जंगल पर्यटनाची मंगल शैली

संरक्षित जंगलात व परिसरात राहणाऱ्या लोकांसमोर वनसंरक्षण कायद्यातील तरतुदीनुसार रोजगार निर्मितीचे मर्यादित मार्ग उपलब्ध आहेत.
Rajiv Pandit writes Eco-tourism Do safe jungle tourism Forest Department
Rajiv Pandit writes Eco-tourism Do safe jungle tourism Forest Departmentsakal
Summary

संरक्षित जंगलात व परिसरात राहणाऱ्या लोकांसमोर वनसंरक्षण कायद्यातील तरतुदीनुसार रोजगार निर्मितीचे मर्यादित मार्ग उपलब्ध आहेत.

- राजीव पंडित

कर्ब मुक्तीसाठी आणि वनांवरील ताण कमी करण्यासाठी जंगल पर्यटन बंद करावे, असे काही जणांचे म्हणणे आहे. पण हा चुकीचा नि टोकाचा आग्रह आहे. मात्र असे पर्यटन करताना काही पथ्ये जरूर पाळली पाहिजेत. संरक्षित जंगलात व परिसरात राहणाऱ्या लोकांसमोर वनसंरक्षण कायद्यातील तरतुदीनुसार रोजगार निर्मितीचे मर्यादित मार्ग उपलब्ध आहेत. जंगलात किती लोकांनी जायचे, किती वेळ जायचे, याबाबत वनखात्याने नियम बनवले आहेत. जंगल पर्यटनातून स्थानिक लोकांना रोजगार उपलब्ध होतो. त्यामुळे जंगलातील पर्यटन जरूर करावे. प्रश्न आहे तो ते कसे करायचे हाच. त्यादृष्टीने काही सूचना.

वनपर्यटनाला ‘इको टुरिझम’ असे संबोधले जाते. निसर्गात केल्या जाणाऱ्या या पर्यटनाची चार मार्गदर्शक तत्त्वे आहेत. (१) पर्यटनातून ज्ञान मिळाले पाहिजे (२) स्थानिक लोकांना रोजगार मिळाला पाहिजे (३) याचा निसर्गावर कमीत कमी ताण असायला हवा व (४) पर्यटकांनी स्थानिक लोकांच्या संस्कृतीचा व त्यांच्या चालीरीतींचा आदर केला पाहिजे. ही मार्गदर्शक तत्त्वे नीट समजून घेऊन जंगल पर्यटन केले तर कर्बवाढीची समस्या निर्माण होणार नाही. पण हल्ली तसे होताना दिसत नाही. ‘कंफर्ट’ हा हल्लीच्या पर्यटनाचा परवलीचा शब्द बनला आहे. प्रवासासाठी वापरल्या जाणाऱ्या वाहनापासून ते मुक्कामाच्या खोलीपर्यंत प्रत्येक गोष्टीत विचार केला पाहिजे. साधारण वीस वर्षांपूर्वी हॉटेलच्या एका खोलीत चार जण सहज राहत. डॉर्मेटरीतही राहण्याची तयारी असे. आता एका खोलीत एकाची व्यवस्था हवी,अशी मागणी करणाऱ्यांची संख्या वाढते आहे. जंगल सफारीत सकाळ व सायंकाळ आपण जंगलात असतो. दुपारचा थोडा वेळ व रात्री झोपायला हॉटेलमधे असतो. लडाख किंवा सिक्कीम किंवा रण ऑफ कच्छ यासारख्या ठिकाणी तर दिवसभर निसर्ग निरीक्षणासाठी भटकंती करावी लागते. अशा परिस्थितीत स्विमिंगपूल, जीम, स्पा वगैरे सुविधा असलेली हॉटेल का निवडली जातात? मुळात त्यांचा वापर करायला वेळ मिळत नाही.अशा तारांकित हॉटेलमधील सुविधा चालवण्यासाठी मोठ्या प्रमाणात स्थानिक नैसर्गिक संसाधनांचा वापर केला जातो. अशा हॉटेलमधे राहण्याचा अट्टाहास सोडून छोटी हॉटेल, स्थानिक लोकांनी चालवलेले ‘होम स्टे’ यात उतरलो, तर तेथील लोकांना उत्पन्न मिळेल, शिवाय नैसर्गिक संसाधनांची उधळपट्टी थांबेल. फक्त या हॉटेलमधील स्वच्छता नीट आहे ना, हे तपासून बघावे लागेल.

टिश्यू पेपरचा वापर किती प्रमाणात करायचा, याचेही भान हवे. टिश्यू पेपरनिर्मितीसाठी मोठ्या प्रमाणात पाणी व वृक्षांचा वापर होतो. हात नळाखाली पाण्याने धुणे व हात पुसण्यासाठी रुमाल बाळगणे येवढा सोपा उपाय आहे. आरोग्याच्या दृष्टीने बाटलीबंद मिनरल वॉटरकडे अनेकांचा कल असतो. यात जाहिरातींचा मोठा हातभार आहे. एकतर मिनरल वॉटर बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणात नैसर्गिक स्रोतांमधून पाणी उपसावे लागते. शिवाय एकदा बाटलीतील पाणी पिऊन संपले की ती बाटली कचऱ्यात जाते. यातून प्लॅस्टिक कचरा वाढतो. त्यामुळे घरूनच पाण्याची बाटली नेणे सोईस्कर. पर्यावरणीय जीवनशैलीचा दैनंदिन प्रत्यय अशा पर्यटनात यायला हवा. हॉटेलमध्ये शॉवरच्या पाण्याखाली खूप वेळ उभे राहणे टाळले पाहिजे. हॉटेलच्या खोलीतून बाहेर पडताना एसी, पंखा व विजेचे दिवे बंद केले आहेत ना, याची खात्री करावी. पर्यावरणाविषयी जाणीव आणि संवेदनशीलता यांची नितांत गरज आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com