‘अमेरिकी नक्षत्रां’चे देणे

rahul gadpale
rahul gadpale

भारताचा विकास होतोय, याबाबत कुणीही आता शंका घेण्याचे कारण नाही. तसे वाटत असेल तर शंका घेणाऱ्यांच्या तोंडावर अमेरिकी कागदांचा अहवाल फेकण्यात येईल आणि ट्रम्प यांनी केलेल्या भारतस्तुतीच्या भाषणाचा दाखलाही दिला जाईल. त्यामुळे आता उगाच पेट्रोल- डिझेलच्या भाववाढीवरून गदारोळ करण्याची गरज नाही. जरा खिसा तपासा तुम्हाला लक्षात येईल, आपला विकास होतोय...!

देशाच्या राजकारणावर ‘राफेल’च्या तोफगोळ्यांचे आक्रमण होत असताना अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांकडून भारतावर कौतुकाचा वर्षाव होतो आहे. काही दिवसांपूर्वी अमेरिकेने प्रसिद्ध केलेल्या एका अहवालात भारताने मोठ्या प्रमाणात दारिद्य्ररेषेखालील लोकांना मध्यमवर्गीयांच्या रांगेत आणून त्यांचे जीवनमान सुधारले आहे, असा उल्लेख करीत भारताच्या कामगिरीची दखल घेतली आहे. संयुक्‍त राष्ट्रांच्या आमसभेच्या ७३व्या सत्रात बोलताना अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताच्या या कामगिरीचा उल्लेख करतानाच जागतिकीकरणाच्या विचारांना मूठमाती दिली. त्यांच्या स्थलांतरासंबंधीच्या अमेरिकी धोरणाचा इतर देशांनीही आदर करावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्‍त केली. जागतिकीकरणाचा विरोध करीत देशभक्‍तीची जपमाळ पुढे केल्यामुळे अमेरिकेवरदेखील आता मोदींचा करिष्मा चालू लागल्याची चर्चा सुरू व्हायला वेळ लागणार नाही. त्यामुळे आता उगाच पेट्रोलची भाववाढ, रुपयाची घसरण, बेरोजगारी, आरक्षणादी मुद्यांवरून चर्चा आणि राजकारण करण्याच्या प्रपंचातून बाहेर येत आहे ती परिस्थिती समजून घेण्याची खरी गरज आहे.
 जागतिकीकरणाच्या नावाखाली सरकारी विकासाचे वारे पालथे घालू पाहणाऱ्या विरोधकांची ‘राफेली’ गगनभरारी जमिनीवर उतरवण्यासाठीच की काय कुणास ठाऊक? पण ट्रम्प यांनी थेट संयुक्‍त राष्ट्रांच्या आमसभेत भारताच्या श्रीमंतीची स्तुती केल्याने प्रत्येक भारतीयाचा ऊर अभिमानाने भरून आणेल. चीनसारख्या बलाढ्य शक्‍तीला व्यापार असमतोलाच्या मुद्यावरून चिमटे काढतानाच, भारताच्या प्रगतीचे मात्र असे कौतुक; अन्‌ तेही जगभरातील सर्वात मोठ्या व्यासपीठावर होणे, हे सरकारच्या कामगिरीवर चिखलफेक करणाऱ्यांना ताळ्यावर आणेल, असे दिसते. आता थेट अमेरिकेने प्रशस्तीपत्र दिल्यावर कुणीही आमच्या मानगुटीवर ‘स्लमडॉग’ असे लिहू शकणार नाही. उलट विकासाच्या गंगेत १५ लाख रुपयांच्या प्रतीक्षेत असलेल्या सर्वसामान्यांना तारण्यासाठी आता ‘कौन बनेगा करोडपती’ हाच पुढचा राष्ट्रीय विकास कार्यक्रम म्हणून स्वीकारावा लागेल. देशाचा विकास होतोय याबाबत कुणीही आता शंका घेण्याचे कारण नाही. तसे वाटत असेल तर शंका घेणाऱ्यांच्या तोंडावर गुळगुळीत आणि चकचकीत अमेरिकी कागदांचा अहवाल फेकण्यात येईल. भारताच्या श्रीमंतीचे एवढे मोठे प्रशस्तिपत्र कुठेच मिळणार नाही, त्यामुळे आता उगाच पेट्रोल- डिझेलच्या भाववाढीवरून गदारोळ करण्याची गरज नाही. जरा खिसा तपासा तुम्हाला लक्षात येईल, आपला विकास होतोय...!

