रेल्वेची 'पाकीटमारी' !

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 9 सप्टेंबर 2016

सुरेश प्रभू यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या भारतीय रेल्वेच्या घोडदौडीच्या कहाण्या चवीने चघळल्या जात असतानाच, आता "राजधानी‘, "दुरान्तो‘ आणि "शताब्दी‘ या रेल्वेच्या प्रसिद्ध आणि प्रवाशांसाठी सोयीच्या अशा गाड्यांच्या दरात बुकिंगनुसार दहा टक्‍के या प्रमाणात भाडेवाढ करण्याचा निर्णय तातडीने अमलात येत आहे. एकीकडे प्रवासातील कोणत्याही अडचणीसंबंधात, उदा. : अचानक उद्‌भवलेला गंभीर आजार वा लहान बाळांना हवे असलेले घोटभर दूध यासंदर्भात साधे एक ट्‌विट प्रवाशांनी केल्यास, त्यांच्या अडचणी सोडविण्यात प्रभू अत्यंत तत्पर असतात.

सुरेश प्रभू यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या भारतीय रेल्वेच्या घोडदौडीच्या कहाण्या चवीने चघळल्या जात असतानाच, आता "राजधानी‘, "दुरान्तो‘ आणि "शताब्दी‘ या रेल्वेच्या प्रसिद्ध आणि प्रवाशांसाठी सोयीच्या अशा गाड्यांच्या दरात बुकिंगनुसार दहा टक्‍के या प्रमाणात भाडेवाढ करण्याचा निर्णय तातडीने अमलात येत आहे. एकीकडे प्रवासातील कोणत्याही अडचणीसंबंधात, उदा. : अचानक उद्‌भवलेला गंभीर आजार वा लहान बाळांना हवे असलेले घोटभर दूध यासंदर्भात साधे एक ट्‌विट प्रवाशांनी केल्यास, त्यांच्या अडचणी सोडविण्यात प्रभू अत्यंत तत्पर असतात. अशा अनेक लहानग्यांच्या "खान-पान सेवे‘ची व्यवस्था तातडीने करून त्यांनी अनेकांचा दुवा घेतला आहे. मात्र आता त्यांना अचानक "बुकिंग‘ची नवी पद्धत रास्त वाटू लागली असल्याने, सर्वसामान्यांना या गाड्यांसाठी किमान 30 ते 40 टक्‍के जादा पैसे मोजावे लागणार आहेत. 

भाडेवाढीच्या या आगळ्या तंत्राचा फटका सर्वसाधारणपणे मध्यमवर्गीयांनाच बसणार आहे; कारण वातानुकूलित प्रथम श्रेणी व एक्‍झिक्‍युटिव्ह चेअरकार वगळता अन्य वर्गांतून प्रवास करणाऱ्यांनाच या नव्या पद्धतीने बुकिंग करावे लागणार आहे. म्हणजेच वातानुकूलित प्रथमश्रेणी व एक्‍झिक्‍युटिव्ह चेअरकारसाठी भरमसाट दराने पैसे मोजणाऱ्यांचे भाडे कायमच राहणार आहे. खरे तर हे भाडेवाढीचे कारण जितके अनाकलनीय आहे, तितकेच त्याचे तंत्रही समजण्यास कठीण आहे! दहा टक्‍के बर्थ बुक झाले की भाडे दहा टक्‍क्‍यांनी वाढणार, असे हे गणित आहे आणि बेस फेअरच्या दीडपट इतकी वाढ या तंत्रानुसार होणार आहे. म्हणजेच बुकिंगला उशीर होईल, तसे भाडे वाढत जाईल. शिवाय, गाड्यांना गर्दी नसली व गाडी निम्मी रिकामी असली म्हणजेच मुबलक बर्थ उपलब्ध असले, तरी केवळ उशिरा बुकिंग केले म्हणून 30-40 टक्‍के जादा दराची शिक्षा सहन करावी लागेल. 

अलीकडेच रेल्वेने विमान प्रवाशांना सवलतीच्या दराने "राजधानी‘चा प्रवास आयत्या वेळी उपलब्ध करून देण्याची घोषणा केली होती. त्यानंतर आता वातानुकूलित आणि एक्‍झिक्‍युटिव्ह चेअरकार प्रवाशांना बुकिंगनुसार होणाऱ्या भाडेवाढीतून वगळण्यात आले आहे. याचा अर्थ स्पष्ट आहे. "ये भारतीय जनता की संपत्ती है!‘ असे ब्रीदवाक्‍य असलेल्या रेल्वेच्या संपत्तीत वाढ करण्यासाठी मध्यमवर्गीयांची "पाकीटमारी‘ करण्याचेच रेल्वेमंत्र्यांनी ठरवलेले दिसते.

Web Title: Railway's decision to apply surge pricing draws criticism