पावसाने दिली उभारी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 5 जुलै 2016

मागील तीन दिवसांपासून राज्यात सर्वदूर पाऊस पडत आहे. तीन-चार वर्षांपासून अशा प्रकारचा दमदार पाऊस अनुभवला नसल्याने राज्यातील शेतकरीवर्गात सध्या तरी चैतन्याचे वातावरण आहे. 

मागील तीन दिवसांपासून राज्यात सर्वदूर पाऊस पडत आहे. तीन-चार वर्षांपासून अशा प्रकारचा दमदार पाऊस अनुभवला नसल्याने राज्यातील शेतकरीवर्गात सध्या तरी चैतन्याचे वातावरण आहे. 

 
या वर्षी बहुतांश हवामान विभागाने वेळेवर आणि चांगल्या पावसाचे अंदाज वर्तवूनही अर्धा जून कोरडा गेला. त्यामुळे शेतकऱ्यांसह सर्वांचीच चिंता वाढली होती. राज्यात सात जूनला दाखल होणारा मॉन्सून या वर्षी अकरा दिवस उशिराने म्हणजे 18 जूनला दाखल झाला. थोड्या उशिराने येणाऱ्या मॉन्सूनने या वर्षी दिशा बदलत कोकणाऐवजी विदर्भातून राज्यात प्रवेश करून सर्वांनाच आश्‍चर्याचा धक्का दिला. दोनच दिवसांत मॉन्सूनने राज्य व्यापले. मॉन्सूनच्या आगमनानंतर विदर्भ आणि मराठवाड्याच्या बहुतांश भागात, तर संपूर्ण कोकणात अधूनमधून सरीवर सरी कोसळत होत्या. त्यामुळे मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांनी पेरण्या उरकून घेतल्या होत्या, तर कोकणातही भात लागवडीची लगबग सुरू झाली. मात्र, खानदेश आणि मध्य महाराष्ट्राकडे जून उलटून गेला, तरी पावसाने पाठ फिरविली होती. त्यामुळे हा भाग पावसाच्या प्रतीक्षेत होता.

शहरांमध्ये पिण्याच्या पाण्याचे, तर ग्रामीण भागात खरिपांच्या पेरणीचे संकट कायम होते. नेमक्‍या अशा वेळी मागील तीन दिवसांपासून राज्यभर मॉन्सूनने दमदार हजेरी लावल्याने या भागालाही दिलासा मिळाला आहे. या पावसाने विदर्भ, मराठवाड्यातील पेरणी झालेल्या; परंतु पावसाची गरज असलेल्या पिकांना संजीवनी देण्याचे काम केले. या भागात कोळपणी, निंदणी अशा आंतरमशागतींच्या कामाला शेतकरी सरसावला आहे. तर पुणे, नगर, नाशिक, कोल्हापूर, नंदुरबार, धुळे, जळगाव या भागांत पेरणीच्या कामांना आता वेग आला आहे. बहुतांश भागातील धरणांच्या पाणीपातळीत वाढ दिसून येत आहे. त्यामुळे शहरांवरील पाणीकपातीचे संकट तूर्त तरी टळले आहे. असे असले तरी खानदेश, पूर्व विदर्भ, मध्य महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या दुष्काळी भागात अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. पावसाचे अजून तीन महिने शिल्लक आहेत. त्यापैकी जुलैमध्ये चांगला पावसाचा अंदाज असला, तरी मोठ्या खंडाची शक्‍यताही काही हवामानतज्ज्ञांनी वर्तविली आहे. येथून पुढील चांगल्या पावसावरच खरीप आणि रब्बी या दोन हंगामांची भिस्त अवलंबून राहणार आहे. सुरवात तर चांगली झाली, शेवटही गोड होईल अशी आशा करूया...! 

Web Title: rain weather