ट्रम्प यांनी अनेक अंगाने जागतिकीकरणाच्या प्रक्रियेचा उल्लेख करीत जागतिकीकरणाच्या विचारांपासून अमेरिका फारकत घेत असल्याचे जाहीर केले. प्रत्येक देशाची स्वतःच्या प्रगतीची एक विशिष्ट दृष्टी आहे आणि आशादायी भविष्याचा विचार करीत ते देश त्यांच्या स्वप्नांचा पाठलाग करीत आहेत आणि या अशा देशांच्या ‘सुंदर नक्षत्रां’मुळे जग श्रीमंत होतंय आणि माणुसकी सुधारतेय, असे त्यांचे म्हणणे आहे. भारतात मात्र बहुतेकांना रातांधळेपणाचा त्रास असल्यामुळे श्रीमंती आणि माणुसकी दोन्ही गोष्टी दिसत नाहीत. संयुक्‍त राष्ट्रांच्या आमसभेकरिता उपस्थित असलेल्या जगभरातून आलेल्या पुढाऱ्यांना बहुतेक अमेरिकी नक्षत्रांचे देणे दिसले नसावे. त्यामुळेच की काय, ‘गेल्या दोन वर्षांमध्ये ट्रम्प प्रशासनाने जे साध्य केले ते आतापर्यंतच्या एकाही राष्ट्राध्यक्षाला करणे शक्‍य झाले नाही’, असे ट्रम्प यांनी म्हणताच सभागृहात मंद हास्याची लहर उमटली. ट्रम्प यांना अशा प्रतिक्रियेची अपेक्षा नव्हती. त्यामुळे साहजिकच त्यांच्या देहबोलीतून त्यांना वाटलेले आश्‍चर्य लपू शकले नाही. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ट्रम्प यांची जवळीक आपण त्या दोघांच्या गळाभेटीच्या छायाचित्रांवरून पाहू शकतो. त्यामुळेच मोदींच्या सहवासाचा ट्रम्प यांच्यावर बराच परिणाम झालेला जाणवतो. सर्वत्र जागतिकीकरणाचे वारे वाहत असताना ट्रम्प यांना अचानकपणे देशप्रेमाचे भरते यावे, यावरून परिस्थितीचा अंदाज बांधणे शक्‍य आहे. म्हणजे काय तर मोदींच्या भक्तिमार्गाला देशाच्या सीमारेषा आता बांधून ठेवू शकत नाहीत.

भारत हा एक स्वतंत्र समाज आहे, असे ट्रम्प म्हणाले. त्यांच्या या वाक्‍याला धर्माची जोड नव्हती. मात्र भाषणावर व्यक्‍त होणाऱ्या प्रतिक्रियांमध्ये याच वाक्‍याचे अनेक ठिकाणी संदर्भासहीत स्पष्टीकरण करण्यात आले, ते म्हणजे ‘भारत हा स्वतंत्र समाज आहे तो हिंदुंमुळे आणि सेक्‍युलर या देशाच्या संस्कृतीची वाट लावताहेत’. बघा ट्रम्प यांच्या मनातलेदेखील आपण किती उत्तम वाचू शकतो. वाक्‍यांचा गर्भितार्थ काढणाऱ्यांचा हल्ली आपल्याकडे सुकाळच आलाय तसा. गेल्या साडेचार वर्षांमध्ये भारताने काय प्रगती केली आहे, याचा आलेख कितीतरी वेळा प्रधानसेवकांनी भारतीयांना वाचून दाखविलाच आहे. पण त्यांना तो तसा समजला नाही; किंबहुना तो समजण्याइतकी वैचारिक प्रगल्भता नसल्यामुळेही अडचण झाली असण्याची शक्‍यता आहे. आपण पुढे जातोय यात शंका घेण्याचे कारण नाही; कारण पुढे जाण्याचा वेगच इतका आहे की, त्यामुळे परिसरातला विकास नजरेच्या टप्प्यात दिसणे कठीणच. पण त्यामुळे विकास होतच नाहीये, असे म्हणणेदेखील चुकीचे ठरते. संयुक्‍त राष्ट्रसंघाच्या अहवालानुसार गेल्या दहा वर्षांमध्ये देशातील गरिबांना मध्यमवर्गीयांच्या यादीत आणून ठेवण्याकरिता भारताने कसोशीचे प्रयत्न केले आहेत. २००५-०६ आणि २०१५-१६ या दहा वर्षांच्या कालखंडात २७ कोटी १० लाख लोकांना गरिबीतून बाहेर काढण्यात आले आहे. त्यामुळे देशाचा गरिबीचा दर हा ५५ टक्‍क्‍यांवरून २८ टक्‍क्‍यांवर आलेला आहे.

