एकतेचा पाईक 

रजनीश जोशी 
रविवार, 19 ऑगस्ट 2018

सोलापूरसारख्या एका अर्थाने आडवळणी असलेल्या गावातून संपूर्ण भारतासह पाकिस्तान, नेपाळमध्ये जाऊन सामाजिक समता, हिंदू-मुस्लिम ऐक्‍याची जोपासना करण्यासाठी संघर्ष करणारे व्यक्तिमत्त्व म्हणून प्रा. फक्रुद्दीन बेन्नूर यांची सर्वदूर ओळख होती. मुस्लिम समाजात सुधारणांची गरज असल्याचे त्यांनी वेळोवेळी सांगितले.

सोलापूरसारख्या एका अर्थाने आडवळणी असलेल्या गावातून संपूर्ण भारतासह पाकिस्तान, नेपाळमध्ये जाऊन सामाजिक समता, हिंदू-मुस्लिम ऐक्‍याची जोपासना करण्यासाठी संघर्ष करणारे व्यक्तिमत्त्व म्हणून प्रा. फक्रुद्दीन बेन्नूर यांची सर्वदूर ओळख होती. मुस्लिम समाजात सुधारणांची गरज असल्याचे त्यांनी वेळोवेळी सांगितले.

त्यांनी इतिहासाचे केवळ अध्यापनच केले नाही, तर आपल्या अभ्यासपूर्ण विवेचनाने समाज ढवळून टाकण्याचे काम केले. डॉ. असगर अली इंजिनियर यांच्यासमवेत एकतेची चळवळ पुढे नेण्याचे काम केले. त्यासाठी दौरे केले. अशा वेळी डॉ. इंजिनियर यांच्यावर झालेल्या हल्ल्याने डगमगून न जाता आपला विचार अधिक प्रभावीपणे समाजापुढे मांडण्याचे काम केले. कोणत्याही धर्मातील कट्टरतावादाला त्यांचा विरोध होता. त्यामुळे स्थानिक कट्टरतावाद्यांच्या रोषाला त्यांना सामोरे जावे लागले होते. ते एकतेचे पाईक होते. दलित चळवळीतही त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला. मुस्लिम समाजाची स्थिती-गती ध्यानात घेऊन आरक्षणाच्या मागणीसाठी त्यांनी "महाराष्ट्रीय मुस्लिम अधिकार आंदोलन' सुरू केले. विषमतेचे निर्मूलन झाले पाहिजे, या विचाराने ते झपाटल्यासारखे काम करीत होते. चौफेर लेखन करीत होते.

महाराष्ट्रातील बहुतेक सर्व नियतकालिकांमधून त्यांनी लेख लिहिले. "राष्ट्रवाद, साम्राज्यवाद आणि इस्लाम,' "मुस्लिम राजकीय विचारवंत आणि राष्ट्रवाद' अशा पुस्तकांमधून त्यांनी भारतीय मानसिकतेचीच चिकित्सा केली. राष्ट्रवादाचे विश्‍लेषण करताना त्याचे व्यापकत्व त्यांनी अधोरेखित केले. धर्माधारित राष्ट्रवादाचे घातक परिणाम दाखवून दिले. साहित्य चळवळीतही ते अग्रेसर होते. त्यांचा "गुलमोहोर' हा काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेच. पण, सूफी संप्रदायाचे वाङ्‌मय त्यांनी अभ्यासले होते. अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य परिषदेची स्थापना त्यांनी केली आणि तिच्या वतीने मुस्लिम मराठी साहित्य संमेलनेही भरवली. भारताच्या गंगाजमनी संस्कृतीवर त्यांचे प्रेम होते.

संकुचित विचारसरणीच्या लोकांनी या देशातील सौहार्द संपविण्याचा प्रयत्न केला आहे. पण, माणसामाणसांतील प्रेम कुणाच्या चिथावणीने संपत नसते, यावर त्यांचा विश्‍वास होता. हे प्रेम, हे सौहार्द उजागर करण्यासाठी प्रा. बेन्नूर यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. व्यक्तिगत पातळीवर संयमी आणि मितभाषी वाटणारे प्रा. बेन्नूर मित्रांच्या संगतीत खुलत. त्यांच्या "कुदरत' या निवासस्थानी अशा मैफली होत. त्यात त्यांचे हिंदू-मुस्लिम मित्र जिव्हाळ्याने सहभागी होत. काही जातीसमूह आणि विविध धर्मांचे काही लोक राजकीय पाठिंब्याने समाजव्यवस्थेला छेद देण्याची मानसिकता जोपासत असताना प्रा. बेन्नूर यांच्यासारखा समाजहितैषी, एकतावादी आपल्यातून जाणे, ही मोठी हानी आहे.
 

Web Title: rajnish joshi writes about fakruddin bennur