त्यांच्या कारखान्यावर त्यांनी जवळपास पंधरा सोळा उपपदार्थ निर्मितीचे प्लॅन्ट कार्यान्वित केले. शैक्षणिक क्षेत्रातही त्यांचे योगदान मोठे राहिले. जिल्हा सहकारी बॅंक, जिल्हा परिषद यापासून ते विधानसभा निवडणुकीपर्यंत त्यांच्या सोबत व्यक्तीशः माझा अनेकदा संबंध व संपर्क असायचा. या वयातील त्यांची ऊर्जा मला नेहमी उत्साह द्यायची. आपल्या बहात्तर वर्षांच्या प्रदीर्घ कारकीर्दीत त्यांनी राजकीय आणि सामाजिक जीवनात स्वतःचे असे वेगळे स्थान निर्माण केले. त्यांची वाटचाल मला नेहमीच मार्गदर्शक ठरली. मला वडिलांच्या स्थानी असलेला एक खंबीर आणि लढवय्या नेता आपण गमावला याचे दुःख वाटते.

(लेखक आमदार आहेत. शब्दांकनः सतीश वैजापूरकर)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com