भारताचे गुणगान करताना कमालीचे औत्सुक्‍य दाखवणाऱ्या ट्रम्प यांनी चीनबाबत मात्र कमालीची नाराजी व्यक्‍त केली. ते म्हणाले, ‘‘मला माझे मित्र शी जिनपिंग यांच्याबद्दल कमालीचा आदर आणि आकर्षण आहे; मात्र व्यापारातला असमतोल आम्ही अमेरिकेत कदापि सहन करणार नाही. व्यापारी धोरणावरून चीनवर वार करतानाच ट्रम्प यांनी जागतिकीकरणाच्या विचारांना तिलांजली देत देशभक्‍तीचा नारा दिला. हा नारा देताना कदाचित त्यांच्या मनात अमेरिकेतल्या मध्यावधी निवडणुकांचे विचार घोंघावत असावेत.चार वर्षांपूर्वी देशात सत्ताबदल झाला त्या वेळी देशाने अनेक स्वप्न पाहिली होती. प्रत्येकाला किमान लखपती करण्याच्या जुमल्यानेच देशात सत्तापरिवर्तन झाले, असा राजकीय धुरिणांचा अंदाज होता. काही अंशी तो खरा मानायलादेखील हरकत नाही. विकासाच्या प्रक्रियेत अडचणी या येतातच, त्यामुळे तशा त्या भारतालादेखील आल्या असतील; मात्र विकास होतोय का? हे शोधण्यासाठी आता मिणमिणत्या दिव्याची गरज लागणार नाही. भारताच्या विकासाचा आलेख रोज मांडला जातोय. अलीकडेच विकासदराचे जाहीर झालेले नवे आकडेदेखील हेच सांगताहेत. शेअर बाजारदेखील विकासाच्या गगनभेदी आरोळ्या देतोय. सर्वकाही आलबेल आहे. हवा आहे तो हे घडतंय याविषयीचा आपला आत्मविश्‍वास. तिथेच आपण कमी पडतोय कदाचित...

विकासगंगेतल्या नक्षत्रांमध्ये फेरफटका मारतानाच वाचनात आलेली एक गोष्ट आठवली... सरकार प्रचार करीत होते तसे तेथे काही नव्हते आणि जे होते त्याविषयी काही बोलता येत नव्हते. तेव्हा एका गृहस्थाला वाटले, आपल्यात काही व्यंग निर्माण झाले असावे म्हणून तो एका डॉक्‍टरकडे गेला आणि म्हणाला, माझ्या कानांचे आणि डोळ्यांचे एकदम ऑपरेशन करा. डॉक्‍टरने विचारले, कान आणि डोळे यांचे ऑपरेशन कशासाठी? हा गृहस्थ म्हणाला, मी एकतो तसे मला काही दिसत नाही आणि मला जे दिसते, त्याविषयी मला ऐकविले जात नाही. संयुक्‍त राष्ट्रांच्या आमसभेत हसणाऱ्यांनाही अशीच काही अडचणी असावी बहुधा. असो. अशा प्रकारे या सभेत अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांवर हसण्याचीदेखील ही पहिलीच वेळ होती म्हणे...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com