पुन्हा कडाडो ‘आसूड’

राखी रवींद्र रासकर
गुरुवार, 28 नोव्हेंबर 2019

समाजक्रांतीबरोबरच कृषिक्रांतीचे जनक असलेल्या महात्मा जोतिराव फुले यांचा आज स्मृतिदिन. त्यानिमित्त त्यांच्या शेतीविषयक विचारांना उजाळा.

शेतकरी समृद्ध होण्यासाठी कृषिक्रांतीचे विचार मांडणारे जोतिराव फुले या देशातील एक प्रखर समाजसुधारक. त्यांनी लिहिलेला ‘शेतकऱ्यांचा असूड’ भारतीय शेतकऱ्यांची दयनीय अवस्था समाजापुढे आणणारा पहिलाच ग्रंथ! तो आजही प्रस्तुत ठरावा, हे खरे म्हणजे शेतीपुढचे प्रश्‍न सोडविण्यातील आपल्या अपयशाचा परिपाक म्हणावा लागेल. सव्वाशे वर्षे उलटली तरीही शेतकऱ्यांची अवस्था दयनीय आहे. कधी अवकाळी, तर कधी दुष्काळी अशा अस्मानी संकटात संघर्ष करणारा शेतकरी अनास्थेमुळे पुरता भुईसपाट झाला आहे. फुले यांनी ‘शेतकऱ्याचा असूड’मधून शेतकऱ्यांच्या हालअपेष्टांचे विदारक चित्र समाजापुढे आणले. तत्कालीन परकी राजवटीवर आणि प्रस्थापित व्यवस्थेवर कोरडे ओढले. 

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

जागतिकीकरणाच्या काळात औद्योगिक उत्पादन करणाऱ्या कारखानदाराला जसा आपल्या वस्तूंचे भाव ठरविण्याचा अधिकार आहे, तसा तो शेतकऱ्याला आजही नाही. शेतकऱ्याला ‘जैसे थे’ ठेवण्यात येथील व्यवस्था कमालीची यशस्वी झाली आहे. भारतीय अर्थव्यवस्था कृषिप्रधान समजली जाते, मात्र शेती अथवा शेतकरी केंद्रबिंदू मानून कधी नियोजन झाले नाही. कर्जाच्या खोल गर्तेत शेतकरी अडकला आहे. निसर्गाचा असमतोल झाल्याने व त्यामुळे होणाऱ्या नुकसानीमुळे हैराण होणाऱ्या, उद्‌ध्वस्त होणाऱ्या शेतकऱ्यांजवळ काहीच पर्याय राहत नसल्याने त्यांना आत्महत्या कराव्या लागणे हे खरेच लांछनास्पद आहे. फुले यांनी शेती व शेतकऱ्यांच्या दुरवस्थेची कारणे व ते सोडविण्याचे उपाय याबाबत चिकित्सा केली आहे. अडाणी शेतकऱ्यांच्या दृष्टीने ‘उच्चवर्णीय सांगतील तो धर्म व इंग्रज सांगतील ते कायदे’ होते. कितीही अन्याय व जुलूम झाला तरी तो आपल्या नशिबाचा भाग आहे म्हणून शेतकरी सहन करतात. `शेतसारा द्यायला पैसा नाहीत. नवीन मोट, नाडा घ्यायला पैसा नाही. उसाचे बाळगे मोडून हुंडीची ही अवस्था झाली आहे. मका ही खुरपण्याविना वाया गेली आहे. भूस सरून बरेच दिवस झाले, सरबड गवत, कडब्याच्या गंजी संपत आल्या आहेत. जनावरांना पोटभर चारा मिळत नाही’, असे वर्णन जोतिरावांनी केले आहे.

शेतीचे आधुनिकीकरण करावे, वृक्षतोड बंद करावी, पावसावर अवलंबून न राहता नव्या उपकरणांचा वापर करावा, धरणे व कालवे बांधावेत, दुष्काळात कर्जे द्यावीत. शेतीसाठी लागणारे आवश्‍यक पाणी देण्याची व्यवस्था सरकारने करावी. शेतीला पाणी देताना ते नळाद्वारे देण्यात यावे, असे उपाय ते सुचवितात. वन्यप्राण्यांमुळे व रानडुकरांमुळे नुकसान झाल्यास पोलिस अधिकारी किंवा अंमलदाराच्या पगारातून किंवा सरकारी खजिन्यातून शेतकऱ्यांना भरपाई द्यावी, असेही ते सुचवितात. 

महात्मा फुले यांनी ज्ञानाधारित शिक्षणासोबत कौशल्यपूर्ण मूल्याधिष्ठित शिक्षणाची गरज असल्याचे प्रतिपादित केले होते. त्यासाठी त्यांनी त्यांच्या शाळेत  औद्योगिक शिक्षण सक्तीचे केले होते. महात्मा फुलेंचे शिक्षण, समाजसुधारणा व शेतीविषयक विचार आजही प्रासंगिक आहेत आणि हे विचार आज अमलात आणले तर शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याची वेळ येणार नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rakhi Ravindra Raskar article Mahatma Jyotirao Phule Memorial Day